श्रद्धा खून प्रकरण : पोलिस कोठडीतील आरोपीने चार दिवसांपासून साधली चुप्पी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2022 03:48 PM2022-12-07T15:48:51+5:302022-12-07T15:51:10+5:30

खुनाचे कारण अद्यापही गुलदस्त्यात

Shraddha murder case in Bhandara: Accused cousin in police custody keeps silent | श्रद्धा खून प्रकरण : पोलिस कोठडीतील आरोपीने चार दिवसांपासून साधली चुप्पी

श्रद्धा खून प्रकरण : पोलिस कोठडीतील आरोपीने चार दिवसांपासून साधली चुप्पी

googlenewsNext

भंडारा : संपूर्ण विदर्भात खळबळ उडवून देणाऱ्या साकोली तालुक्यातील पापडा येथील श्रद्धा सिडाम या चिमुकलीच्या खुनाचे कारण अद्यापही पुढे आले नाही. चार दिवसांपूर्वी पोलिसांनी श्रद्धाच्या चुलत भावाला अटक करून पोलिस कोठडी मिळविली. मात्र चार दिवसांपासून त्याने चुप्पी साधली आहे. पोलिस विविध प्रकारे त्याच्याकडून माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र अद्याप यश आले नाही.

साकोली तालुक्यातील पापडा येथील श्रद्धा किशोर सिडाम (आठ) ही सोमवार २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी बेपत्ता झाली होती. दरम्यान बुधवारी ३० नोव्हेंबर रोजी सकाळी गावाजवळील शेतात तणसाच्या ढिगाऱ्यात तिचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. या घटनेने एकच खळबळ उडाली. पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी पापडा येथे तळ ठोकून होते. बालिकेचा खून कुणी व कशासाठी केला याचा तपास करीत होते. याप्रकरणात अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान शनिवार ३ डिसेंबर रोजी या प्रकरणात श्रद्धाचा चुलत भाऊ अजय पांडुरंग सिडाम (२५) याला पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले. चौकशी करून त्याला अटक करण्यात आली. आता लवकरच या खून प्रकरणाचा पडदा उठेल, अशी अपेक्षा होती. पोलिसांनी आरोपी अजय न्यायालयापुढे हजर करून ९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळविली होती.

सध्या तो पोलिस कोठडीत आहे. मात्र चार दिवसांपासून त्याने चुप्पी साधली आहे. पोलिस अधिकारी विविध प्रकारे खुनाचे कारण त्याला विचारत आहे. मात्र तो काही बोलायला तयार नाही. नेमका खून कशासाठी केला हे सांगायला तयार नाही. आता तीन दिवस पोलिस कोठडीत तो काय माहिती देतो यातून या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा

श्रद्धा सिडाम हिचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला. मृतदेह नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. अद्याप अहवाल पोलिसांना प्राप्त झाला नाही. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर श्रद्धाचा मृत्यू नेमका कसा झाला, तिला आधी कसे ठार मारले आणि जाळले याची माहिती मिळणार आहे. शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांच्या तपासाची दिशा ठरणार आहे.

Web Title: Shraddha murder case in Bhandara: Accused cousin in police custody keeps silent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.