Lok Sabha Election 2019; तार्इंची श्रीमंती ११ कोटींनी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 09:32 PM2019-03-26T21:32:40+5:302019-03-26T21:35:13+5:30

लोकसभा निवडणुकीसाठी यवतमाळ-वाशीम मतदारसंघातून तब्बल ३८ जणांनी नामांकने दाखल केली आहेत. जनसेवेचा तथाकथित वसा घेऊन निवडणुकीच्या रणात उतरलेल्या या उमेदवारांची संपत्ती मतदारसंघातील मतदारांच्या एकूण संख्येच्या कितीतरी पट जास्त आहे, हे विशेष.

Lok Sabha Election 2019; Taichi's wealth has increased by 11 crores | Lok Sabha Election 2019; तार्इंची श्रीमंती ११ कोटींनी वाढली

Lok Sabha Election 2019; तार्इंची श्रीमंती ११ कोटींनी वाढली

googlenewsNext
ठळक मुद्देपाच वर्षात वेगवान विकास : लोकसभेच्या रिंगणात कोट्यधीशांचीच चलती

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लोकसभा निवडणुकीसाठी यवतमाळ-वाशीम मतदारसंघातून तब्बल ३८ जणांनी नामांकने दाखल केली आहेत. जनसेवेचा तथाकथित वसा घेऊन निवडणुकीच्या रणात उतरलेल्या या उमेदवारांची संपत्ती मतदारसंघातील मतदारांच्या एकूण संख्येच्या कितीतरी पट जास्त आहे, हे विशेष. एखाद दुसरा अपवाद वगळला तर सारेच उमेदवार कोट्यधीश आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, विद्यमान खासदार राहिलेल्या भावना गवळींची संपत्ती (मुल्य) अवघ्या पाच वर्षांतच ११ कोटींनी वाढल्याची आकडेवारी त्यांच्याच प्रतिज्ञापत्रातून पुढे आली आहे.
यवतमाळ-वाशिम मतदारसंघासाठी ११ एप्रिल रोजी मतदार होऊ घातले आहे. त्यासाठी युती, आघाडी, वंचित बहुजन आघाडी, प्रहारसह ‘तगड्या’ अपक्षांनीही उमेदवारी दाखल केली आहे. आपला उमेदवार कसा आहे, हे लोकांना कळले पाहिजे म्हणून नामांकन अर्जासोबतच उमेदवारांकडून स्वत:च्या संपत्तीचे आणि गुन्ह्यांचेही विवरण भरून घेण्यात आले आहे.
या प्रतिज्ञापत्रानुसार, युतीच्या उमेदवार भावना गवळी यांच्याकडे एकूण १८ कोटी ६८ लाख ८२ हजार १०३ रुपयांची संपत्ती आहे. यात १ कोटी ५७ लाख १५ हजार २७५ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर स्थावर मालमत्ता १७ कोटी ११ लाख ६६ हजार ८२८ रुपयांची आहे. गवळींचे वार्षिक उत्पन्नही ३७ लाख ८६ हजार ४०० रुपये इतके घसघशीत आहे. हे झाली तार्इंची आताची संपत्ती. त्या गेल्या चार ‘टर्म’ खासदार आहेत. तीन वेळा खासदार राहिल्यावर त्यांनी जेव्हा २०१४ मध्ये उमेदवारी अर्ज भरला, त्यावेळी त्यांच्या संपत्तीचे मूल्य होते ६ कोटी ७८ लाख ८६ हजार ४० रुपये. गेल्या पाच वर्षात त्यांच्या संपत्तीचे मूल्य तब्बल ११ कोटी ८९ लाख ९६ हजार ६३ रुपयांनी वाढले आहे. पाच वर्षात संपत्तीच्या वाढीव मुल्याच्या माध्यमातून सुमारे १२ कोटींची कमाई त्यांच्या पदरी पडली आहे. मतदारसंघातील सामान्य मतदारांचे डोळे विस्फारणारी ही आकडेवारी आहे. त्या खालोखाल आघाडीचे उमेदवार असलेले माणिकराव ठाकरेही कोट्यधीश आहेत. ३ कोटी २५ लाख ६२ हजार ७७१ रुपयांची संपत्ती ठाकरेंकडे आहे. यात ४४ लाख ३३ हजारांची जंगम मालमत्ता तर २ कोटी ८१ लाख २९ हजार रुपयांच्या स्थावर मालमत्तेचा समावेश आहे. ठाकरेंचे वार्षिक उत्पन्नही ३१ लाख ४८ हजार ९२० रुपये आहे. दारव्हा तालुक्यातील हरू गावाच्या सर्वसामान्य सरपंचापासून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास पुढे आमदार, मंत्री, प्रदेशाध्यक्ष ते विधान परिषद उपसभापती पदापर्यंत झेपावला. या दरम्यानच्या काळात त्यांनी गृहराज्यमंत्री पदही पटकावले. शिवाय, काँग्रेसच्या सत्ताकाळात ते ८ वर्षे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. राजकीय भरारी आणि आर्थिक कलाटणी सोबतच झाल्याने मतदारांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
तर वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी दाखल करणारे प्रवीण पवार यांच्याकडेही ७ कोटी ४० लाख ६६ हजार ९५८ रुपयांची संपत्ती आहे. वर्षभरात ते तब्बल १० लाख १९ हजार ८०० रुपयांची घसघशीत कमाई करतात. पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात आलेले प्रवीण पवार मोठी आर्थिक ताकद घेऊनच आल्याचे बोलले जात आहे.
४३ कोटींसह अपक्ष आडे सर्वाधिक श्रीमंत
विशेष म्हणजे, अपक्ष उमेदवार परशराम भावसिंग आडे यांच्या संपत्तीचा आकडा तर राजकीय पक्षांच्या उमेदवारांनाही धक्का देणारा आहे. ४३ कोटी ३३ लाख ३२ हजार ५५२ रुपयांची संपत्ती आडे कुटुंबाकडे आहे. या स्थावर मालमत्तेसह त्यांच्या कुटुंबात येणारे वार्षिक उत्पन्न आहे ५३ लाख ५८ हजार ५३ रुपये! सेवानिवृत्त दुग्ध विकास उपायुक्त असलेले आडे यांची पुढची पिढीही सुशिक्षित आणि उच्च पदस्थ असल्याने हा आकडा मोठा आहे. मात्र संपत्ती आणि उत्पन्नाच्या बाबतीत आडे यवतमाळ-वाशीम मतदारसंघातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. पण त्याचवेळी ‘प्रहार‘कडून उमेदवारी मिळालेल्या वैशाली येडे यांच्याकडे १० लाख ५० हजारांची स्थावर आणि १ लाख १८ हजारांची जंगम मालमत्ता आहे. आश्चर्य म्हणजे, ज्यांनी आपली ‘पोहोच’ दिल्लीपर्यंत असल्याचे दावे केले, त्या अपक्ष उमेदवार सुनिल नायर यांनी मात्र आपल्याकडे कोणतीही मालमत्ता नसल्याचे नमूद केले आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019; Taichi's wealth has increased by 11 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.