‘लोकमत’ सरपंच विजेत्या १३ ग्रा. पं.ना प्रत्येकी १० लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 08:55 AM2024-03-15T08:55:37+5:302024-03-15T08:57:43+5:30

यवतमाळ येथील ॲवार्ड सोहळा थाटात संपन्न : डॉ. विजय दर्डा यांच्या मागणीनंतर पालकमंत्री संजय राठोड यांची घोषणा

lokmat sarpanch award 2024 distribution ceremony was held in yavatmal | ‘लोकमत’ सरपंच विजेत्या १३ ग्रा. पं.ना प्रत्येकी १० लाख

‘लोकमत’ सरपंच विजेत्या १३ ग्रा. पं.ना प्रत्येकी १० लाख

लोकमत न्यूज नेटवर्क, यवतमाळ : ‘लोकमत’चा सरपंच अवॉर्ड सोहळा ग्रामीण भागात विकासात्मक कामे करणारे सरपंच, तसेच ग्रामसेवकांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देणारा आहे. ‘लोकमत’ने सुरू केलेला हा उपक्रम एका अर्थाने ग्रामीण भागाच्या विकासासाठीची चळवळ असल्याचे गौरवोद्गार काढत ‘लोकमत’ सरपंच अवॉर्ड विजेत्या यवतमाळ जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींना नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी ‘डीपीसी’तून प्रत्येकी दहा लाखांचा निधी देत असल्याची घोषणा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केली.

‘लोकमत सरपंच अवॉर्ड - २०२४’ वितरण सोहळा गुरुवारी यवतमाळ येथील दर्डा मातोश्री सभागृहात थाटात पार पडला. अध्यक्षस्थानी ‘लोकमत’ एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन, माजी राज्यसभा सदस्य डाॅ. विजय दर्डा होते. याप्रसंगी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय भाषणात डॉ. दर्डा यांनी सरपंच अवॉर्ड उपक्रमामागील ‘लोकमत’ची भूमिका मांडली. ‘लोकमत’चे द्रष्टे संस्थापक-संपादक, ज्येष्ठ स्वातंंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांनी उदात्त हेतूने ‘लोकमत’ची स्थापना केली. त्यांनी उद्योग व ऊर्जा मंत्रालयाचा कारभार सांभाळताना राज्यातील ग्रामीण भागाच्या विकासाला नवी दृष्टी आणि दिशा दिली. बाबूजींनी दाखवलेल्या याच मार्गाने ‘लोकमत’ची वाटचाल सुरू आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागाचाही विकास व्हावा, या भागातून नवे नेतृत्व पुढे यावे, यासाठी तळमळीने काम करणाऱ्या सरपंचांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी हा सोहळा राज्यभरात घेण्यात येत असल्याचे ते म्हणाले. 

आज गौरविलेल्या सर्व १३ ग्रामपंचायतींनी जलव्यवस्थापन, शैक्षणिक सुविधा, स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण आदी विविध क्षेत्रांमध्ये काम करून गावासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. या सरपंचांना प्रोत्साहन, तसेच या गावांच्या विकासाला आणखी बळ मिळावे, यासाठी या ग्रामपंचायतींना ‘डीपीसी’तून प्रत्येकी दहा लाख रुपये विशेष निधी म्हणून मिळावा, अशी मागणी डाॅ. दर्डा यांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे केली. याच मागणीचा धागा पकडत पालकमंत्री राठोड यांनी यवतमाळ जिल्ह्यातील ‘लोकमत’ सरपंच अवॉर्ड विजेत्या सर्व १३ ग्रामपंचायतींना ‘डीपीसी’तून नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी प्रत्येकी दहा लाखांचा निधी देत असल्याची घोषणा केली. ‘लोकमत’ नेहमीच विविध स्तरांवर प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहते. या सरपंच अवॉर्ड सोहळ्यातही त्याचा अनुुभव घेतल्याचे सांगत ‘लोकमत’ केवळ वृत्तपत्र नव्हे, तर समाजातील शेवटच्या घटकाच्या उत्थानासाठी झटणारी एक चळवळ असल्याचे राठोड यांनी सांगितले. 

जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनीही ‘लोकमत’च्या या उपक्रमाचे कौतुक केले. ग्रामविकासात सरपंच हा महत्त्वाचा घटक आहे. आर्थिक व राजकीय बदलांची सुरुवात गावातूनच होते. ग्रामपंचायतींनी १५ वा वित्त आयोग, सेस फंडातून भौतिक सुविधा निर्माण करण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. 

‘लोकमत’चे यवतमाळ जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, बीकेटीचे एरिया मॅनेजर जुबेर शेख, सेल्स एक्झिक्युटिव्ह अमय देशपांडे, विदर्भ वितरक दीपक बंकोटी, एमपी बिर्ला सिमेंटचे रिजनल सेल हेड पंकज सिंग, महाराष्ट्र, तेलंगणाचे टेक्निकल हेड शरद व्यास, सोसायटी चहाचे प्रतिनिधी अप्पा पाटील, जी२चे सेल्स ऑफिसर वजाहत खान, ओमिनी जेलचे प्रतिनिधी यांच्यासह ‘लोकमत’चे महाव्यवस्थापक सुशांत दांडगे, आवृत्तीप्रमुख गजानन चोपडे उपस्थित होते. डॉ. अजय कोलारकर यांनी सूत्रसंचालन केले, तर यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विशाल सोनटक्के यांनी आभार मानले.  

नागपूर जिल्ह्यातील १५ ग्रा.पं.ला १० लाखांचा निधी

‘लोकमत सरपंच अवॉर्ड’च्या मानकरी ठरलेल्या नागपूर जिल्ह्यातील १५ सरपंचांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत या ग्रामपंचायतींना विकासासाठी प्रत्येकी १० लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीमधून (डीपीसी) देण्याची घोषणा भाजपचे नागपूर जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुधाकर कोहळे यांनी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी यासंदर्भात चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. 

या पुरस्कार सोहळ्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी ‘सरपंच ऑफ द इअर’चे मानकरी ठरलेल्या काटोल तालुक्यातील खुर्सापार ग्रामपंचायतचे सरपंच सुधीर गोतमारे यांच्या कामाचे कौतुक करीत आ. अभिजित वंजारी यांच्या विकास निधीतून १० लाख रुपये गावाच्या विकासासाठी दिले जाणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. 


 

Web Title: lokmat sarpanch award 2024 distribution ceremony was held in yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.