विदेशातही वाघिणीसाठी ‘लेट अवनी लिव्ह’ मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 08:18 PM2018-10-22T20:18:32+5:302018-10-22T20:19:03+5:30

येथील नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी सुरू असलेल्या नवनवीन प्रयोगांबाबत भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील राज्याच्या वनखात्यावर सडकून टीका होत आहे.

'Let Avni Live' campaign for wagering abroad too | विदेशातही वाघिणीसाठी ‘लेट अवनी लिव्ह’ मोहीम

विदेशातही वाघिणीसाठी ‘लेट अवनी लिव्ह’ मोहीम

Next
ठळक मुद्देदिल्ली, हैदराबादमध्येही पडसाद

योगेश पडोळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी सुरू असलेल्या नवनवीन प्रयोगांबाबत भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील राज्याच्या वनखात्यावर सडकून टीका होत आहे. इंग्लंड, अमेरिका, फ्रान्सच्या नागरिकांनी समाज माध्यमांवरुन एकूणच या कार्यपद्धतीवर टीका केली आहे तर कॅनडातील भारतीयांनी तेथील शॉपिंग मॉलमध्ये निदर्शने केली. आता भारतासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावरही ‘लेट अवनी लिव्ह’ या नावाने वाघिणीच्या बचावासाठी मोहीम सुरू झाली आहे.
वाघिणीला बेशुद्ध करुन जेरबंद करण्यासाठी २२ सप्टेंबरपासून वनखात्याने तब्बल २०० लोकांना घेऊन मोहीम सुरू केली आहे. मात्र, महिना लोटला तरी यश आले नाही. त्यामुळे वनखात्याच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले जात आहेत. वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आधी हत्ती, नंतर घोडे, इटालियन श्वान, पॅरामोटर्स आणि आता डुकरांचा वापर करण्यात येत आहे. मात्र, कुत्रे आणि डुकराचा वापर चुकीचा असल्याची टीका होत आहे. डुकरांमुळे संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता पशुवैद्यकीय अधिकारी व्यक्त करीत आहेत.
या सर्व प्रयोगांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली आहे. इंग्लंडमधील डॅन रिचर्डसन यांनी थेट प्रक्षेपणाद्वारे मौल्यवान वाघीण आणि तिचे बछडे धोकादायक स्थितीत असून त्यांना वाचवा म्हणून आवाहन केले आहे. त्यासाठी त्यांनी स्वाक्षरी मोहीम देखील राबविली. पहिल्याच प्रक्षेपणात तब्बल ४७ हजार स्वाक्षरी झाल्या. त्या ५० हजारांपर्यंत जातील असा विश्वास त्यांनी समाज माध्यमांवरुन व्यक्त केला आहे. लंडनमधील आठ वर्षीय स्कार्लेट रॉबर्टसन या मुलीने देखील समाजमाध्यमांवरुन वाघिणीला वाचविण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे, देहरादूनच्या भारतीय वन्यजीव संस्थेच्या फेसबुक पेजवरुन देखील ‘लेट अवनी लिव्ह’ या मोहिमेला समर्थन देण्यात आले आहे.

दिल्ली, हैदराबादमध्येही पडसाद
आतापर्यंत नागपूरसह दिल्ली, मुंबई, गोवा, सिलिगुडी, कोलकाता येथे या वाघिणीला वाचविण्यासाठी मोहीम राबवण्यात आली. १४ आॅक्टोबरला दिल्लीच्या पालिका बाजार येथून, बंगलोरच्या टाऊन हॉल येथून, पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून ‘रोअर्स फॉर अवनी’, ‘सेव्ह टायग्रेस अवनी’, ‘लेट अवनी लिव्ह’ अशा नावानी मोहीम राबविण्यात आली. हैदराबादच्या डॉग्स पार्क येथून १४ आॅक्टोबरला, तर केबीआर पार्क येथून १५ आॅक्टोबरला ही मोहीम राबविण्यात आली आहे.

टी-१ म्हणजेच अवनी
पांढरकवड्यातील या वाघिणीला वन खात्याने ‘टी-१’ हे नाव दिले आहे. परंतु या परिसरातील ही वाघीण ‘अवनी’ याच नावाने ओळखली जाते. त्यामुळे या मोहिमेला देखील ‘लेट अवनी लिव्ह’ हेच नाव देण्यात आले आहे.

Web Title: 'Let Avni Live' campaign for wagering abroad too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