सेना नेत्यांच्या ‘मनोमिलना’चा अखेरचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 10:08 PM2019-01-31T22:08:07+5:302019-01-31T22:08:20+5:30

सुमारे वर्षभरापासून एका व्यासपीठावर न आलेल्या खासदार भावनाताई गवळी व महसूल राज्यमंत्री संजय राठोड या शिवसेना नेत्यांच्या ‘मनोमिलना’चा अखेरचा प्रयत्न ‘मातोश्री’वरून केला जाणार आहे. त्यासाठी लवकरच उद्धव ठाकरे यांच्या समक्ष या दोन्ही नेत्यांची बैठक होणार आहे.

The last attempt of 'Leaders' Mane Milena | सेना नेत्यांच्या ‘मनोमिलना’चा अखेरचा प्रयत्न

सेना नेत्यांच्या ‘मनोमिलना’चा अखेरचा प्रयत्न

Next
ठळक मुद्दे‘मातोश्री’वर लवकरच बैठक : यवतमाळ-वाशिम लोकसभेची जागा कायम राखण्याचे ध्येय

राजेश निस्ताने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सुमारे वर्षभरापासून एका व्यासपीठावर न आलेल्या खासदार भावनाताई गवळी व महसूल राज्यमंत्री संजय राठोड या शिवसेना नेत्यांच्या ‘मनोमिलना’चा अखेरचा प्रयत्न ‘मातोश्री’वरून केला जाणार आहे. त्यासाठी लवकरच उद्धव ठाकरे यांच्या समक्ष या दोन्ही नेत्यांची बैठक होणार आहे.
जिल्हा शिवसेनेतील नेत्यांचा वाद ‘मातोश्री’पर्यंत पोहोचला. हा वाद मिटविण्यासाठी सुरुवातीला एक-दोन बैठकाही झाल्या. मात्र ‘मातोश्री’ने हस्तक्षेप करूनही हा वाद मिटला नाही. केवळ या वादातील तीव्रता कमी झाली. गेली वर्षभर हा वाद मिटण्याच्या दृष्टीने फारशी सकारात्मक चिन्हे दिसली नाही. नेतेच वादात सापडल्याने कार्यकर्तेही अप्रत्यक्ष विभागले गेले. आता लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील शिवसेनेची जागा कायम राखण्याचे उद्दीष्ट आहे. हे उद्दीष्ट गाठण्यासाठी आधी येथील शिवसेना नेत्यांमधील वाद मिटविणे क्रमप्राप्त आहे. म्हणूनच त्यासाठी ‘मातोश्री’वरून पुढाकार घेतला गेला. भावना गवळी व संजय राठोड यांची मुंबईत लवकरच बैठक बोलविली जाणार आहे. मात्र ही बैठक अखेरची राहणार असल्याचे सांगितले जाते. या बैठकीत दोन्ही नेत्यांमधील गैरसमज समोरासमोर बसवून मिटविण्याचा प्रयत्न होणार आहे. वैयक्तिक मतभेद बाजूला ठेऊन पक्षासाठी काम करा, अशी ‘समज’ या नेत्यांना दिली जाऊ शकते.
लोकसभेचा गड सर करणे सोपे नाहीच
भाजपा-शिवसेनेची युती होण्याची चिन्हे आहेत. ही युती झाली तरी लोकसभेचा गड सर करणे सेनेसाठी तेवढे सोपे नाही. गेल्या वेळी सेनेला निश्चितच मोदी लाटेचा फायदा झाला. यावेळी लाट ओसरल्याने व नोटाबंदी, जीएसटीमुळे नाराजी असल्याने सेनेला नुकसानही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय या वेळी काँग्रेसकडून मराठा उमेदवार दिला जाऊ शकतो. तसे झाल्यास देशमुख-मराठा-कुणबी (डीएमके) या एक गठ्ठा मतांचे विभाजन होणार आहे. हासुद्धा सेनेसाठी मायनस पॉर्इंट ठरणार आहे. म्हणूनच या लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करून जमेच्या बाजूंची जुळवाजुळव केली जात आहे. नेत्यांमधील वाद मिटविणे हा त्या प्रयत्नांचाच एक भाग मानला जातो. यवतमाळ-वाशिमच नव्हे तर अन्य लोकसभा मतदारसंघ व जिल्ह्यांमधील असे पक्षांतर्गत वाद मिटविण्यासाठी ‘मातोश्री’वरून पुढाकार घेतला जाणार आहे. आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी शिवसेनेत संघटनात्मक ‘डागडुजी’च्या या सर्व बैठका होणार असल्याचेही सांगितले जाते.
नेत्यांनी दाखविली एकमेकांना ताकद
एकेकाळी जिल्ह्यात शिवसेना एकसंघ होती. मात्र यवतमाळ व वाशिमधील जिल्हा प्रमुखाच्या नियुक्तीवरून संजय राठोड व भावना गवळी यांच्यात वितुष्ट आले. त्यातच काही संधीसाधू कार्यकर्त्यांनी दोन्हीकडे ‘लुज टॉक’ केल्याने गैरसमज आणखी वाढत गेले. या दोन्ही नेत्यांनी संधी मिळेल तेथे आपली ताकद एकमेकांना दाखविण्याचा प्रयत्न केला. भावना गवळींनी आपल्या सोईने जिल्हा प्रमुखांच्या नियुक्त्या करून आणून ‘मातोश्री’वर आपलेही वजन असल्याचे दाखवून दिले. ‘मातोश्री’वर सुरुवातीला वाद मिटविण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत संजय राठोड यांनी ‘मी थांबतो, तार्इंना काम करू द्या’ असे सांगितले. या शब्दाचे पालन करताना गेली वर्षभर संजय राठोड कमालीचे शांत होते. मात्र अलिकडेच त्यांनी ‘सामाजिक’ शक्तिप्रदर्शन करून आपली ताकद थेट ‘मातोश्री’ला दाखवून दिली. ही ताकद उद्धव ठाकरे व मुख्यमत्र्यांनी स्वत: अनुभवली.
ताई व भाऊंनी पुन्हा एकत्र यावे
ताई व भाऊंनी पुन्हा एकत्र यावे ही तमाम शिवसैनिकांची मनातील भावना आहे. संजय राठोड सारख्या मोठ्या नेत्याला बाजूला ठेऊन लोकसभेची निवडणूक लढणे शक्य नाही, त्याचा परिणाम विविध मतदारसंघात ‘सामाजिक’दृष्ट्या होऊ शकतो याची जाणीव ‘मातोश्री’ला आहे. स्वत: ताईसुद्धा ही बाब नाकारत नाहीत. म्हणूनच ‘मातोश्री’वरून सुरू झालेल्या मनोमिलनाच्या प्रयत्नाला तार्इंकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. हे दोन्ही नेते एकत्र आल्यास शिवसेनेसाठी लोकसभेतील विजय कठीण नाही, असे कार्यकर्ते मानत आहेत. ‘मातोश्री’वर मनोमिलनाची होणारी ही अखेरची बैठक खरोखरच किती ‘फलदायी’ ठरते हे मात्र लोकसभा निवडणुक निकालानंतरच स्पष्ट होईल, एवढे निश्चित.

