शासकीय कार्यालयांची अग्निशमन यंत्रणा रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 09:58 PM2019-04-28T21:58:16+5:302019-04-28T21:59:28+5:30

तहान लागल्यावर विहीर खोदणे, हा प्रकार प्रशासन नेहमीच करते. मात्र आग लागल्यावर पाणी शोधणे हाही प्रकार आता केला जात आहे. ४५ अंशांपर्यंत चाललेल्या तापमानामुळे इमारतींमध्ये आगी लागण्याची दाट शक्यता आहे.

Ram Bharosse Fire Service System of Government Offices | शासकीय कार्यालयांची अग्निशमन यंत्रणा रामभरोसे

शासकीय कार्यालयांची अग्निशमन यंत्रणा रामभरोसे

Next
ठळक मुद्देफायरचे डिझाईन नावालाच : पाईप गायब, फायर फायटिंगची सहामाही तपासणी नाही, गॅस सिलिंडरचा अभ्यास नाही

रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : तहान लागल्यावर विहीर खोदणे, हा प्रकार प्रशासन नेहमीच करते. मात्र आग लागल्यावर पाणी शोधणे हाही प्रकार आता केला जात आहे. ४५ अंशांपर्यंत चाललेल्या तापमानामुळे इमारतींमध्ये आगी लागण्याची दाट शक्यता आहे. महत्त्वाचे दस्तावेज असलेल्या शासकीय कार्यालयांना तर हा धोका अधिक आहे. मात्र यवतमाळातील सारीच कार्यालये याबाबत गाफील असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत आढळले.
कार्यालयांमध्ये लावलेल्या ‘फायर फायटिंग’चे बॉक्स शोभेपुरते आहेत. अनेक बॉक्समध्ये गॅस वाहून नेणारे पाईप नाहीत. तर काही ठिकाणी नाममात्र गॅससिलिंडर लावून आहेत. विशेष म्हणजे, हे साहित्य कशासाठी आहे, याची कर्मचाऱ्यांनाच माहिती नाही. मग आग लागली तर या साहित्याचा वापर कोण करणार, हा प्रश्न आहे.
अग्निशमन यंत्रणेचे डिझाईन इमारतीला बसविण्यात आले आहे. मात्र हे डिझाईन केवळ शोभेच्या वस्तूप्रमाणे लटकून आहे. त्यातील अत्यावश्यक साहित्य दिसेनासे झाले आहे. शासकीय कार्यालयाच्या इमारतींचे नियमित फायर आॅडिट होणे गरजेचे असूनही त्याबाबतीत उदासीनता आहे.
जिल्हा परिषदेची इमारत अग्निशमनाच्या बाबतीत सर्वाधिक असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले. या ठिकाणी आग रोखण्यासाठी फायर फायटिंगची अद्ययावत यंत्रसामुग्री नाही. वित्त विभाग, सामान्य प्रशासन, समाजकल्याण, शिक्षण, पंचायत, पाणीपुरवठा आणि इतर विभागांमध्ये आग विझविणारे सिलिंडर दिसले नाही.
जिल्हा बँकेच्या मुख्यालयाची अवस्थाही बिकट आहे. या ठिकाणी फायर फायटिंगची व्यवस्था नाही. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षाबाहेर केवळ दोन सिलिंडर दिसतात. हे सिलिंडर अपुरे आहेत.
नगरपरिषद इमारतीचीही अवस्था अशीच आहे. या ठिकाणी फायर फायटिंग उभारण्यात आली आहे. मात्र त्याचे पाईप अनेक ठिकाणी गायब आहेत. यामुळे या ठिकाणचे पाईप बॉक्स रिकामे दिसतात. दर सहा महिन्यांनी या फायरची तपासणी होणे आवश्यक आहे. मात्र तपासण्या होताना कधीच दिसले नाही. यामुळे आग लागल्यास ही यंत्रणा कार्यान्वित करताना मोठी कसरत करावी लागणार आहे.
उद्योग भवनाची अवस्था यापेक्षाही भयंकर आहे. जिल्हा उद्योग केंद्राच्या कार्यालयात फायर फायटिंग उभारण्यात आले आहे. त्याचे पाईप आणि विविध साहित्य या ठिकाणी दिसत आहे. यामुळे हे फायर फायटिंग शोभेचीच वस्तू ठरले आहे. त्याला पर्याय म्हणून प्रत्येक कार्यालयात सिलिंडर आहे. त्याचे प्रशिक्षण मात्र अनेक कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले नाही.
तहसील कार्यालयात आग नियंत्रणासाठी गॅस सिलिंडरचा वापर करण्यावरच भर देण्यात आला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सिलिंडर आहेत. मात्र, ते वापरण्याबाबत कर्मचारी पुरेसे दक्ष नाहीत.
कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची गरज
जिल्हाभरातील शासकीय कार्यालयात अग्निशमन व्यवस्थेचे कमी अधिक प्रमाणात डिझाईन झाले. प्रत्यक्षात ही यंत्रणा चालू आहे किंवा नाही, याची पाहणी दर सहा महिन्यांनी होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने पाहणीच होत नाही. यामुळे फायरची यंत्रणा शोभेची वस्तू ठरली आहे. आग लागल्यास गॅस सिलिंडरचा वापर कसा करायचा याचे प्रशिक्षणही अनेक कर्मचाऱ्यांना नाही.
जिल्हाधिकारी कार्यालयात केवळ सिलिंडर
संपूर्ण जिल्ह्याचा कारभार हाताळणाºया जिल्हाधिकारी कार्यालयात अग्निशमनासाठी फायर फायटिंगची अद्ययावत यंत्रणा नाही. मात्र सिलिंडर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पहायला मिळतात. अस्थापना विभागात सर्वाधिक सिलिंडर दृष्टीस पडतात.

Web Title: Ram Bharosse Fire Service System of Government Offices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.