distance in Devotion | विरहभक्ती
विरहभक्ती

- शैलजा शेवडे

कृष्ण मथुरेला गेला. कंसाचा वध केला, पण गोकुळात परत आला नाही. तरी गोपींबद्दल त्याच्या मनात काळजी होतीच. त्या आपल्या विरहात वेड्या झाल्या असतील, ही जाणीव होतीच. म्हणून त्याने आपल्या मित्राला, उद्धवाला, जो खूप ज्ञानी-थोडा अहंकारी होता. त्याला गोकुळात पाठविले. हेतू हाच की, त्याला भक्ती म्हणजे नेमके काय, ते कळावे. उद्धव गोकुळात आला. गोपींना भेटला. कृष्णाचा सखा आपल्यासमोर असल्याचे पाहताच त्यांच्या भावनांचा बंध सुटला. त्या रडू लागल्या. रडता-रडता म्हणू लागल्या, ‘कृष्ण मथुरेला जाऊन आम्हाला विसरला. तिथे त्याला सुंदर स्त्रिया भेटल्या असतील, ज्या त्याच्यावर मोहीत झाल्या असतील. तो का आमची आठवण काढेल.’ तेवढ्यात तिथे एक भुंगा आला. कृष्णविरहात दग्ध गोपीला तो भुंगा कृष्णाचा दूत वाटला. त्याला उद्देशून उपरोधिक स्वरात म्हणू लागली,
जा जा जा मधुकरा, कृष्णदूता भ्रमरा,
स्पर्शू नको चरणांना अमुच्या, चंचला भ्रमरा,
गुंजारव की गीत तुझे हे, गुणवर्णन कृष्णाचे,
दाखव गाऊनी त्याच्या सांप्रतच्या प्रियतमांना
कृष्णापरी तू कपटी चंचल, समजले आम्हाला,
सुमनामधला सेवून मधु तो, सहजच त्यागी त्याला
मधुर बोलुनी, अनुनय करसी, ओळखले परी तुला,
त्या कृष्णाचा दूत तू असशी, तशाच तुझ्याही लीला
गोपींचा तो उत्कंठीत भाव बघून उद्धवाने त्यांची स्तुती केली. कृष्णाचा निरोप दिला. ‘गोपींनो, मी सर्वत्र आत्मरूपाने असल्यामुळे तुमचा आणि माझा वियोग संभवत नाही. विरहामुळे तुम्हाला माझा अहर्निश ध्यास लागून तुमचे मन वेगाने माझ्याकडे ओढले जावे. तुम्ही अहर्निश माझे स्मरण करा. म्हणजे लवकरच माझ्या स्वरूपाला प्राप्त व्हाल.’ कृष्णाचा तो संदेश ऐकून गोपींचे विरहदु:ख नाहीसे झाले. श्रीकृष्ण आपल्या अंतर्यामी नित्य आहे, हे जाणून त्यांनी गुरुबुद्धीने उद्धवाची पूजा केली.


Web Title: distance in Devotion
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.