यवतमाळकरांना यावर्षीही बेंबळाचे पाणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 10:00 PM2019-03-16T22:00:54+5:302019-03-16T22:01:26+5:30

नऊ महिन्यात केवळ पाच किलोमीटर पाईप टाकले. आणखी तेरा किलोमीटर बाकी आहे. कंपनीचे पाईप थांबून थांबून येत आहे. टाकणारेही थंड आहे. फिल्टर प्लान्टचे काम केवळ ५५ टक्के झाले. शिवाय लाईन मार्गातील शेतात पिके आहेत.

Yavatmal has not got any water supply in this year too | यवतमाळकरांना यावर्षीही बेंबळाचे पाणी नाही

यवतमाळकरांना यावर्षीही बेंबळाचे पाणी नाही

Next
ठळक मुद्दे१८ पैकी केवळ पाच किमी पाईप टाकले : शेतातून पाईप नेण्यास शेतकऱ्यांचा विरोध

विलास गावंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नऊ महिन्यात केवळ पाच किलोमीटर पाईप टाकले. आणखी तेरा किलोमीटर बाकी आहे. कंपनीचे पाईप थांबून थांबून येत आहे. टाकणारेही थंड आहे. फिल्टर प्लान्टचे काम केवळ ५५ टक्के झाले. शिवाय लाईन मार्गातील शेतात पिके आहेत. या परिस्थितीत बेंबळा प्रकल्पाचे पाणी याहीवर्षी यवतमाळकरांना मिळणार नाही, हे स्पष्ट आहे.
निळोणा झाल्यानंतर यवतमाळकरांना गतवर्षी न भूतो अशा पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले. लिटरभर पाण्यासाठी तास-दोन तास रांगेत राहावे लागले. आबालवृध्द पाण्यासाठी भटकत होते. गरीब-श्रीमंतीचा भेदही थांबला होता. अपुऱ्या पावसामुळे निळोणा आणि चापडोह प्रकल्प बंद कोरडे पडल्याने हे संकट उभे झाले होते. त्याचवेळी यवतमाळकरांच्या भावनांशी खेळ खेळला गेला. ३०२ कोटींच्या ‘अमृत’ योजनेचे पाणी टंचाई काळात यवतमाळकरांना पाजणार, अशा घोषणा सुरू झाल्या. पाईपलाईन टाकून पूर्ण झाली, पण टेस्टिंगमध्येच दगा दिला. अनेक ठिकाणी पाईपच्या चिंधड्या उडाल्या. वल्गना करणाऱ्यांचे तोंड बंद झाले.
बेंबळाचे पाणी मिळणार नाही, यावर जून २०१८ मध्ये मोहोर लागली. पाऊस लवकर सुरू झाल्याने टंचाई संपली. पण बेंबळा पूर्णत्वाकडे जाण्याची टंचाई अजूनही कायम आहे. निकृष्ट पाईप पुरविले, पोलिसात तक्रार करा, नवीन पाईप मागा, अशी सारी सोंग ढोंग त्यावेळी झाली. कंपनी अखेर नवीन पाईप देण्यास राजी झाली. मात्र जीवावर आल्यागत पाईपचा पुरवठा केला जात आहे. आतापर्यंत किमान नऊ किलोमीटर पाईप पोहोचणे अपेक्षित होते. केवळ चार किलोमीटरचा पुरवठा झाला. यातून काही ठिकाणी जागा सोडून असे पाच किलोमीटर काम झाले. अर्धीअधिक पाईपलाईन शेतातून गेली आहे. आता तिथे पीक आहे. मागील अनुभव पाहता शेताची नासाडी होऊ देण्याची शेतकºयांची मानसिकता नाही. टाकलेले पाईप काढून नवीन पाईप टाकण्यासाठी आवश्यक तेवढे मनुष्यबळ कंत्राटदाराकडून लावले जात नाही. आहे तेवढ्यात भागविणे सुरू आहे. टाकळी फिल्टर प्लान्टपर्यंत संपूर्ण १८ किलोमीटर पाईप टाकणे अवघ्या दोन महिन्यात कठीण आहे.
फिल्टर प्लान्ट ते गोदनी रोड सम्पचीही बोंबाबोंब
मोठी उठापटक करून पाईप टाकले तरी, शुध्द पाणी मिळणार नाही. कारण टाकळी येथे फिल्टर प्लान्टचे काम फक्त ५५ टक्के झाले आहे. या प्लान्टवर दररोज ४८ दशलक्ष लीटर पाण्याचे शुध्दीकरण होणार आहे. तेथून गोदणी रोडवरील टाकीत पाणी साठवण केली जाईल. मात्र ही सोय यावर्षी तरी होणार नाही, हे स्पष्ट आहे. फिल्टर प्लान्टपासून गोदनी रोडवरील सम्पमध्ये पाणी आणण्यासाठी टाकलेल्या सात किलोमीटर लाईनचीही बोंबाबोंब आहे. या लाईनचे टेस्टिंग पूर्ण झालेले नाही. पाण्याची साठवण करण्यासाठी सम्पच्या कामाला हात लागलेला नाही. आता बेंबळाचे पाणी यवतमाळकरांना या उन्हाळ्यात मिळणारच नाही. पुढे आणखी किती महिने लागणार याविषयीसुध्दा अनिश्चितता आहे.
योजनेची डेडलाईनला अवघे काही महिने
‘अमृत’ योजनेचे काम पूर्ण करण्याची डेडलाईन आॅक्टोबर २०१९ पर्यंत आहे. नागरिकांच्या घरापर्यंत पाणी नेण्यासाठीचा हा कालावधी आहे. आजपावेतो पाईपलाईन झालेली नाही, फिल्टर प्लान्ट अपूर्ण आहे. शहरात पाईपचे जाळे पसरले नाही. १६ टाक्यांचे काम झालेले नाही. काही ठिकाणची कामे थांबलेली आहेत. कामाची गती अतिशय संथ आहे. या परिस्थितीत डेडलाईनपर्यंत योजना पूर्ण होईल, याविषयी साधार शंका आहे.

शहराची पाण्याची गरज पूर्ण होईल एवढे पाणी निळोणा आणि चापडोहमध्ये आहे. अमृत योजना पूर्ण झाल्यानंतर बेंबळाचे पाणी यवतमाळकरांना मिळणारच आहे. ठरलेल्या मुदतीत योजना पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न आहे.
- मदन येरावार,
पालकमंत्री, यवतमाळ

बेंबळाचे नवीन पाईप सहा किलोमीटरपर्यंत टाकले आहे. कंपनीकडून अपेक्षेप्रमाणे पाईपचा पुरवठा नाही. शिवाय इतरही अडचणी आहेत. यातून मार्ग काढत शहरात लवकरच पाणी आणले जाईल.
- अजय बेले, उपविभागीय अभियंता, मजीप्रा यवतमाळ.

Web Title: Yavatmal has not got any water supply in this year too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.