६५० हेक्टरवरचे पीक उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:04 AM2018-02-15T00:04:20+5:302018-02-15T00:04:50+5:30

तालुक्यात मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारांनी अक्षरश: तांडव घातले. ६५० हेक्टरमधील गहू, हरभरा, फळबागा, भाजीपाला पिके पूर्णत: नष्ट झाली.

Displaced 650 hectares of crop | ६५० हेक्टरवरचे पीक उद्ध्वस्त

६५० हेक्टरवरचे पीक उद्ध्वस्त

Next
ठळक मुद्देदारव्हा तालुका : गारा घेऊन शेतकरी तहसीलवर

लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : तालुक्यात मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारांनी अक्षरश: तांडव घातले. ६५० हेक्टरमधील गहू, हरभरा, फळबागा, भाजीपाला पिके पूर्णत: नष्ट झाली. कृषी विभागाची यंत्रणा सर्वेक्षणाचे काम करत आहे तर तालुक्यातील शेतकऱ्यांनी गारा घेऊन बुधवारी तहसील कार्यालयात मदतीसाठी धडक दिली.
दारव्हा तालुक्यात सहा हजार ५८९ हेक्टरवर रबीची लागवड झाली आहे. मंगळवारी सायंकाळी अर्धा तास गारपीट झाली. गारा व वादळी पाऊस सोबतच आल्याने पिकाचे नुकसान झाले. अर्ध्या तासात २६ मिमी पावसाची नोंद झाली. नुकसानीच्या सर्वेक्षणात पहिल्या टप्प्यात ६५० हेक्टर बाधित झाल्याचा अहवाल आहे. सर्वाधिक फटका ३८ गावांना बसला. यात शेलोडी, राजूरा, किन्ही वळगी, तरोडा, बिजोरा, बोथ, गौळपेंड, धूळापूर, मुंडळ, बोरी बु., भोपापूर, फुबगाव, भांडेगाव या गावांचा समावेश आहे.
४१२ हेक्टरमधील हरभरा पीक, १८८ हेक्टरमधील गहू, १२ हेक्टरवरील केळी फळबाग, १७ हेक्टरमधील संत्रा फळबाग, दोन हेक्टरवरील आंबा फळबाग, २१ हेक्टरमधील भाजीपाला पीक पूर्णत: नष्ट झाले. खोपडी येथील दत्ता राहाणे या शेतकऱ्यांची पाच एकर आंबा बाग, बोथचे सुभाष पांडुरंग डुकरे यांची संत्र्याची ७०० झाडे नष्ट झाली.
या नैसर्गिक आपत्तीने हादरलेल्या डोल्हारी जिल्हा परिषद सर्कलमधील शेतकऱ्यांनी गारा, गहू, हरभरा, फळबाग पिकांचे अवशेष घेवून थेट तहसील कार्यालय गाठले. नायब तहसीलदार सरागे यांना निवेदन देवून तत्काळ सर्वेक्षण व मदतीची मागणी केली. यावेळी विनोद राठोड, प्रभाकर राठोड, तुळशीराम मेश्राम, बापुराव गव्हाणे, सुधाकर राठोड, भगवान जाधव, गोविंद जाधव, रमेश आडे, रामहरी जामदकर, मिलिंद ढवळे, रमेश जाधव, मारोती गव्हाणे उपस्थित होते. तालुक्यात युद्धपातळीवर नुकसानीचा सर्वे सुरू असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी नालंदा भरणे यांनी दिली.

आर्णी तालुक्यातही नुकसान
आर्णी : तालुक्यातील लोणबेहळ, आबोडा, कवठाबाजार, राणीधानोरा, साकुर, कोसधनी, सेंदूरसनी, अजनखेड परिसरात शेतातील गहू, हरबरा, तिळ, ज्वारी, मक्का पिकांना फटका बसला. गहू गारपिटीने खाली पडला. महसूल विभागाने नुकसानीचा सर्व्हे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Displaced 650 hectares of crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.