खरीप हंगामात बियाणे न उगवण्याच्या तक्रारीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 11:29 AM2021-07-19T11:29:47+5:302021-07-19T11:29:53+5:30

Washim News : १९ शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या असून, यापैकी १४ शेतकऱ्यांनी तक्रार मागे घेतली आहे.

Decrease in seed germination complaints during kharif season | खरीप हंगामात बियाणे न उगवण्याच्या तक्रारीत घट

खरीप हंगामात बियाणे न उगवण्याच्या तक्रारीत घट

Next

- संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गतवर्षी खरीप हंगामात बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारींचा पाऊस पडला होता. यंदा मात्र आतापर्यंत केवळ १९ शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या असून, यापैकी १४ शेतकऱ्यांनी तक्रार मागे घेतली आहे.
गतवर्षातील नैसर्गिक आपत्तीच्या संकटातून स्वत:ला सावरत यंदा शेतकरी हे खरीप हंगामासाठी नव्या जोमाने कामाला लागल्याचे दिसून आले. यंदा जिल्ह्यात ४ लाख ६ हजार ४५० हेक्‍टरवर पेरणीचे नियोजन केले होते. आतापर्यंत ९८ टक्के पेरणी आटोपली असून, सर्वाधिक पेरा सोयाबीनचा आहे. खरीप हंगामात पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी धावपळ करावी लागली. विशेषत: महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांसाठी वेटिंगवर राहूनही अनेक शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली. आता सोयाबीन, तूर, कपाशी यासह खरिपातील सर्व पिके चांगलीच बहरली आहेत. गतवर्षी बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारींचा पाऊस पडला होता. जवळपास ३२०० तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या होत्या. यंदा मात्र तक्रारींची संख्या लक्षणीय घटली असून, आतापर्यंत केवळ १९ शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले. त्यातही १४ शेतकऱ्यांनी तक्रारी मागे घेतल्या तर उर्वरित ५ तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले नसल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी सांगितले. 


महाबीज बियाण्याबाबत एकही तक्रार नाही !
गेल्या वर्षी महाबीजचे बियाणे उगवले नसल्यासंदर्भात तक्रारींचा पाऊस होता. यंदा महाबीज बियाणे उगवले नसल्याबाबत आतापर्यंत एकही तक्रार महाबीजकडे प्राप्त झाली नाही, असे महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक डॉ. प्रशांत घावडे यांनी स्पष्ट केले.


यावर्षी घरगुती बियाणे वापरासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती केली तसेच बियाणे उगवण क्षमता तपासणीचे प्रात्यक्षिकही दिले. यावर्षी बियाणे उगवले नसल्याच्या १९ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यापैकी १४ शेतकऱ्यांनी तक्रारी मागे घेतल्या तर पाच तक्रारीत तथ्य आढळून आले नाही.
-  शंकर तोटावार
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम
 

Web Title: Decrease in seed germination complaints during kharif season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.