शिवसेना नेत्यांचे अखेर मनोमिलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 11:41 PM2019-02-20T23:41:48+5:302019-02-20T23:42:30+5:30

शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या परस्पर नियुक्तीवरून येथील शिवसेना नेते संजय राठोड व भावना गवळी यांच्यात कमालीचे वितुष्ट आले होते. दीड वर्षांपासून हे दोन्ही नेते एका व्यासपीठावरही आले नाहीत. मात्र ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या नेत्यांचे मनोमिलन करण्यात ‘मातोश्री’ला यश आले.

The Shiv Sena leaders are finally in the mood | शिवसेना नेत्यांचे अखेर मनोमिलन

शिवसेना नेत्यांचे अखेर मनोमिलन

Next
ठळक मुद्देशिवसेना भवनात एकत्र : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसैनिकांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या परस्पर नियुक्तीवरून येथील शिवसेना नेते संजय राठोडभावना गवळी यांच्यात कमालीचे वितुष्ट आले होते. दीड वर्षांपासून हे दोन्ही नेते एका व्यासपीठावरही आले नाहीत. मात्र ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या नेत्यांचे मनोमिलन करण्यात ‘मातोश्री’ला यश आले.
वाशिम व यवतमाळच्या शिवसेना जिल्हा प्रमुखाची नियुक्ती महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी आपल्याला विश्वासात न घेता परस्पर केल्याच्या मुद्यावरून खासदार भावना गवळी यांनी नाराजी व्यक्त केली होती. एवढेच नव्हे तर त्यांनी या नियुक्तीला थेट ‘मातोश्री’ गाठून स्थगनादेशही मिळविला होता. एवढेच नव्हे तर नंतर तार्इंनी नांदेडच्या धर्तीवर आपल्या सोईने तीन जिल्हा प्रमुखांचा पॅटर्नही लागू करून घेतला. तेव्हापासून ना. राठोड व खा. गवळी यांच्यात वितुष्ट आले. निकटवर्तीय संधीसाधू कार्यकर्त्यांच्या ‘लूज टॉक’मुळे हे वितुष्ट आणखी वाढत गेले. गेल्या एक-दीड वर्षात तर या दोन्ही नेत्यांनी एकावेळी एका व्यासपीठावर येणेही टाळले. नेत्यांच्या या भांडणात शिवसैनिकही विखुरले गेले. त्यातूनच विविध औचित्यांनी जिल्हाभर झळकणाऱ्या फलकांवरून कधी भावनाताई तर कधी संजय राठोड दिसून आले नाही. मात्र शिवसेनेतील सामान्य कार्यकर्त्यांची भावना ही दोन्ही नेत्यांनी एकत्र यावे, अशीच होती. काही शिवसैनिक गटातटात विखुरले असताना निष्ठावंत मात्र आमचा गट एकच शिवसेना, असे ठासून सांगत होते. मात्र आगामी निवडणुकांच्या दृष्टीने नेत्यांमधील ही दुही पक्षासाठी हिताचे नसल्याचे हे शिवसैनिक वारंवार सांगत होते. याच दृष्टीने ‘मातोश्री’वरूनही प्रयत्न झाले. मात्र दोन-तीन बैठका व्यर्थ ठरल्या. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत ‘तार्इंना काम करू द्या, मी थांबतो’ अशी भूमिका राठोड यांनी मांडली. त्यानुसार ते वागलेसुद्धा. दरम्यान त्यांनी समाज बांधवांचा मेळावा घेऊन आपली ताकदही पक्ष व तार्इंना दाखवून दिली.
नेत्यांमधील हा वाद मिटण्याची चिन्हे नव्हती. निवडणुकीच्या तोंडावर हा वाद कायम राहिल्यास पक्षाला नुकसान होण्याची, वेळप्रसंगी यवतमाळ-वाशिमची लोकसभेची जागा जाण्याची हूरहूर शिवसेना नेतृत्वाला वाटली. त्यामुळेच या नेत्यांना वाद मिटविण्यासाठी अल्टीमेटम देण्यात आला. अखेर बुधवारी शिवसेना भवनात या नेत्यांचे मनोमिलन झाले. त्यांचे एकत्र फोटोही व्हायरल करण्यात आले.

मतमोजणीनंतरच होणार संभ्रम दूर
ज्या जिल्हा प्रमुखाच्या नियुक्तीवरून हा वाद उफाळला होता तेसुद्धा या मनोमिलनाचे साक्षीदार बनले. शिवसेना भवनातील एकत्र फोटोवरून दोन्ही नेत्यांमधील मतभेद मिटल्याचे दिसत आहे. मात्र त्यांच्यात मनभेद कायम तर नाही ना, अशी हूरहूर शिवसैनिकांमध्ये कायम आहे. हे मतभेद खरोखरच मिटले की नाही हे मात्र लोकसभा निवडणुकीतील मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल, एवढे निश्चित.

Web Title: The Shiv Sena leaders are finally in the mood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.