नव्याने समाविष्ठ झालेल्या वसाहतींची दुुर्दशा

By admin | Published: July 28, 2016 01:09 AM2016-07-28T01:09:06+5:302016-07-28T01:09:06+5:30

मोठा गाजावाजा करून येथील नगरपरिषदेच्या हद्दीत समाविष्ठ झालेल्या वसाहतींची दुर्दशा अद्यापही संपली नाही.

Newly organized colonies | नव्याने समाविष्ठ झालेल्या वसाहतींची दुुर्दशा

नव्याने समाविष्ठ झालेल्या वसाहतींची दुुर्दशा

Next

 पांढरकवडा नगरपरिषदेचे दुर्लक्ष : वसाहतींमध्ये पथदिवे, रस्ता, पक्क्या नाल्या, पाणी पुरवठा योजनेचा अभाव
पांढरकवडा : मोठा गाजावाजा करून येथील नगरपरिषदेच्या हद्दीत समाविष्ठ झालेल्या वसाहतींची दुर्दशा अद्यापही संपली नाही. हद्दवाढ झाल्यानंतर या वसाहतींना अच्छे दिन येतील, अशी अपेक्षा होती. परंतु अद्यापही या वसाहतींमध्ये पाहिजे त्या प्रमाणात सुविधा पुरविण्यात आलेल्या नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.
गेल्या दोन वर्षांपूर्वी शहराला लागून असलेल्या मंगलमूर्ती ले-आऊट, बेतवार ले-आऊट, पटेल ले-आऊट, श्याम नगरी-२, पोसवाल ले-लाऊट, आशियाना ले-आऊट, राधेय नगरी, जंगाबाई टेकडी परिसर, रामकृष्ण नगर, चिंतामणी ले-आऊट, आदी परिसर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक एक व दोनमध्ये समाविष्ठ करण्यात आला. मतदारांची संख्या वाढल्यामुळे हा संपूर्ण भाग नगरपरिषद क्षेत्रामध्ये आल्याने दोन सदस्य निवडून देण्यासाठी गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात निवडणुकसुद्धा झाली. या निवडणुकीत मंजुषा तिरपुडे व विशाल सिडाम हे काँग्रेसचे दोन सदस्य निवडून आलेत.
या दोन जागांसाठी निवडणूक होऊन वर्षे उलटून गेले तरी नगरपरिषद हद्दीत समाविष्ठ झालेल्या या भागाचा विकास अद्यापही झालेला नाही. अनेक वसाहतीत अजुनही पथदिवे लावण्यात आले नाही. रस्त्यांची कामे झाली नाही. या सर्व परिसरातील नाल्या तुंबलेल्या अवस्थेत दिसून येत आहे. या नाल्यांची नियमित साफसफाई केल्या जात नाही. विशेष म्हणजे या वसाहतीतील नागरिकांकडून नगरपरिषदेने वार्षिक करसुद्धा वसूल केलेला आहे. परंतु तेथे पाणी पुरवठ्याचीसुद्धा व्यवस्था करण्यात आली नाही. पाणी पुरवठा करण्यासाठी पाईपलाईनच टाकण्यात आली नाही. काही भागात पाईपलाईन टाकण्यात आली. परंतु ती पाईपलाईन तशीच पडून असल्यामुळे हे काम अर्धवट अवस्थेत आहे. या प्रभागामध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. मात्र त्याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही.
तत्कालिन नगराध्यक्ष शंकर बडे यांनी मंत्रालयात सतत पाठपुरावा करून नगरपरिषदेची हद्दवाढ करून घेतली होती. त्यांनी यासाठी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मंत्री शिवाजीराव मोघे यांची मदत घेतली होती. नगरविकास मंत्रालयाकडे सतत पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नाला यश येऊन शासनाने नगरपरिषदेला हद्दवाढीची परवानगी दिली. रितसर हा भाग नगरपरिषदेत समाविष्ठ करण्यात आला. वाढीव क्षेत्रासाठी दोन सदस्य संख्याही वाढली. १७ वरून १९ सदस्यसंख्या झाली. त्यानंतर शंकर बडे यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपला व नगराध्यक्षपद हे महिलांसाठी राखीव असल्यामुळे गेल्या ३० जून रोजी वंदना रॉय या नगराध्यक्ष झाल्या. या कालावधीत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. नगरपरिषदेला पूर्ण वेळ अभियंताच नव्हता. त्यामुळे विकासाची बरीच कामे खोळंबली. ठाकरे ले-आऊटमधील नाल्याचे काम कित्येक दिवसांपासून अर्धवट स्थितीत आहे. या नाल्यांचे पाणी इतरत्र पसरून घाणीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही त्याकडे कोणी लक्ष देत नाही. (तालुका प्रतिनिधी)

विकासात्मक कामांना लवकरच सुरूवात - नगराध्यक्ष रॉय
नगरपरिषदेच्या हद्दीत समाविष्ठ झालेल्या क्षेत्राचा विकास करण्याची कार्यवाही सुरू झाली असून या वाढीव क्षेत्राचा तातडीने विकास करण्यात येइल. या गोष्टीला प्राधान्य देण्यात येईल, अशी माहिती नगराध्यक्ष वंदना रॉय यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. नगरपरिषदेच्या अभियंत्यांची येथून बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर पूर्णवेळ अभियंता देण्यात न आल्यामुळे अनेक खोळंबल्याचे त्यांनी मान्य केले. हद्दवाढ झालेल्या क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात निधी असून तातडीने विकासात्मक कामे करण्यात येणार असल्याचेही वंदना रॉय यांनी सांगितले.

Web Title: Newly organized colonies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.