आनंदाचा झरा नि ‘मनहूस’ चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 05:17 PM2019-01-14T17:17:23+5:302019-01-14T17:17:43+5:30

‘माणसाचा चेहरा हा त्यांच्या मनाचा आरसा असतो’ असं म्हणतात. याचा अर्थ आपल्या मनातल्या भावभावना चेह-यावर व्यक्त होतात, हे खरंच आहे.

Blissful and frustrating 'wretched' face | आनंदाचा झरा नि ‘मनहूस’ चेहरा

आनंदाचा झरा नि ‘मनहूस’ चेहरा

Next

- रमेश सप्रे
‘माणसाचा चेहरा हा त्यांच्या मनाचा आरसा असतो’ असं म्हणतात. याचा अर्थ आपल्या मनातल्या भावभावना चेह-यावर व्यक्त होतात, हे खरंच आहे. कारण बोटात कुंचला धरून काढलेल्या चित्राला पारितोषिक मिळाल्यावर बोटं काही हसत नाहीत. हसतो तो आपला चेहराच आणि पायात काटा बोचला तर येणारे अश्रू नि ‘आई गंùù’ हे वेदनायुक्त उद्गार चेह-यावरच दिसून येतात. 

एकूण आपला चेहरा, आपलं मुख, आपली चर्या, आपली मुद्रा यांना आजकाल खूपच महत्त्व आलंय. ‘इंटरव्ह्यू’ घेतानाही ‘आउटरव्ह्यूला’ महत्त्व आलंय ते यामुळेच. अन् म्हणूनच सगळीकडे ‘ब्युटी पार्लर्स’चं पेव फुटलंय आणि प्रसाधन-सौंदर्य साधनं याचा धंदा खूपच तेजीत आहे. एखादा चतुर न्यायाधीश किंवा अनुभवी मुख्याध्यापक अपराध केलेल्या व्यक्तीला किंवा विद्यार्थ्याला जे काही घडलं ते जसंच्या तसं आपल्या डोळ्याला डोळा भिडवून म्हणजे आपल्याकडे दृष्टी रोखून सांगायला सांगतात. याचं कारण आपले डोळे खोटं व्यक्त करू शकत नाहीत. त्यातले भाव योग्य रितीनं वाचले तर सत्य परिस्थिती लक्षात येऊ शकते. याला इंग्रजीत म्हणतात ‘आईज् नेव्हर बिट्रे’ असो. 

हे चेहरापुराण सांगण्याचं कारण ‘आनंदायन’ या विषयाशी जोडलेली एक गोष्ट. अकबराचे हुशार प्रश्न नि बिरबलाची चतुर उत्तरं यावर आधारलेल्या अनेक कथा नि किस्से आपण लहानपणापासूनच वाचत असतो. आता तर दूरचित्रवाणीच्या (टीव्ही) अनेक वाहिन्यांवर असे प्रसंग दाखवले जातात. ते इतके प्रत्ययकारी असतात की आबालवृद्धांना म्हणजे घरातल्या नातवंडांना आई-वडिलांना तसेच आजी-आजोबांनाही आवडतात. 

असाच एक किस्सा
एकदा एका सामान्य व्यक्तीला अकबरासमोर दरबारात हजर केलं होतं. त्याचा अपराध काय होता? तर त्याचा चेहरा ‘मनहूस’ म्हणजे अपशकुनी, अशुभ होता. सकाळी ज्याला कुणाला त्या व्यक्तीचा चेहरा सर्वात प्रथम दिसला की त्या माणसाचं ठरलेलं काम ते व्हायचं नाहीच; पण उलट नुकसान मात्र व्हायचं. त्यामुळे सर्व जण त्याला टाळायचे. निदान सकाळी तरी तो दिसू नये असाच सर्वाचा प्रयत्न असायचा. त्यापेक्षा लोकांनी ठरवलं की याला राजाला सांगून कायमचं तुरुंगात ठेवलं तर सर्वाचा प्रश्न मिटेल. महणून त्याला दरबारात पेश केला गेला होता. अकबरानं शांतपणे सर्वाचं नि त्याचंही म्हणणं ऐकून घेतलं नि सरळ त्याला लोकमताचा मान राखून तुरुंगात टाकलं. त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली, पण त्याला मरेपर्यंत बंदिवासाची शिक्षा सुनावली. 

इकडे त्याच्या कुटुंबावर आपत्ती कोसळली. कमावता आधारच नाहीसा झाल्यानं त्यांची उपासमार होऊ लागली. अखेर त्याची पत्नी बिरबलाकडे आली नि तिनं बिरबलाला यातून काही तरी मार्ग काढण्याची विनंती केली. बिरबलाला एक युक्ती सुचली. त्यानं राजाच्या सेवकाला विश्वासात घेऊन अकबर झोपायला जाताना आपले जोडे शयनकक्षाच्या बाहेर काढून ठेवायचा त्या जोडय़ात एक विंचू ठेवायला सांगितला. सेवकानं त्याप्रमाणो केलं. दुसरे दिवशी सकाळी या अपशकुनी चेह-याच्या माणसाला लवकर उठवून त्याच्या तोंडावर बुरखा घातला व अकबराच्या शय्यागृहाच्या बाहेर आणून उभं केलं. स्वत: बिरबल बाजूला लपून बसला. 

नेहमीप्रमाणे राजा उठून बाहेर आला. पायात जोडे घालताना त्या बुरखेधारी व्यक्तीनं बुरखा दूर करून अकबराकडे पाहून मुजरा केला. ‘तू मनहूस (अशुभ) आदमी इथं कसा?’ असं म्हणतानाच जोडा घातल्याने आतल्या विचंवाने अकबराला कडकडून दंश केला. ‘मर गया मर गया’ म्हणत एका पायावर नाचत, वेदनेनं कळवळत असताना त्याने त्याला फाशीची शिक्षा सुनावली.  तेव्हा अकबरासमोर बिरबल गेला व म्हणाला जहाँपनाह, याचा मनहूस चेहरा दिवसाच्या आरंभी सर्वप्रथम पाहिल्यानं आपल्याला फक्त विंचू डसला पण आपला चेहराही यानं आज सर्वप्रथम पाहिला. त्यामुळे तुम्ही त्याला फाशीची सजा सुनावली. आपणच विचार करा. विंचवाचा दंश अधिक भयंकर की फाशी? माफ करा, पण याच्या दृष्टीनं आपला जहॉँपनाहांचा चेअरा अधिक मनहूस नाही का?

अकबराच्या लक्षात आपली चूक आली अन् तो म्हणाला, ‘जा, तुला तुझी शिक्षा माफ! असं, मनहूस चेहरा वगैरे काही नसतं.’ खरंच आहे. घटना अटळपणे घटतच असतात. आपण उगीचच या गोष्टीला- त्या व्यक्तीला दोष देऊन दु:खी होतो. आनंदाचा झरा आपल्या आत वाहत असतो त्याचं कारंजं, त्याचे तुषार आपल्या चेह-यावर दिसतात हे खरंय; पण त्यासाठी आत आनंदाचा झरा वाहत राहायला हवा. खरं ना?

Web Title: Blissful and frustrating 'wretched' face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.