सायकलने गाठला २३५० कि.मी.चा पल्ला; जिद्दी नारायण कारगिलमध्ये धडकला

By सुनील काकडे | Published: August 25, 2023 06:30 PM2023-08-25T18:30:36+5:302023-08-25T18:30:55+5:30

जिद्द, चिकाटीच्या जोरावर ध्येयपूर्ति

The cycle covered a distance of 2350 km; Narayan vyas reached into Kargil | सायकलने गाठला २३५० कि.मी.चा पल्ला; जिद्दी नारायण कारगिलमध्ये धडकला

सायकलने गाठला २३५० कि.मी.चा पल्ला; जिद्दी नारायण कारगिलमध्ये धडकला

googlenewsNext

वाशिम : मनुष्याच्या अंगी जिद्द, चिकाटी आणि ठरविले ते करून दाखविण्याची तयारी असल्यास तो कितीही कठीण ध्येय सहज साध्य करू शकतो. त्याची प्रचिती येथील सायकलपटू नारायण व्यास यांनी पुन्हा एकवेळ घडवून दिली. ४२ वर्षे वय असलेल्या व्यास यांनी १० दिवसांपूर्वी, स्वातंत्र्यदिनी वाशिमवरून कारगिलकडे सायकलने कुच केली. उन्ह, पाऊस आणि असह्य गारव्याचा सामना करत ध्येयवेड्या नारायणने तब्बल २३५० किलोमिटरचे अंतर सायकलने कापत अखेर शुक्रवार, २५ ऑगस्ट रोजी प्रवास पूर्ण करून शहिदांना मानवंदना दिली.

सर्वसामान्य कुटूंबात जन्माला आलेले नारायण व्यास यांना सायकल चालविण्याचा छंद जडला असून सततच्या सरावामुळे यापूर्वी त्यांनी २०१६ ते २०१९ असे सलग तीन वर्षे वाशिम ते लालबाग (मुंबई) हे ६०० किलोमिटरचे अंतर सायकलने पूर्ण केले. नंतरच्या टप्प्यात मार्च २०२० मध्ये वाशिम ते वाघा बॉर्डर (पंजाब) हे १८०० किलोमिटरचे अंतर सायकलने पूर्ण करून दाखविले. तिथेच न थांबता कोरोना काळातील सामाजिक कार्याप्रती सिने अभिनेता सोनू सुद यांना समर्पित वाशिम ते रामसेतू या २००० किलोमिटर अंतराच्या सायकलवारीचा निर्धार करून व्यास यांनी ७ ते १४ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत तो प्रवास पूर्ण केला. तसेच सप्टेंबर २०२२ मध्ये क्रिकेटपटू तथा भारतरत्न सचिन तेंडूलकर यांना समर्पित दिल्लीच्या इंडिया गेटपासून मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियापर्यंत १४२० किलोमिटरचा प्रवास या जिगरबाज सायकलपटूने लिलया पूर्ण केला.

आता पुढे काय, हा प्रश्न स्वत:लाच विचारत देशाच्या रक्षणासाठी स्वत:च्या जिवाचे बलिदान देणारे जवान व भारतीय सैन्याला समर्पित अशा वाशिम ते कारगिल वाॅर मेमोरिअल या २३५० किलोमिटर अंतराच्या सायकलवारीचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले. त्यानुसार, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजता त्यांनी प्रत्यक्ष प्रवासाला प्रारंभ केला. मजल-दरमजल गाठत २५ ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास नारायण व्यास यांनी ध्येयपूर्ति करून शहिदांना मानवंदना दिली. त्यांच्या या जिगरबाज कार्यकर्तुत्वाचे वाशिमकरांकडून काैतुक होत आहे.

७ राज्यांची सिमा ओलांडून गाठली देशाची सिमा
अंगी असलेली जिद्द आणि चिकाटीच्या बळावर सायकलपटू नारायण व्यास यांनी शुक्रवारी वाशिम ते कारगिल हे २३५० किलोमिटरचे अंतर सायकलने पूर्ण केले. या प्रवासादरम्यान त्यांना महाराष्ट्रासह तब्बल सात राज्यांची सिमा ओलांडावी लागली. केवळ रात्री थोडीशी विश्रांती घेऊन आणि दिवसभर सायकलचे पायडल मारून अखेर त्यांनी शुक्रवारी देशाची सिमा गाठण्यात यश प्राप्त केले.

वाशिमकर म्हणाले, तुझा अभिमान आहे
नारायण व्यास यांनी त्यांच्या आयुष्यात लांबपल्ल्याचा सायकल प्रवास सहज पूर्ण करून दाखविला. त्यामुळे १० दिवसांपूर्वी ते वाशिमवरून कारगिलला निघाले असताना वाशिमकरांनी मनात किंतू-परंतू न ठेवता त्यांना शुभेच्छा दिल्या. शुक्रवारी नारायण व्यास कारगिलला पोहोचल्याची वार्ता कळताच सोशल मिडीयावर अनेकांनी ‘आम्हाला तुझा अभिमान आहे’, असे म्हणत व्यास यांच्या जिद्दीचे काैतुक केले.

Web Title: The cycle covered a distance of 2350 km; Narayan vyas reached into Kargil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.