बालपणच चांगल्या संस्काराचा पाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 13:35 IST2019-02-09T13:34:43+5:302019-02-09T13:35:46+5:30
प्रत्येक व्यक्तींना समाजात प्रेरक होईल अशा कर्तव्याचे निर्माण करणे गरजेचे आहे व ती नैतिक जबाबदारी देखील आहे.

बालपणच चांगल्या संस्काराचा पाया
- डॉ.भालचंद्र.ना. संगनवार
आजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या आयुष्यात नक्की आपणास काय कमवायचे आहे, आणि किती कमवायचे आहे याचा बोध होत नाही. प्रत्येक व्यक्ती आपल्या बुद्धीला पटेल तसेच करतो. यातून काय साध्य झाले तर आनंद. अन्यथा निराशेच्या गर्तेत माणूस अडकतो. आणि नको त्या सवयीच्या आहारी जातो. मानवाच्या गरजा अनंत आहेत. त्यामुळेच भौतिकवाद व चंगळवादाचा जन्म झालेला आहे. आपणास नेमके काय हवे, आणि काय कमवायचे हे जर समजले तर व्यक्ती आनंदी आणि निरागस अगदी लहान बालकासारखे राहू शकतो.
अजाणतेपणी आपण इतरांसारखे होण्याचा प्रयत्न करतो. ईश्वराने प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्र विचाराचा व अस्तित्वाचा घडविला आहे. त्यामुळे एकाच मातेचे अपत्य भिन्न भिन्न वागतात. चांगल्या संस्कारांची सुरुवात अगदी लहानपणी नव्हे तर गर्भातच होते. असे म्हटले तर वावगे ठरू नये. बालपणात आपण समोरचा व्यक्ती काय करतो, कसे वागतो, कसे चालतो तसे करण्याचा प्रयत्न करतो. समोरच्याची कृती योग्य की अयोग्य, चांगली की वाईट हे त्या वयात समजत नाही. लहान राहूनच शिकण्यात आले तर त्याचा परिणाम दीर्घ कालावधी करता टिकतो. म्हणूनच संत तुकाराम महाराज यांच्या अभंगात म्हणतात,
लहानपण देगा देवा। मुंगी साखरेचा रवा।।
ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ।।
जया अंगी मोठेपण । तया यातना कठीण ।।
तुका म्हणे बरवे जाण । व्हावे लहानाहून लहान ।।
आजच्या कालावधीत कोणीही लहानपण घेण्यास तयार नाहीत. याउलट मी किती मोठा आहे हे दाखविण्यात स्वतःचा वेळ पैसा आणि बुद्धी पणाला लावत आहे. मोठे होण्याच्या नादात निसर्गनिर्मित नात्यातील गोडवा नाहीसा होत चालला आहे. विधी आणि विधान यामध्ये सांगड घालणं आणि सत्कार्य, संतसंगती अव्हेरली जात आहे.
आपले कर्तव्य काय आहे आपले आई-वडिलांपैकी समाजाप्रती देशाचे काही देणे लागतो. याचे भान आजच्या पिढीला राहिलेले दिसत नाही. 'मी' आणि 'मजसम' या दोन व्याधीने पूर्णपणे ग्रासलेले आहे. अशा प्रसंगी खालील ओवी ओठांवर येतात.
भीष्म धर्म अभिमन्यू की
शापित धुरंधर द्रोण मी
स्वच्छंदी की स्वपराजित
मलाच न ठावे कोण मी ?
प्रत्येक व्यक्तींना समाजात प्रेरक होईल अशा कर्तव्याचे निर्माण करणे गरजेचे आहे व ती नैतिक जबाबदारी देखील आहे. भावना विचार शक्ती आणि बुद्धी या मानवाला मिळालेल्या देणग्या असून, याचा योग्य वेळी व योग्य ठिकाणी वापर करणे गरजेचे आहे. जेणेकरून स्वहित व समाहीत साधता येते. संपूर्ण विश्वात आपल्या जीवनात इतके महत्त्वाचे इतर काहीही नाही. कारण मानवी जीवन त्रिमितीमध्ये विभागलेले आहे. जीवनात लांबी, रुंदी आणि खोली आहे. माणसाचे मोठेपण हे तिसर्या मीतीवर ठरते. या त्रिमिती साध्य करण्यासाठी ध्येय वेडेपणा लागतो. आणि निश्चितच आजच्या पिढीत तो सातत्याने दिसून येतो. म्हणूनच आदर्शवादी व ध्येयवादी बनविण्याची ताकद इच्छाशक्तीच्या विकासात दडलेली आहे. म्हणून आजच्या पिढीला खालील ओवी प्रेरणादायी ठरताना दिसत आहे.
ध्येयाच्या वेदना मनाला होऊ दे
वार तुझ्या प्रत्येक क्षणास होऊ दे
अशक्य सुद्धा म्हणेन शक्य आहे
इतका गर्व तुझ्या बुद्धीच्या पणास होऊ दे.
( लेखक हे लातूर येथे वरिष्ठ भूवैज्ञानिक आहेत.)