यवतमाळ जिल्ह्यातील राळेगावात एकच चर्चा, नळ कधी येणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 02:31 PM2019-05-11T14:31:07+5:302019-05-11T14:33:31+5:30

‘तहान लागल्यावर विहीर खोदणे’, अशी मराठीत एक म्हण आहे. येथील नागरिक गेल्या दोन वर्षांपासून शब्दश: या म्हणीचा प्रत्यय घेत आहे.

people is waiting for water in Ralegaon in Yawatmal district | यवतमाळ जिल्ह्यातील राळेगावात एकच चर्चा, नळ कधी येणार?

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगावात एकच चर्चा, नळ कधी येणार?

Next
ठळक मुद्देनागरिक वैतागलेशासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी झाले कोडगेपाण्यासाठी नागरिकांची भटकंती

के.एस. वर्मा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ‘तहान लागल्यावर विहीर खोदणे’, अशी मराठीत एक म्हण आहे. येथील नागरिक गेल्या दोन वर्षांपासून शब्दश: या म्हणीचा प्रत्यय घेत आहे. मे महिना अर्ध्यावर आला तरीही पाणीटंचाईच्या झळा कायम आहे. मात्र नगरपंचायत, लोकप्रतिनिधी व शासनाचे प्रयत्न अद्यापही केवळ सुरुच आहे. त्यामुळे शहरात केवळ एकच चर्चा आहे, नळ कधी येणार.
राळेगावात पाणीटंचाईने कहर केला आहे. मे महिन्यातही आत्तापर्यंत अनेक प्रभागात पाणी पुरवठा झाला नाही. अनेक वार्डात महिन्यातून एखाद्या वेळीच काही तासापुरता पाणी पुरवठा केला जातो. पाण्यासारख्या मूलभूत सुविधासुद्धा संबंधित संस्था, जनतेचे प्रतिनिधी पुरवू शकत नाही. दुसरीकडे तालुक्यात असलेल्या ८० किलोमीटर महामार्गावर दररोज अपघात होत आहे.
तालुक्यातील कळमनेरजवळील वर्धा नदीच्या डोहातून राळेगावला पाणी पुरवठा करून नागरिकांची तहान भागविण्याचे एकमेव प्रयत्न नगरपंचायतीद्वारे सुरू आहे. महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाने दिलेले २० सबमर्सिबल पंप, मोठ्या हॉर्स पावरची मोटारपंप, तेथे बसविण्यात आली. यामुळे कमी वेळात पाणी टाकी भरली जाऊन जादा वेळ नळाला पाणी सोडण्याचे नियोजन आहे. यातूनही आठ, दहा दिवसाआड पाणी मिळण्याची शक्यता आहे. कोरड्या पडलेल्या वर्धा नदीत हा डोह राळेगावसाठी आता एकमेव आधार आहे. त्यातील पाणी हिरवट, मातकट आहे. शुद्धीकरणाच्या प्रयत्नानंतरही त्याला उग्र दर्प येत आहे. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी साचलेल्या या पाण्याच्या सेवनाने नागरिकांना आजार बळावण्याची शक्यता आहे.
पाणीटंचाईमुळे नागरिकांनी लग्नकायर्य, शुभकार्य घरी करण्याऐवजी मंगल कार्यालय वा शहरात करण्यास सुरूवात केली आहे. पाहुण्यांना घरी येण्यास नम्रपणे मनाई केली जात आहे. नळाची वाट पाहता आपापल्या कामावर जाण्या-येण्याच्या नियोजनावर फरक पडला आहे. शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मात्र कोडगे झाल्याचे दिसत आहे.
हातपंप, विहीरी, तलाव खोलीकरण, जलसंधारणाची कामे दुर्लक्षित
