यवतमाळात कर्जमाफी दीड लाखाची, थकीत वीज बिल २.२५ लाखांचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 09:41 AM2017-11-18T09:41:35+5:302017-11-18T09:49:03+5:30

यवतमाळतील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने दीड लाखांची कर्जमाफी दिली तर दुसरीकडे वीज कंपनीने अनेक शेतकऱ्यांना थकीत वीज बिलाचे सव्वा दोन लाख रूपये मागितले. तशी देयके शेतकऱ्यांकडे पोहोचली आहेत.

Govt policy, giving in one hand and taking more from another hand, in Yawatmal | यवतमाळात कर्जमाफी दीड लाखाची, थकीत वीज बिल २.२५ लाखांचे

यवतमाळात कर्जमाफी दीड लाखाची, थकीत वीज बिल २.२५ लाखांचे

Next
ठळक मुद्देमहावितरणचा पराक्रम४५ हजार शेतकऱ्यांपुढे थकबाकीचा डोंगर

रूपेश उत्तरवार।
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही. या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने दीड लाखांची कर्जमाफी दिली. तर दुसरीकडे वीज कंपनीने अनेक शेतकऱ्यांना थकीत वीज बिलाचे सव्वा दोन लाख रूपये मागितले. तशी देयके शेतकऱ्यांकडे पोहोचली आहेत.
जिल्ह्यातील एक लाख शेतकऱ्यांकडे ७९० कोटींची वीज बिले थकली असल्याचा महावितरणचा दावा आहे. यातील ४५ हजार शेतकऱ्यांनी कृषीपंपाच्या जोडणीपासून थकीत बिलच भरलेले नाही. अशा शेतकऱ्यांना दीड ते दोन लाख रूपयांचे वीज बिल देण्यात आले असून ते त्वरित भरण्यास सांगण्यात आले आहे. अन्यथा वीज कापण्याचा इशाराही महावितरणने दिला आहे.
सध्या शेतकऱ्यांजवळ कर्ज भरायलाच पैसे नाहीत. त्यामुळे कर्ज थकले होते. आता कृषीपंपाचे बील भरायला पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न त्यांना पडला आहे. यवतमाळ तालुक्यातील जामडोहचे शेतकरी बजरंग नागदेव गोत्राळ यांना दोन लाख १६ हजार २६० रूपयांचे वीज बिल आले आहे. १९९० पासून त्यांचे बील थकीत असल्याची नोंद बिलावर करण्यात आली आहे. आता एकाचवेळी इतके पैसे भरायचे कसे, या काळजीमुळे गोत्राळ कुटुंबाचे जगणे कठीण झाले आहे.
याच गावातील एन. टी. गोलाईत यांच्याकडे १९८० पासून वीज बिल थकीत असून त्यांना एक लाख ७१ हजार रूपयांची थकबाकी भरण्याच्या सूचना आहेत. सुंदराबाई अंजीकर या विधवा आहेत. त्यांच्या मुलाने आत्महत्या केली. केवळ तीन वर्षांपासून त्यांचा पंप आहे. यानंतरही त्यांना ९० हजारांचे थकीत बिल आले आहे. हे बील भरायचे कसे, असा प्रश्न सुंदराबाईपुढे आहे.


तीन हजार ग्राहकांनी भरले बिल
यवतमाळ जिल्ह्यातील तीन हजार ग्राहकांनी एक महिन्याचे तीन हजारापर्यंतचे बिल भरण्याचा प्रयत्न केला आहे. यातून कंपनीकडे एक कोटी रूपये जमा झाले. मात्र कुणालाच सध्या तरी संपूर्ण थकबाकी भरता आली नाही.


हॉर्सपॉवर वापरात तफावत
अनेक शेतकऱ्यांना मिळालेल्या वीज बिलात अधिक हॉर्सपॉवरच्या मीटरचा उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीवर मीटरच बसविले नाहीत. यानंतरही हे रिडींग कसे, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.


१६ तासाचे भारनियमन मीटरभाडे कसे?
कृषीपंपांवर १६ तासांचे लोडशेडींग आहे. लाईन ट्रिप होणे, मध्यरात्री पुरवठा होणे, असे अनेक प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहेत. यातून शेतकऱ्यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. तरीही मीटर भाडे मात्र लावण्यात येते. यावर्षी तर विहिरींना पाणी नाही. अशा स्थितीत मीटर बिल भरायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.

Web Title: Govt policy, giving in one hand and taking more from another hand, in Yawatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार