अर्ध्या शहराला दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 09:33 PM2018-06-27T21:33:03+5:302018-06-27T21:33:34+5:30

अर्ध्या अधिक शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा मुख्य व्हॉलच गटारात असल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सतर्कतेने उघडकीस आला आहे.

Water supply to Ardh city | अर्ध्या शहराला दूषित पाणीपुरवठा

अर्ध्या शहराला दूषित पाणीपुरवठा

Next
ठळक मुद्देपिण्याच्या पाण्याचा व्हॉलच गटारात : प्राधिकरणाचे खापर वीज मंडळ, बांधकामवर

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अर्ध्या अधिक शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा मुख्य व्हॉलच गटारात असल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सतर्कतेने उघडकीस आला आहे. गटारातील या व्हॉलमधून पिंपळगाव, वाघापूर, वडगाव, दर्डानगर अशा विविध भागाला दूषित पाण्याचा पुरवठा होतो आहे. त्यामुळे जीवन प्राधिकरणाविरुद्ध नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पहायला मिळत आहे.
आर्णी रोड स्थित शिवाजी गार्डन परिसरात हा प्रकार दृष्टीस पडला. गटारात असलेला हा व्हॉल लिकेज असल्याने त्यातून सर्रास घाण पाणी पाईपलाईनद्वारे टाकीमध्ये व तेथून घराघरात पोहोचते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आधीच प्रचंड गटार व त्या भोवती सातत्याने वराहांचा संचार असल्याने पिण्याचे पाणी कोणत्या गुणवत्तेचे घराघरात पोहोचत असेल याची सहज कल्पना येते. याबाबत जीवन प्राधिकरणाकडे जाब विचारला असता त्यांनी थेट विकास कामे करणाऱ्या वीज वितरण कंपनी आणि बांधकाम खात्याकडे बोट दाखवून आपला बचाव करण्याचा केविलवाना प्रयत्न चालविला आहे. असेच अनेक लिकेज येथील गांधी चौक, मेन लाईन व शहराच्या विविध भागात ठिकठिकाणी आहे. त्याबाबत नागरिकांकडून सातत्याने प्राधिकरणाकडे तक्रारीही केल्या जातात. परंतु प्राधिकरण त्याबाबत कधीच गांभीर्याने घेत नाही. पर्यायाने शहरातील लिकेज व दूषित पाणी पुरवठ्याची समस्या कायम आहे.
शिवाजीनगर परिसरातील हा व्हॉल गेल्या अनेक महिन्यापासून फुटलेल्या अवस्थेत आहे. या संदर्भात नागरिकांनी जीवन प्राधिकरणाकडे तक्रार नोंदविली. त्यानंतरही हा व्हॉल दुरुस्त झाला नाही. यातून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होऊन तेथे डबके साचले आहे. या डबक्यातच परिसरातील सांडपाणी येऊन मिळते. तसेच यात डुकरांचा मुक्त संचार होतो. हेच दूषित पाणी नळावाटे नागरिकांच्या घरात पोहोचते. गेल्या कित्येक दिवसानंतर नळाचे आलेले पाणी नागरिक मोठ्या उत्सुकतेने भरतात. पाण्याचा रंग हिरवट पाहूनही तक्रार करीत नाही. याच पाण्यामुळे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. शहरातील विविध भागात हा पाणीपुरवठा होत असल्याने डायरियासारखे आजार पसरण्याची भीती आहे. जीवन प्राधिकरण मात्र दुर्लक्ष करीत आहे.

शिवाजीनगर गार्डनजवळील लिकेज व्हॉल दुरुस्तीचे काम जीवन प्राधिकरणाने हाती घेतले आहे. एक-दोन दिवसात काम पूर्ण होईल.
- अजय बेले,
कार्यकारी अभियंता जीवन प्राधिकरण.

Web Title: Water supply to Ardh city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.