होमगार्डच्या ३५१ जागांसाठी तब्बल दहा हजार उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 09:40 PM2019-03-14T21:40:39+5:302019-03-14T21:41:51+5:30

गृहरक्षक दलाच्या (होमगार्ड) जवानांसाठी गुरुवारपासून यवतमाळातील पोलीस ग्राऊंडवर (पळसवाडी कॅम्प) भरती सुरू झाली. ३५१ जागांसाठी तब्बल दहा हजारांवर सुशिक्षित बेरोजगारांनी गर्दी केल्याने प्रशासनाचे नियोजन कोलमडले होते. काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

Ten thousand candidates for 351 seats in Home Guard | होमगार्डच्या ३५१ जागांसाठी तब्बल दहा हजार उमेदवार

होमगार्डच्या ३५१ जागांसाठी तब्बल दहा हजार उमेदवार

Next
ठळक मुद्देउच्चशिक्षितांचा सहभाग : गर्दी आवाक्याबाहेर, गोंधळाची स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गृहरक्षक दलाच्या (होमगार्ड) जवानांसाठी गुरुवारपासून यवतमाळातील पोलीस ग्राऊंडवर (पळसवाडी कॅम्प) भरती सुरू झाली. ३५१ जागांसाठी तब्बल दहा हजारांवर सुशिक्षित बेरोजगारांनी गर्दी केल्याने प्रशासनाचे नियोजन कोलमडले होते. काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
होमगार्डच्या ३५१ जागांसाठी पळसवाडी कॅम्प स्थित पोलीस ग्राऊंडवर भरती घेण्यात येत आहे. या भरतीसाठी रात्रीपासूनच उमेदवारांनी यवतमाळात ठिय्या दिला होता. सकाळी तर बसस्थानक चौक व परिसरात युवकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. ही गर्दी आवाक्याबाहेर गेल्याने यंत्रणेचे नियंत्रण कोलमडले. या भरतीसाठी दिवसअखेर साडेतीन हजार उमेदवारांची नोंद पहिल्या दिवशी झाली. त्यातील ५०० उमेदवारांची चाचणी घेण्यात आली. शुक्रवारी सकाळी ५ वाजतापासून पुन्हा भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांमध्ये बीए, एमए, बीएड, एमएड, डीएड आदी उच्चशिक्षितांचा समावेश आहे. मुळात या पदासाठी दहावी उत्तीर्ण हीच शैक्षणिक पात्रता होती. या भरतीसाठी १६०० मीटर धावणे व गोळा फेक ही शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे. इनकॅमेरा भरती होत असून कुणाला आक्षेप असल्यास कॅमेरात पुन्हा पाहणी करता येणार आहे. शनिवारपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. त्यामुळे बेरोजगार युवकांना आणखी येथे दोन दिवस काढावे लागणार आहे. भरतीच्या ठिकाणी गर्दीमुळे रेटारेटी झाल्याने काही काळ गोंधळ उडाला. उन्ह असताना विद्यार्थ्यांसाठी सावलीची व्यवस्था नसल्याने त्यांना भरती स्थळाच्या परिसरातील झाडांखाली आश्रय घ्यावा लागला. तेथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने अडचणीत आणखी भर पडली. या बेरोजगारांचा मुक्काम लांबणार असल्याने त्यांच्या खान्यापिण्याचे वांदे झाले आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढे येण्याची प्रतीक्षा आहे.
या होमगार्डला ५७० रुपये रोज दिला जाणार आहे. वर्षभरात किमान तीन महिने काम मिळण्याची हमी आहे. होमगार्डचे हे पद कंत्राटी व हंगामी राहणार आहे.

अनुभवी होमगार्डला डावलले
होमगार्डमध्ये ६० ते ९० रुपये रोज असताना अनेक वर्ष काम केलेल्या जवानांना आता ५७० रुपये रोज झाल्याने अनुभवामुळे भरतीत प्राधान्य मिळणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात त्यांना डावलले गेले. त्यांचा विचारच झाला नाही. ४० टक्के बंदोबस्त, ४० टक्के परेड या निकषात न बसणारे होमगार्ड अपात्र ठरले. त्यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याची भावना वसंता लोंढे, अशोक साबळे, वंदना भालेराव या काही जुन्या होमगार्डनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

तीन दिवस ही भरती चालणार आहे. साडेतीन हजार उमेदवारांची नोंदणी झाली असून त्यात उच्चशिक्षितांचा समावेश आहे. पारदर्शक पद्धतीने ही भरती घेतली जाणार आहे.
- अमरसिंह जाधव
प्रभारी जिल्हा समादेशक,
होमगार्ड यवतमाळ.

Web Title: Ten thousand candidates for 351 seats in Home Guard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.