ताई-भाऊंचे कशामुळे बिनसले ?
भावना गवळी व संजय राठोड यांच्यामध्ये मतभेद होण्यामागे एकमेकांना विश्वासात न घेणे हे प्रमुख कारण सांगितले जाते. यवतमाळ, वाशिममध्ये जिल्हा प्रमुख नेमताना विश्वासात घेतले नाही, जिल्हा परिषद, नगरपरिषदेमध्ये तिकीट वाटप करताना विचारणा केली गेली नाही, विधान परिषदेच्या निवडणुकीतही काही निर्णय परस्पर घेतले गेले, माझ्या लोकसभा मतदारसंघाचे यवतमाळ हे मुख्यालय असल्याने माझा निर्णय विचारणार की नाही, असा खासदार भावना गवळी यांच्या गटाचा आक्षेप आहे.
तर मी सुरुवातीपासून यवतमाळ जिल्ह्याचे तन-मन-धनाने काम पाहत आलो, त्यामुळे हा संपूर्ण जिल्हा माझ्याकडे देणे अपेक्षित होते. राजकीय तडजोडी, आर्थिक मदत, संघटनात्मक बांधणी, प्रचार साहित्य उपलब्ध करून देणे, युतीचे निर्णय घेणे आदी सर्वबाबी मी करतो. पण तार्इंना कुठेही दुय्यम स्थान दिले गेले नाही. वास्तविक ताई सभांपुरत्याच होत्या, वितुष्ट आल्यानंतरही व मंत्रीपद मिळाल्यानंतरही तार्इंचा ‘आमच्या नेत्या’ हा उल्लेख कधी थांबला नाही, प्रोटोकॉलनुसार अखेरच्या भाषणाची संधी तार्इंनाच दिली गेली. तरीही तार्इंनी एवढी टोकाची भूमिका का घ्यावी, हा संजय राठोड गटाचा सवाल आहे. आजही २० पैकी १९ जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समित्यांचे सहा सभापती, सर्व नगराध्यक्ष आपल्या बाजूने असल्याचा दावा राठोड गटाकडून केला जातो आहे. या दोन्ही नेत्यांमधील उपरोक्त मुद्यावरून झालेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न ‘मातोश्री’वरील आगामी बैठकीत होणार असल्याचे सांगितले जाते.

Web Title: The last attempt of 'Leaders' Mane Milena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.