बालकरूपे विष्णू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 00:20 IST2019-08-22T00:18:11+5:302019-08-22T00:20:07+5:30
कंसाची खात्री पटली, की माझे प्राण हरण करणाऱ्या विष्णूने हिच्या गर्भात प्रवेश केला आहे.

बालकरूपे विष्णू
- शैलजा शेवडे
देवकीच्या उदरात आठवा गर्भ स्थापित झाला. श्रीभगवान तेजरूपाने त्या गर्भात विराजमान झाले. देवकीच्या शरीरकांतीने बंदीगृह झगमगायला लागले. देवकी विलक्षण तेजस्वी दिसू लागली. कंसाची खात्री पटली, की माझे प्राण हरण करणाऱ्या विष्णूने हिच्या गर्भात प्रवेश केला आहे. भगवंताप्रति दृढ वैरभाव धरून तो त्याच्या जन्माची प्रतीक्षा करू लागला. उठता-बसता, खाता-पिता, चालता-फिरता सर्वदा विष्णूचे चिंतन करू लागला. सारे जगच त्याला विष्णुमय दिसू लागले. जसा श्रीविष्णूचा प्रगट होण्याचा काळ समीप आला, तसे सर्व देव कंसाच्या बंदीगृहात आले आणि श्रीहरीची स्तुती करू लागले. ही स्तुती गर्भस्तुती म्हणून प्रसिद्ध आहे. आता भगवंताच्या प्रत्यक्ष आविर्भावाची वेळ येऊन ठेपली. त्याचे वर्णन मी काव्यात केले आहे.
मंगलमय दशदिशा तारका, मंगल युती करती,
परम शुभमुहूर्त पातला, हेच जणू सांगती,
पूर्व दिशेला, जणू पूर्ण चंद्र ये, अंधा-या रात्री,
बालकरूपे, विष्णु प्रगटला, देवकीच्या पोटी।
स्तंभित ते वसुदेव देवकी, मनोमनी हर्षती,
रूप सावळे, अद्भुत सुंदर, पुन्हा पुन्हा पाहती,
निघून गेले, भय ते सारे, नतमस्तक होती,
बालकरूपे, विष्णु प्रगटला, देवकीच्या पोटी।
चतुर्भुज चतुरायुध, पीतांबरधारी मूर्ती,
जलभरल्या मेघासम त्याची, तेजस्वी कांती,
किरीटकुंडले, रत्नप्रभेने, कुंतल ते झळकती,
बालकरूपे, विष्णु प्रगटला, देवकीच्या पोटी।
प्रफुल्लीत वसुदेव सोडतो, संकल्प मनी ते किती,
विष्णुचा अवतार उत्सव, नक्कीच त्यांच्या प्रति,
हात जोडूनी, परमात्म्याचे स्तवन ते करती,
धन्य धन्य हो, बाळरूपाने, आलांत, जगजेठी।
वासुदेव देवकीचे हृदय आनंदाने भरून आले. ते नतमस्तक होऊन परमात्म्याची स्तुती करू लागले.