एसटी कर्मचाऱ्यांची बँक फोडणाऱ्या चोरट्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 15:34 IST2018-10-28T15:30:17+5:302018-10-28T15:34:11+5:30
भरदिवसा आणि वर्दळ असलेल्या बसस्थानकातील बँकेत चोरी करताना चोरट्याला पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांची बँक फोडणाऱ्या चोरट्याला अटक
यवतमाळ - भरदिवसा आणि वर्दळ असलेल्या बसस्थानकातील बँकेत चोरी करताना चोरट्याला पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. या चोरट्याने सब्बल व कटरच्या सहाय्याने बँकेचे लॉकर फोडण्याची तयारी केली होती. ही घटना रविवारी दुपारी १२.३० वाजता उघडकीस आली.
शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या दुसऱ्या माळ्यावर एसटी कर्मचाऱ्यांची बँक आहे. रविवार असल्याने ही बँक बंद होती. बसस्थानक परिसरातच फिरणाऱ्या एका मूकबधीर व्यक्तीने याच संधीचा फायदा घेत बँक फोडण्याचा प्रयत्न केला. त्याने बँकेच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. सोबत आणलेली सब्बल, कटर याच्या मदतीने तो लॉकर तोडण्याच्या तयारीत होता. याच दरम्यान बसस्थानकातील एसटी कर्मचाऱ्याला बँकेचे लॉक तुटलेले दिसले. रात्री बँकेत चोरी झाल्याचा समज करून त्यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पोलीस तत्काळ घटनास्थळावर पोहोचले. बँकेचे दार आतून बंद असल्याने पोलिसांना संशय आला. आरोपी निश्चितच बँकेच्या आत आहे हे हेरुन तत्काळ दार तोडण्यात आले. आतमध्ये सबलीने व कटरच्या मदतीने लॉकर तोडण्याचा प्रयत्न एक व्यक्ती करीत होती. त्याला लगेच ताब्यात घेऊन अवधूतवाडी पोलीस ठाण्यात आले. ती व्यक्ती मूकबधीर असल्याने स्वत:चे नाव, गाव, पत्ता सांगू शकत नव्हती. पोलिसांचे त्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू होते. वृत्तलिहिस्तोवर याप्रकरणी कुठलीही तक्रार दाखल झाली नव्हती.