अभियांत्रिकी सहायकांना श्रेणी व पदोन्नतीची प्रतीक्षा

By admin | Published: February 7, 2016 12:43 AM2016-02-07T00:43:28+5:302016-02-07T00:43:28+5:30

विविध विभागात कार्यरत असलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सहायकांना कनिष्ठ अभियंत्याची वेतनश्रेणी आणि पदोन्नतीची प्रतीक्षा आहे.

Waiting for the category and promotions for engineering assistants | अभियांत्रिकी सहायकांना श्रेणी व पदोन्नतीची प्रतीक्षा

अभियांत्रिकी सहायकांना श्रेणी व पदोन्नतीची प्रतीक्षा

Next

पाठपुराव्यानंतरही दुर्लक्ष : पुन्हा न्यायालयात जाण्याची तयारी
यवतमाळ : विविध विभागात कार्यरत असलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सहायकांना कनिष्ठ अभियंत्याची वेतनश्रेणी आणि पदोन्नतीची प्रतीक्षा आहे. या बाबी लागू व्हाव्या यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात आला. यानंतर न्यायालयीन लढाई लढण्यात आली. यानंतरही प्रत्यक्ष लाभ मिळाला नाही.
जिल्हा परिषद, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदी विभागामध्ये जिल्ह्यात जवळपास ५०० स्थापत्य अभियांत्रिकी सहायक कार्यरत आहेत. त्यांना कनिष्ठ अभियंत्यांची वेतनश्रेणी लागू करण्यात आलेली नाही. मात्र दुसरीकडे ही वेतन श्रेणी देताना दुजाभाव करण्यात आला. काही जणांना १९९४ पासून तर काहींना १९९९ पासून ही वेतनश्रेणी लागू करण्यात आली. वेतनश्रेणीतील या विसंगतीमुळे अनेक सहायक हक्काच्या वेतनश्रेणीपासून वंचित राहिले.
शिवाय जिल्ह्यातील जवळपास २५० सहाय्यक पदोन्नतीपासून वंचित आहेत. त्यांना पदोन्नती देण्यासाठी चालढकल करण्यात येत आहे. मंत्रालयस्तरावर या मागणीसाठी पाठपुरावा करण्यात आला. परंतु कुणीही ही बाब गांभीर्याने घेतली नाही. आता या प्रश्नांना घेऊन पुन्हा न्यायालयात जाण्याची तयारी महाराष्ट्र राज्य स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संघाने दर्शविली आहे. यासंदर्भात विचारविनीयम करण्यासाठी ७ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता येथील मेडिकल चौकातील जिल्हा परिषद धर्मशाळा येथे सभा घेण्यात येत असल्याचे संघाचे जिल्हा उपाध्यक्ष आर.एन. विठाळकर यांनी सांगितले. या बैठकीला उपस्थित राहावे अशी विनंती करण्यात आली आहे. (वार्ताहर)

आर्थिक नुकसान
स्थापत्य अभियांत्रिकी सहायकांवर बांधकामावर देखरेख, कामाचा दर्जा तपासणे आदी कामांची जबाबदारी सोपविली जाते. कनिष्ठ अभियंत्यांच्या समकक्ष कामे त्यांना करावी लागतात. मात्र या पदाची वेतनश्रेणी आणि पदोन्नती त्यांना दिली जात नाही. न्यायालयाच्या आदेशाने काही लोकांना वेतनश्रेणी मिळाली. परंतु थकबाकीचा लाभ मिळालेला नाही. ही वेतनश्रेणी लागू न झाल्यास निवृत्ती वेतनही कमी मिळणार आहे. याप्रकारात त्यांचे नुकसान होणार आहे. शिवाय पदोन्नती न मिळाल्यास त्या दर्जाचे वेतन आणि सेवानिवृत्ती वेतनही त्यांना मिळणार नाही अशी परिस्थिती आहे.

Web Title: Waiting for the category and promotions for engineering assistants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.