मंगळवारी रात्री म्हणजेच १६ जुलै रोजी रात्री १ वाजून ३२ मिनिटांनी खंडग्रास चंद्रग्रहण सुरू होईल आणि पहाटे ४ वाजून ३० मिनिटांनी संपेल. हे वर्षातील दुसरं चंद्रग्रहण आहे. भारतात पूर्वीपासून चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाबाबत अनेक समज-गैरसमज पाळले जातात. पण त्यात किती तथ्य आहे? किंवा या गोष्टी पाळणं योग्य आहे का? हे आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेतलं.

मान्यता खऱ्या की खोट्या?

चंद्रग्रहणात कुठले ही नवीन कार्य करू नये, मल-मूत्र आणि शौच करू नये, देवी देवतांची मूर्ती आणि तुळशीच्या रोपांना स्पर्श करू नये, दातांची स्वच्छता, केसांमध्ये कंगवा फिरवू नये अशा अनेक मान्यता वर्षानुवर्षे आहेत. पण खगोलशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी या मान्यतांबाबत वेगळंच मत व्यक्त केलं.

या गोष्टी पाळण्याची गरज आहे का?

दा. कृ. सोमण म्हणाले, 'प्राचीन ग्रंथांमध्ये असं लिहिलंय की, ग्रहणकाळात जेवण करू नये, मलमूत्र विसर्जित करू नये, झोपू नये. पण हे जेव्हा लिहिलं गेलंय तेव्हा ग्रहण नेमकं काय आहे हे  माहीत नव्हतं. ग्रहणामुळे वातावरण प्रदूषित होतं असं त्यांना त्यावेळी वाटत असावं. पण ग्रहणाने वातावरण प्रदूषित होत नाही. या गैरसमजुती होत्या. त्यामुळे लोक ग्रहण पाळत होते'.

आरोग्यासाठी नुकसानकारक

तसेच त्यांनी सांगितले की, 'आता एकीकडे चंद्रावर यान पाठवलं जातं आणि दुसरीकडे लोक या गोष्टी पाळतात हा मोठा विरोधाभास आहे, असं वैज्ञानिकांचं मत आहे. ग्रहणकाळात या गैरसमजुती पाळण्याची अजिबात गरज नाही, असंही वैज्ञानिक सांगतात. या गोष्टी त्यावेळी जरी  ग्रंथात लिहिल्या गेल्या असल्या तरी प्रत्यक्षात त्या पाळणं आरोग्याच्या दृष्टीने नुकसानकारक ठरतील. त्यामुळे आधुनिक काळात आपण बदललं पाहिजे. या गैरसमजुती पाळणं योग्य नाही, असं मला वाटतं'. 

ग्रहण गरोदर महिलांसाठी अशुभ?

(Image Credit : Daily Express)

ग्रहणात गरोदर महिलांना बाहेर पडू नये, भाजी चिरू नये, ग्रहण बघू नये अशा अनेक गैरसमजुती पाळल्या जातात. तसेच असं केल्याने विकृत बाळ जन्माना येईल असा समज आहे. याबाबत सोमण यांना विचारले असता ते म्हणाले की, 'गरोदर महिलांबाबत ग्रहणादरम्यान मानल्या जाणाऱ्या या गोष्टी योग्य नाहीत. या गोष्टींचा आणि ग्रहणाचा काहीही संबंध नाही, असं वैज्ञानिक सांगतात. १९५७ मध्ये यूरोपमध्ये थॉयलोमाइड नावाचं एक चुकीचं औषध घेतल्यामुळे हजारो विकृत मुलं जन्माली आली होती. त्यानंतर हे औषध १९६२ मध्ये बंद करण्यात आलं. ही विकृत मुलं जन्माला येण्याचा आणि ग्रहणाचा काहीही संबंध नाही. आधुनिक काळात या गैरसमजुती ठेवणं योग्य नाही, असं मला वाटतं'.


Web Title: Chandra Grahan : Science, myth and reality about Lunar Eclipse
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.