शासकीय बांधकामांना भीषण टंचाईतही उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 11:26 PM2018-04-17T23:26:03+5:302018-04-17T23:26:03+5:30

शहरात थेंब थेंब पाण्यासाठी नागरिक व्याकूळ झाले असताना दुसरीकडे शासकीय बांधकामाला उधाण आले आहे. नगरपरिषद आणि बांधकाम विभागाने शहरात एप्रिल महिन्यात सिमेंट रस्ता व नालीचे बांधकाम सुरू केले आहे.

Government constructions also include scarcity of scarcity | शासकीय बांधकामांना भीषण टंचाईतही उधाण

शासकीय बांधकामांना भीषण टंचाईतही उधाण

Next
ठळक मुद्देकारभार नियंत्रणाबाहेर : सिमेंट रस्ते व नालीचे बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरात थेंब थेंब पाण्यासाठी नागरिक व्याकूळ झाले असताना दुसरीकडे शासकीय बांधकामाला उधाण आले आहे. नगरपरिषद आणि बांधकाम विभागाने शहरात एप्रिल महिन्यात सिमेंट रस्ता व नालीचे बांधकाम सुरू केले आहे. या बांधकामावर मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होत आहे. पदाधिकारी आणि प्रशासनात ताळमेळ नसल्याने शहरात हा गोंधळ सुरू असून नागरिक मात्र या प्रकारावर संताप व्यक्त करीत आहे.
यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टँकरद्वारे तहान भागवावी लागत आहे. पाण्यासाठी नागरिक रात्रंदिवस एक करीत आहे. अशा परिस्थितीत शहरात शासकीय बांधकाम सुरू असल्याचे दिसून येते. यावर मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होत आहे. शहरातील प्रभाग क्र. २५ मधील उज्वलनगर, कौसल भवन परिसरात नालीचे बांधकाम केले जात आहे. सदर बांधकाम आमदार विकास निधीतील असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येते. नगरपरिषद बांधकाम विभागाने वाघापूर परिसरात सिमेंट रस्त्याचे काम हाती घेतले आहे. तसेच आर्णी रस्त्याचे चौपदरीकरणही मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
एकीकडे रणरणत्या उन्हात महिला टँकरची प्रतीक्षा करीत आहे. तर दुसरीकडे बांधकामावर भरमसाठ पाण्याचा वापर करण्याचे विरोधाभासी चित्र दिसत आहे. तर दुसरीकडे सिमेंट काँक्रीटच्या बांधकामाला मुबलक पाण्याची आवश्यकता असते. टंचाई काळात कामात दर्जा कसा राखला जाईल, याचेही सोयरसूतक बांधकाम विभागाला दिसत नाही. प्रशासनाने यवतमाळ शहर दुष्काळी क्षेत्र घोषित केले आहे. त्यामुळे बांधकामावर प्रतिबंध आले आहे. खासगी बांधकाम बंद करण्याची मागणी होत आहे. काही नगरसेवकांनी हा मुद्दा सर्वसाधारण सभेतही उपस्थित केला होता. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपरिषद विभागाने पाणीटंचाईच्या काळातही बांधकाम सुरूच ठेवले आहे.
कंत्राटदाराच्या मर्जीने कारभार
विकास कामांसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून १६ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. हा निधी ३१ मेपर्यंत खर्च करण्याची अखेरची संधी मिळाली आहे. मंजुरी व निविदा प्रक्रिया करून पाच महिन्याचा कालावधी लोटला आहे. आता टंचाई काळात अखेरच्या क्षणी कंत्राटदाराच्या मर्जीने बांधकाम सुरू केले आहे. यामध्ये आमदार विकास निधीतील कामांचाही समावेश आहे. केवळ कंत्राटदाराच्या भल्यासाठी ऐन टंचाई काळात बांधकाम सुरू केल्याचा आरोप होत आहे.

टंचाई काळात पाण्याची काटकसर करणे आवश्यक आहे. प्रभाग क्र. २५ मध्ये सुरू झालेले नाली बांधकाम आमदार विकास निधीतील आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली सदर काम आहे. तर वाघापूरमध्ये पालिकेच्या एका सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू केले आहे. निधी खर्चासाठी अंतिम मुदत मिळाल्याने काम थांबविणे शक्य झाले नाही. इतर १२ कोटी ५० लाखांचा निधी खर्चाला मुदतवाढ मिळविण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे.
- प्रवीण प्रजापती
बांधकाम सभापती, नगरपरिषद यवतमाळ.

Web Title: Government constructions also include scarcity of scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.