देवा तुझा मी सोनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 06:18 PM2020-02-07T18:18:07+5:302020-02-07T18:18:14+5:30

संत नरहरी महाराजांनी आपला सुवर्णव्यवसाय कारागिरी सांभाळून भक्ती मार्ग अवलंबविला.

Deva tuza mi sonar | देवा तुझा मी सोनार

देवा तुझा मी सोनार

Next

महाराष्ट्रामध्ये संत परंपरा ही अनेक वर्षापूर्वीच्या काळापासून चालत आलेली परंपरा आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक जातीमध्ये वारकरी संप्रदायात अनेक संत होवून गेले. प्रत्येक संतांनी जनतेला भक्ती मार्गाचाच आग्रह धरला. संत गोरा कुंभार, संत सावता माळी, संत नामदेव महाराज याश्विाय अनेक संतांनी या महाराष्ट्र भूमिला पावन केले आणि वारकरी संप्रदायाची परंपरा आजपर्यंत कायम आहे.
अशाच संत माळेतील एक संत म्हणजे संत नरहरी सोनार. संत नरहरी महाराजांनी आपला सुवर्णव्यवसाय कारागिरी सांभाळून भक्ती मार्ग अवलंबविला. सुवर्ण व्यवसायात अगदी तरबेज, कलात्मक दागिने घडविणे महाराजांना चांगलेच अवगत होते. त्यामुळे महाराजांचा पंढपुरात व्यवसायात चांगला जम बसला होता. पंढरपुरात राहत असून सुद्धा संत नरहरी महाराज हे कट्टर शिवभक्त होते. त्यांची भगवान शंकरावर एकनिष्ठ भक्ती होती. महाराजांच्या दिनचर्येनुसार सकाळी शिव आराधना. बेलपुजन आदी पुजनाला वेळ ठरलेला असे. संत नरहरी महाराज शिवभक्त असल्यामुळे दुसऱ्या देवावर त्यांची फारशी श्रद्धा नव्हती. त्यामुळे त्यांच्या या वृत्तीचा अनेकांना रागही येत असे. असे म्हटले जाते की एके दिवश्ी पांडूरंगाने या शिवभक्ताची म्हणजे नरहरी महाराजांची परिक्षा घेण्याचे ठरविले. एकदा एका सावकाराने पांडूरंगासाठी सोन्याचा करदोडा करण्यास सांगितला. सावकारांनी दिलेल्या मापानुसार महाराजांनी तो अतिशय सुबक, सुंदर बनवून दिला. जेव्हा आपल्या नवसपुर्तीनुसार सावकाराने तो करदोडा विठ्ठल पांडूरंगाच्या कमरेस बांधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो मापापेक्षा खुपच मोठा झाला. अशी प्रक्रिया खुप चालली. एकदा करदोळा कधी पांडूरंगाच्या कमरेला लांब, कधी आखुड होत असे. शेवटी सावकाराने कंटाळून संत नरहरी महाराजांना सांगितले की, आता तुम्हीच योग्य ते माप स्वत: विठ्ठलाच्या कमरेचे घ्या आणि करदोडा लांब, आखुड मापाचा करुन द्या, परंतु सावकाराची मागणी महाराजांनी फेटाळून लावली.
‘मी शिवोपासक, शिवभक्त असल्यामुळे मी कुठल्याही इतर देवाचे मुखही पाहू शकत नाही. त्यामुळे पांडूरंगाच्या कमरेचे माप मी कसे घेणार?’ आता आपला नवसपुर्तीकडे जाणार नाही. या चिंतेने महाराजांना सावकार विनवणी करु लागले. पण आपल्या मतावर ठाम असलेल्या नरहरी महाराजांनी नकारच दिला. सावकारानीच मग एक युक्ती सुचवली.
‘अरे नरहरी तुम्ही जरी शिवभक्त असले तरी मी सांगितल्याप्रमाणे आपण डोळ्यावर पट्टी बांधून विठ्ठलाचे मुख न बघता कमरेचे माप घेवून यावे.’सावकाराचा हा विचार महाराजांना पटला. म्हणून महाराजांनी डोळ्यावर पट्टी बांधून विठ्ठल पांडूरंगाच्या कमरेचे माप घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आपण भगवान शंकराच्या पिंडीचेच माप घेतो की काय? असा स्पर्श महाराजांना वारंवार झाला. त्यामुळे शहानिशा करण्यासाठी पट्टी काढूनच पाहणे गरजेचे होते. म्हणूनच महाराजांनी जशी डोळ्याची पट्टी काढली, तरी समोरील स्मित वदनी पांडूरंगाची मुर्तीचे नरहरी महाराजांना दर्शन झाले. पुन्हा डोळ्यावर पट्टी बांधून माप घेण्याचा प्रयत्न केला, तर पिंडीला स्पर्श करण्याचा वारंवार भास होत होता. असे बºयाच वेळा केल्यामुळे महाराजांना शिव, विष्णू, विठ्ठल एकच यांच्यात द्वैत नाही. याची साक्ष पटली आणि तेव्हापासून महाराज विठ्ठलाचे निस्सीम भक्त झाले.
तसा संत नरहरी महाराजांचा जन्म हा देवगिरीचा महाराजांचे वडील दिनानाथ परंपरागत सोनारकाम करत असत. पुढे नंतर ते पंढरपूर येथे स्थायिक झाले. संत नरहरी महाराजांचे मोजकेच काही अभंग आहेत.


‘सवंगडे निवृत्ती सोपान मुक्ताबाई
शिव आणि विष्णू एकची माझे प्रेम तुझ्या पायी’
‘देवा तुझा मी सोनार तुझ्या नामाचा व्यवहार...’


अशा या संत माळेतील संतास पुण्यतिथी निमित्ताने विनम्र अभिवादन
- राजेश एस. काटोले
कौलखेड अकोला

Web Title: Deva tuza mi sonar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app