चांगल्या विचारांचा अंगीकार करतो मानवी जीवनाचे सार्थक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 15:07 IST2019-01-05T15:05:55+5:302019-01-05T15:07:01+5:30
समूळ दुःखाचे कारण हे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, आणि मत्सर आहेत

चांगल्या विचारांचा अंगीकार करतो मानवी जीवनाचे सार्थक
- डॉ. भालचंद्र संगनवार, वरिष्ठ भूवैज्ञानिक, लातूर
साधू-संतांनी विविध विषयांचा उहापोह करून माणसाल सहा शत्रू कसे घातक आहेत हे समजावून सांगितलेले आहे. समूळ दुःखाचे कारण हे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, आणि मत्सर असून माणसाला चांगल्या व समाजोपयोगी कामापासून दूर करून आत्मघातकी व विध्वंसक बनवितात. बहुतांश मनुष्यप्राण्यात ह्या सहा शत्रूंचा शिरकाव झालेला असतो आणि ज्यामध्ये नाही तो दैववतच मानावा. काम म्हणजे अति जास्त अनैतिक भावना, क्रोध म्हणजे राग, तर लोभ म्हणजे भौतिक सुखाच्या मागे धावत एखादी गोष्ट मिळविण्याच्या अति हव्यास असे आहे. अत्यंत क्षणभंगुर गोष्टी मिळविण्यासाठी स्वतःला झोकून देणे हे मोहाचे साधे उदाहरण आहे. मद म्हणजे गर्व, तर मत्सर म्हणजे द्वेष या अर्थाने येथे उल्लेख केलेला आहे. माणूस हा सहा विकाराने ओतप्रोत होत आहे आणि यामुळे तो कधी संपणार नाही. तो स्वतःच्या स्वार्थासाठी पंचतत्वावर देखील चढाई करताना दिसत आहे. चांगल्या गोष्टीचा अव्हेर करुन दुःखाच्या वाटेने तो मार्गक्रमण करतो आहे. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात..
चंदनाच्या वासे धरीतील नाक । नावडे कनक न घडे हे ।।
चांगल्या विचाराचा अंगीकार करून सहा शत्रूंचा त्याग करणे म्हणजेच ईश्वर लीन होणे असे आहे. त्याकरिता उपरती होणे गरजेचे आहे. त्यामुळे वाल्याचा वाल्मिकी तर नराचा नारायण होऊ शकतो. आपल्या सद्गुणाचे व चांगल्या गोष्टीचे भागीदार होण्यास तयार होतील. परंतु वाईट बाबीचे भागीदार कोणी होणार नाही. यावरून एक प्रसंग आठवला तो येथे कथन करतो. एक वाटाड्या वाटमाऱ्या करून लोकांना लुटून आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. असे करीत असताना कित्येक दिवस निघून गेले. प्रत्येक वाटमारीत झालेल्या दुष्कृत्याची नोंद तो एक दगड घागरीत टाकून संचित करायचा. असे करता करता काही हंडे दगडाने भरले. एके दिवशी एक सद्गृहस्थ त्या रस्त्याने येत होते. त्यांना देखील वाटाड्याने अडविले व मारणार तोच त्यांनी विचारले की तू हे जे करतो ते पाप आहे हे तुला माहित आहे काय? आणि हा पापकर्म तुझी कुटुंबिय सहभागी आहेत काय? यावर तो निरुत्तर होऊन त्याने सांगितले मी सर्वकाही त्यांच्यासाठी करतो आहे. त्यामुळे ते देखील पापात वाटा घेतीलच. वाटसरूने त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना विचारण्यास सांगितले त्यावर वाटाड्याने सांगितले मी पत्नी व मुलांना विचारतो. वाटाड्या घरी गेला व पत्नी आणि मुलांना विचारू लागला. की कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मी जे कृत्य करतो त्यातून होणाऱ्या पापात आपण देखील सहभागी आहात ना? यावर त्याला एकच उत्तर मिळाले, आपण करता त्यातून पुण्यकर्म तुमचेच व होणारे पाप देखील तुमचेच.तात्पर्य काय स्वतः केलेल्या कर्माची फळे ही स्वतः बघावी लागतात. आणि अशावेळी या चार ओळी मात्र निश्चितच ओठावर रुळतात.
याची देही याची डोळा माझे मी मरण पाहिले,
स्मशान घाटावरील जळते माझे सरण पाहिले
प्रत्येक प्राणी जन्मतः एकटाच जन्माला येतो. व कर्मानुरूप गतीस प्राप्त होतो. म्हणून सहा शत्रूंचा त्याग करून चांगल्या मार्गाचा स्वीकार केल्यास देह जरी गेला तरी त्यांच्या चांगल्या विचारांचा वर्तनाचा सुगंध दरवळत असतो. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात,
देह जावो अथवा राहो । पांडुरंगी दृढ भावो ।।
चरण न सोडो सर्वथा । आण तुझी पंढरीनाथा ।।