Do as you think! | तुम्ही जसा विचार करता तसेच घडता!
तुम्ही जसा विचार करता तसेच घडता!
‘मन करा रे प्रसन्न,सर्व सिद्धीचे कारण’ म्हणजेच सकारात्मक विचार ठेवा आणि जीवनात यश संपादन करा, असाच मुलमंत्र संत तुकोबारायांनी संपूर्ण मानव जातीला दिला आहे. थोडक्यात सुरूवातीला आपण आपलीच ओळख करून घ्यावी... आपल्यातील क्षमता ओळखावी. आपल्यातील गुण आणि उणिवांच्या आधारे स्वत:चे मुल्यमापन स्वत:च करावे. त्यानंतर प्रत्येक गोष्टीला सकारात्मकतेची जोड दिल्यास तुम्हाला यशापासून कुणीही रोखू शकत नाही.  पंरतू, जीवनातील यश हे मनाच्या प्रसन्नतेवरच अंवलबून असल्याचे संत तुकाराम आवर्जून सांगतात...  रतन टाटा यांचे एक सुप्रसिद्ध वाक्य आहे. ‘लोखंडाला कोणीही नष्ट करू शकत नाही; पण त्याचा स्वत:चा गंजच त्याला नष्ट करू शकतो. तसेच माणसालाही कोणी नष्ट करू शकत नाही; पण त्याच्याच मनाचा दृष्टिकोन त्याला नष्ट करू शकतो. नष्ट होण्याऐवजी श्रेष्ठ बनण्याचा प्रयत्न आपण का बरे करू नये? चला श्रेष्ठ आणि सर्वश्रेष्ठ कसं बनायचं याचा विचार आपण करू. मी हे करू शकतो, असा ठाम विश्वास बाळगला व आपल्यात आत्मविश्वासाची शक्ती जागृत केली तर आभाळाएवढी संकटं जरी आली तरी विश्वास बाळगा तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. असा सकारात्मक दृष्टिकोन मात्र असावा लागेल. स्वत:ची ओळख झाल्याशिवाय व्यक्तीमत्व घडत नाही. जीवनाला अर्थही उरत नाही. ‘स्व’च्या ओळखीतूनच व्यक्तिमत्त्व घडते. अशा विचारांचे मनन, चिंतन, वाचन माणसाने सातत्याने करावे. हे फारच उपयुक्त ठरते. त्यामुळे स्वत:ची ओळख होते. आपणास सहज इतरांविषयी विचारले की आपण भरभरून त्याच्या गुण-दोषांची थैली उघडतो; पण स्वत:विषयी काही विचारलं तर मात्र बोलण्यास कचरतो. स्वरूप ओळखा असे संत सांगतात. ज्यांना स्वरूप कळाले त्यांनीच जगावर राज्य केले अन्  तेच आजही करताहेत. स्वत:ची ओळख होण्यासाठी स्वत:चे मन, प्रवृत्ती, कल, सवयी यांचा अभ्यास होणे महत्त्वाचे. एकदा का हा अभ्यास झाला म्हणजे गुण-दोष दिसतात. दोष कमी करत गेलो की मग गुण वाढीस लागतात. आपण काय करतो, का करतो, त्याचे काय परिणाम होणार हे कळते. त्यावेळी आपले मन सापडते.  मन हवं ते मिळवून देतं व आयुष्यातल्या अडचणी, संकटे, दु:ख यावर उपाय सापडतो व आपल्या आयुष्याला आकार मिळतो.  प्रसन्नता ही मनातच असते. तिला आपण बाहेर खेचून आणले पाहिजे.  - स्वामी शून्यानंद  भालेगाव बाजार, ता. खामगाव.
Web Title: Do as you think!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.