वृद्ध व निराधारांचा आक्रोश

By Admin | Published: March 25, 2015 12:01 AM2015-03-25T00:01:52+5:302015-03-25T00:01:52+5:30

तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत विविध योजनानिहाय लाभ घेणाऱ्या अनेक निराधारांना गेल्या तीन महिन्यांपासून अनुदानच मिळाले नाही.

Resentment of Older Persons | वृद्ध व निराधारांचा आक्रोश

वृद्ध व निराधारांचा आक्रोश

googlenewsNext


मारेगाव : तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत विविध योजनानिहाय लाभ घेणाऱ्या अनेक निराधारांना गेल्या तीन महिन्यांपासून अनुदानच मिळाले नाही. अनुदान न मिळाल्याने निराधारांमध्ये प्रचंड आक्रोष सुरू झाला आहे.
विविध निराधार योजनांचे लाभार्थी नियमित संबंधित बँकेत जाऊन ‘आमचा पगार आला काजी साहेब’, अशी विचारणा करीत आहे. नुकतेच जानेवारी, फेब्रुवारी या दोन महिन्याचे अनुदान बँकांना पाठविण्यात आले. मात्र त्यात अनेकांची नावे नाहीत. १५ ते २० वर्षांपासून नियमित लाभ घेणाऱ्या निराधारांचे अनुदान अचानक बंद झाल्याने वृद्ध निराधार चांगलेच धास्तावले आहे. यातील काही मरनासन्न अवस्थेत, तर काही अपंग आहे. काहींना धड चालता येत नाही, अशी या निराधारांची अवस्था आहे.
तहसीलमधील संजय गांधी योजना सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विविध योजनाअंतर्गत अनुदान घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या अर्जाची छाननी करण्यात आली आहे. त्यात ज्यांचे अर्ज मिळाले नाही, त्याचे अनुदान तात्पुरते थांबविण्यात आल्याची माहिती देण्यात आली. गेल्या २० ते २५ वर्षांपासून काही लाभार्थी सदर मदत घेत आहे. अनुदान मंजूर करताना त्या लाभार्थ्यांनी अर्ज केले होते. त्या अर्जाला समितीने मंजुरी दिल्यानंतरच लाभार्थ्यांना प्रथम मनिआॅर्डरने व नंतर २००१ पासून बँकेमार्फत अनुदान मिळत आहे. लाभधारकांचे अर्ज, समितीचे प्रोसिडींग सांभाळून ठेवणे संबंधित संजय गांधी निराधार योजनेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे काम होते. मात्र अचानक लाभार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर अर्ज गहाळे होणे, सोबतच प्रोसेडिंग गहाळ होणे, अशा गोष्टी घडल्या आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांची बेपर्वा वृत्ती समोर आली. त्याचा नाहक त्रास मात्र निराधारांना होत आहे. आता लाभार्थ्यांचे अर्ज नाही म्हणून, त्यांचे अनुदान थांबविणे बरोबर आहे काय ?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. लाभार्थ्यांकडून आता नव्याने अर्ज भरून घेतले जाणार आहे. याचाच अर्थ लाभार्थ्यांना मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास होणार आहे. त्यांना तोपर्यंत अनुदानापासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे तोपर्यंत त्यांनी उपजिवीका कशी करावी, असा प्रश्न आहे. तहसीलने आपली कागदी कारवाई करावी, मात्र नियमित लाभाधारकाचे अनुदान बंद करू नये, अशी लाभार्थ्यांची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)

माहिती देण्यास टाळाटाळ
निराधारांचे अनुदान थांबविण्याची कारणे देण्याची माहिती अधिकारात जनमाहिती अधिकाऱ्यांकडे माहिती मागण्यात आली. मात्र जनमाहिती अधिकाऱ्यांनी संबंधित अव्वल कारकुणाशी संपर्क साधावा, असे सूचवून आपली जबाबदारी झटकली. संबंधितांना अद्याप ही माहिती दिली नाही. एकाचवेळी संजय गांधी, श्रावण बाळ अशा अनेक योजनांच्या किमान ६०० ते ७०० निराधारांचे अनुदान थकले आहे. त्यामुळे निराधारांवर अन्याय होत आहे. तशी त्यांची भावना झाली आहे. लोकप्रतिनिधी मात्र अद्याप मूग मिळून बसले आहे. कार्यालयातून अर्ज गहाळ झाल्याचे प्रकरण अत्यंत गंभीर असून जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची तातडीने दखल घेण्याची गरज आहे. या प्रकरणाची त्वरित चौकशी करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Resentment of Older Persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.