नात्यांचा गुच्छ!

By Admin | Updated: August 12, 2016 13:18 IST2016-08-12T13:03:12+5:302016-08-12T13:18:36+5:30

नातेसंबंधातील वीण आनंद, स्नेहभाव, प्रेम वाढवते. पण सद्यस्थितीत ही वीण सैल होत आहे. काही ठिकाणी पूर्णत: तुटतही आहे

Clan of ties! | नात्यांचा गुच्छ!

नात्यांचा गुच्छ!

>- प्रा. डॉ. यशवंत पाटील
 
नातेसंबंधातील वीण आनंद, स्नेहभाव, प्रेम वाढवते. पण सद्यस्थितीत ही वीण सैल होत आहे. काही ठिकाणी पूर्णत: तुटतही आहे. त्याला योग्य-अयोग्य, समर्थनीय-असमर्थनीय अनेक कारणे असू शकतात. शरीराने जवळ राहिले म्हणजे नातेसंबंधाची वीण घट्ट आणि दूर राहिल्यास ही वीण सैल होते असे सरसगट म्हणता येणार नाही. पण नात्या-नात्यात ‘प्रेम’ हा अडीच अक्षरी शब्द मनात ठासून भरलेला असेल तर नातेसंबंध सहज फुलतात-बहरतात, गंधीत होतात.
नातेसंबंधाविषयी राम आणि रावणातील संवाद मनोज्ञ आहे. रावण मृत्यू शय्येवर होता तेव्हा त्याने रामाला सांगितले, ‘प्रत्येक बाबतीत मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. वयाने, बुद्धीने, सामर्थ्याने आणि कुटुंब विस्तारानेसुद्धा. माझी लंका सोन्याची, राज्य विस्तार प्रचंड, धन-संपदेने खजीना भरलेला... असे सर्व काही असूनही मी तुझ्याकडून पराभूत का झालो? तर रामा ! तुझ्याबरोबर तुझा भाऊ लक्ष्मण होता. तर माझा भाऊ विभीषण माझ्या विरुद्ध होता. कुऱ्हाडीला एखाद्या झाडाचा लाकडी दांडा असतो त्या कुऱ्हाडीनेच दुसरे ‘झाड’ तोडले जाते. ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ होतो.’
नातेसंबंध मजबूत करण्यासाठी एकमेकांबद्दल स्नेहभाव असावा लागतो. हलक्या कानाचे असून चालत नाही.’ पोटात गेलेले विष त्या व्यक्तीला संपवते, पण कानात गेलेले विष किती तरी नाती तोडते, संपवते.
यासाठी चुका सांभाळून घ्याव्या लागतात. काहींकडे कानाडोळा करायचा असतो. काही प्रेमाने योग्यवेळी दुरुस्त करायच्या असतात. काही वेळा स्पष्टही बोलावे लागते. एकमेकांकडून अवास्तव, अवाजवी अपेक्षाही ठेवायच्या नसतात. योग्य तो त्यागही करायचा असतो. नातेसंबंध विविध रंगी फुलांच्या मोठ्या बहारदार सुंदर गुच्छासारखे असावे. आपण त्यात एक फूल म्हणून रहावे. नात्याच्या गुच्छात बहरावे.

Web Title: Clan of ties!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.