नगरपंचायत पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यात असमर्थ ठरली आहे. १७ हातपंप यावर्षी घेण्याचे नियोजन होते. शासनाद्वारे सुद्धा काही हापतंप मंजूर करण्यात आले होते. मात्र अद्याप टेंडर निघाले नाही. शहरात ३८ सार्वजनिक विहिरी आहे. त्या स्वच्छ करणे, गाळ काढणे, त्यावर मोटारी बसवून कार्यान्वित करण्याची कामे हाती घेण्यात आली नाही. नगरपंचायतीने टँकरही सुरू केले नाही. शासनाचे दोन जम्बो टँकर येणार असल्याची १५ दिवसांपासून केवळ चर्चाच सुरू आहे. शहराची भूजल पातळी एकमेव तलावाच्या पाण्यावर निर्भर आहे. मात्र तलाव कोरडा होऊनही खोलीकरणाकडे लक्ष देण्यात आले नाही. लोकवर्गणीत मोठी रक्कम गोळा होऊनही तलाव खोलीकरणाचे काम अर्धवट सोडून देण्यात आले. त्यामुळे भूजल पातळी खालावून विहिरी, बोअर कोरडे पडू लागले. जलसंधारण, रेन वॉटर हॉर्वेस्टींगची कामे करण्यास हिच महत्वाची वेळ असताना नगरपंचायत प्रशासन, पदाधिकारी गप्प आहे.
आमदार म्हणतात, नगरपंचायतीचा आपल्याशी संपर्कच नाही
आमदार प्रा.डॉ.अशोक उईके यांनी पाणीटंचाई संदर्भात नगराध्यक्षांनी आत्तापर्यंत आपल्याशी कधीच संपर्क केला नाही, असे स्पष्ट केले. ते म्हणाले, कळमनेर येथील वर्धा नदीच्या डोहात पावसाळ्यापर्यंत पुरेल इतके मुबलक पाणी आहे. यामुळे बेंबळा धरणातून वर्धा नदीत पाणी सोडण्याचा जिल्हा प्रशासनाने निर्णय स्थगीत केला. वर्धा नदीत पाणी सोडण्यास नऊ लाख रुपये खर्च येणार होता. तो वाचविण्यात आला. शहरात पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्याची जबाबदारी नगरपंचायतने पूर्ण करावी. नगरपंचायत अध्यक्षांनी पाणीटंचाई संदर्भातील कोणत्याही प्रश्नावर कधी भेट घेतली नाही, निवेदन दिले नाही, वा फोनद्वारेही कधी संपर्क केला नाही, असे आमदार प्रा.डॉ.उईके यांनी सांगितले.
अमृत योजना राबविण्याची मागणी
राळेगाव व कळंब या तालुका मुख्यालयांची पाणी समस्या कायमची दूर करण्याकरिता यवतमाळच्या धर्तीवर ‘अमृत’ योजनेप्रमाणे येथेही बेंबळा धरणातून पाणी पुरवठा पाईपलाइनच्या माध्यमातून करण्याची नितांत गरज आहे. नगरविकास विभागाकडे याबाबत प्रस्ताव सादर करून आगामी अर्थसंकल्पात त्याला मंजुरी मिळविण्याचे प्रयत्न झाल्यास पुढील उन्हाळ्यापूर्वीच ही योजना आकार घेऊ शकते. त्यासाठी खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. विरोधकांनीसुद्धा मतभेद बाजूला सारून ही मागणी शासनापुढे लावून धरणे आवश्यक आहे.
सामाजिक संघटना, दानशूर गेले कुठे ?
शहरात तीव्र पाणीटंचाई असूनही सामाजिक संघटनांनीसुद्धा एकही पाणपोई सुरू केली नाही. शासकीय कार्यालयांत पिण्याच्या पाण्याची सोय आहे. मात्र जनावरांसाठी पाण्याचे पाणवठे नसल्याने मुकी जनावरे तडफडत आहे. शहरात अद्याप एकाही दानशूराने टँकरद्वारे पाणी पाजून जलसेवा करण्याचे सौजन्य दाखविलेले नाही. कोरड्या बोअर, विहिरींमुळे शेजाऱ्यांना इच्छा असूनही पाणी देणे शक्य होत नाही. नगरपंचायतीच्या उदासीनेतेमुळे यापेक्षा ग्रामपंचायत बरी होती, असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

Web Title: people is waiting for water in Ralegaon in Yawatmal district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.