Told to use urine for his whisky, man kills friend | लघुशंका मिसळून व्हिस्कीचा पेग बनव म्हटले म्हणून मित्राची केली हत्या
लघुशंका मिसळून व्हिस्कीचा पेग बनव म्हटले म्हणून मित्राची केली हत्या

ठळक मुद्देशनिवारी रात्री गोडदेव नाका येथील इंडस्ट्रीयल भागात संदीप गवस, अच्युत चौबे (25) आणि आणखी तिघे जण दारु प्यायला बसले होते. अच्युत चौबेने आपला चारचौघांसमोर पाणउतारा केला अशी संदीप गवसची भावना झाली.

भाईंदर - दारु पिताना पाणी संपले म्हणून एका मित्राने दुस-याला आता स्वत:ची लघुशंका मिसळून पेग बनव असे गंमतीने म्हटले, त्यावरुन झालेल्या मोठया वादातून एकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यात भाईंदरमध्ये घडली. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास एकत्र बसून दारु पिताना मित्रांमध्ये आपसात झालेल्या वादातून ही हत्या झाली. नवघर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून संदीप गवस (27) याला सोमवारी अटक केली आहे. संदीप पेशाने मजूर असून तो फरार होता. 

शनिवारी रात्री गोडदेव नाका येथील इंडस्ट्रीयल भागात संदीप गवस, अच्युत चौबे (25) आणि आणखी तिघे जण दारु प्यायला बसले होते. रविवारची पहाट होईपर्यंत त्यांची पार्टी रंगली होती. रात्री दोन वाजता गवसला आणखी एक पेग बनवायचा होता. पण व्हिस्कीमध्ये मिसळण्यासाठी पाणीच शिल्लक राहिले नव्हते. त्यावेळी चौबेने मस्करीमध्ये आता स्वत:ची लघुशंका मिसळून पेग बनव असे म्हटले. 

त्यावेळी अन्य तीन मित्रांनीही संदीप गवसची फिरकी घेतली. अच्युत चौबेने आपला चारचौघांसमोर पाणउतारा केला अशी संदीप गवसची भावना झाली. त्याला भंकस सहन झाली नाही. त्याने बाजूला पडलेले लाकूड उचलले आणि अच्युतच्या डोक्यात मारले. तिथे असलेल्या विवेक सिंहने मध्ये हस्तक्षेप करुन संदीपला रोखण्याचा प्रयत्न केला पण संदीपने त्याला सुद्धा मारहाण केली. घाव वर्मी बसल्याने अच्युतच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरु झाला. आपल्यावर प्रकरण शेकणार असल्याचे लक्षात येताच संदीप आणि अन्य तिघे तिथून पळून गेले. चौबे रात्रभर तसाच तिथे रक्ताच्या थारोळयात पडून होता. दुस-या दिवशी सकाळी स्थानिकांना त्याचा मृतदेह सापडला.                                                                                                                                      
 


Web Title: Told to use urine for his whisky, man kills friend
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.