पंतप्रधानांचे ऐका, ऐकून लगेच कळवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 07:01 AM2019-01-26T07:01:01+5:302019-01-26T07:05:02+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २९ जानेवारी दिल्लीत निवडक विद्यार्थी पालकांसोबत ‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम करणार आहेत. हा लाईव्ह कार्यक्रम महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत पाहण्याचे, पाहण्याची सुविधा नसेल तर ऐकण्याचे आदेश आहेत.

Listen to the Prime Minister and tell soon! | पंतप्रधानांचे ऐका, ऐकून लगेच कळवा!

पंतप्रधानांचे ऐका, ऐकून लगेच कळवा!

Next
ठळक मुद्देसुविधांची बोंबाबोंब ‘परीक्षा पे चर्चा’ घेणार शाळांची परीक्षा

अविनाश साबापुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २९ जानेवारी दिल्लीत निवडक विद्यार्थी पालकांसोबत ‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम करणार आहेत. हा लाईव्ह कार्यक्रम महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत पाहण्याचे, पाहण्याची सुविधा नसेल तर ऐकण्याचे आदेश आहेत. विशेष म्हणजे, कार्यक्रम संपताच एका तासाच्या आत प्रत्येक शाळेचा अहवाल थेट पंतप्रधान कार्यालयाला छायाचित्रांसह पाठवायचा आहे. अनेक शाळांमध्ये वीज, टीव्ही आदी सुविधांची वानवा असताना हा कार्यक्रम म्हणजे शाळांसाठी परीक्षाच ठरण्याची शक्यता आहे.
इयत्ता सहावीच्या पुढील प्रत्येक वर्गाने हा कार्यक्रम पाहणे बंधनकारक असल्याचा आदेश विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ. सुनिल मगर यांनी दिला आहे. २९ जानेवारीला सकाळी ११ ते दुपारी १ असा दोन तासांचा कार्यक्रम होणार आहे. यात दिल्लीच्या तालकटोरा मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी नववी ते बारावीचे निवडक विद्यार्थी, त्यांचे शिक्षक, पालक आदींशी ‘परीक्षा पे चर्चा’ करणार आहेत. या कार्यक्रमाचे टीव्हीद्वारे, रेडीओद्वारे, मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या संकेतस्थळावर, फेसबुकवर, यूट्यूबवर लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे. हे प्रक्षेपण महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत दाखविण्याचा आदेश आहे.
हा कार्यक्रम किती शाळांनी, त्यातील किती विद्यार्थ्यांनी पाहिला, ऐकला याचा अहवाल तासाभरात शिक्षणाधिकाऱ्यांनी विद्या प्राधिकरणाच्या आॅनलाईन लिंकवर भरायचा आहे. तर विद्या प्राधिकरणाने संपूर्ण राज्याचा अहवाल एकत्र करून तासाभरातच पंतप्रधान कार्यालयाला पाठवायचा आहे. विशेष म्हणजे, अहवाल भरण्याची लिंक दुपारी २ वाजताच बंद केली जाणार आहे. या अहवालात विद्यार्थी कार्यक्रम पाहात असल्याचे पाच उत्तम छायाचित्रही जोडायचे आहेत. व्हीडीओ क्लिपही काढून जोडायची आहे.
त्यामुळे कार्यक्रम सुरू असतानाच शाळांना अहवाल लिहिणे, छायाचित्रे जोडणे ही कामे करावी लागणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण दाखविण्यासाठी अनेक शाळांमध्ये वीजपुरवठा नाही.
अनेक शाळांचा वीजपुरवठा देयक थकित असल्याने खंडित करण्यात आला आहे. काही शाळांमध्ये वीज असली तरी टीव्ही संच नाही. बहुतांश ठिकाणी शिक्षकाच्या मोबाईलवर कार्यक्रम पाहण्याची वेळ येणार आहे. पण दुर्गम भागातील शाळांमध्ये मोबाईलची रेंज नसते. रेंज असली, तर एक-दोन शिक्षकांच्या मोबाईलवर ४०-५० विद्यार्थी कार्यक्रमाचा आनंद कसा घेतली, हा प्रश्न आहे.

अधिकारीच रडारवर
दोन तासांचा कार्यक्रम संपताच एका तासाच्या आत अहवाल पंतप्रधान कार्यालयाला हवा आहे. महाराष्ट्राच्या एकेका जिल्ह्यात काही हजार शाळा आहेत. त्यामुळे तासाभरात प्रत्येक शाळेचा अहवाल भरणे अशक्य आहे. त्यातच एकाच वेळी सर्व शाळांची घाई होणार असल्याने विद्या प्राधिकरणाची लिंक फेल होण्याचीही दाट शक्यता आहे. पण अहवाल वेळेत न मिळाल्यास संबंधित शिक्षणाधिकाºयांवर जबाबदारी निश्चत केली जाणार आहे.

 

Web Title: Listen to the Prime Minister and tell soon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.