डॉक्टर ठरला दोघांच्या मृत्यूला कारणीभूत 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 09:19 AM2024-04-15T09:19:40+5:302024-04-15T09:20:14+5:30

भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलिस ठाण्यासमोर वेणूनगर आहे.

doctor was responsible for the death of both | डॉक्टर ठरला दोघांच्या मृत्यूला कारणीभूत 

डॉक्टर ठरला दोघांच्या मृत्यूला कारणीभूत 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड : स्वतःच्या दवाखान्यासाठी जुन्या इमारतीतील सदनिकांमध्ये बेकायदा बदल घडवून आणत आतील भिंतीचे बांधकाम तोडल्याने वरचा स्लॅब मजुरांच्या अंगावर कोसळल्याची घटना भाईंदरमध्ये घडली आहे. या घटनेत माखनलाल रामवचन यादव (२६, रा. गणेश देवलनगर, भाईंदर पश्चिम) आणि कंत्राटदार हरिराम शिवपूजन चौहान (५६, रा. कृष्णदीप, नवघर मार्ग) या दोघांचा दुर्घटनेत मृत्यू झाला आहे, तर आकाशकुमार यादव हा जखमी आहे. याप्रकरणी नवघर पोलिसांनी डॉक्टरवर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. 

भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलिस ठाण्यासमोर वेणूनगर आहे. त्याठिकाणी श्रीनाथ ज्योत इमारत आहे. इमारतीच्या तळमजल्याच्या २ सदनिका डॉ. विनयकुमार त्रिपाठी याने घेतल्या आहेत. त्याठिकाणी एका बाजूने गाळा काढून त्यात स्वतःचा दवाखाना थाटला, दोन्ही सदनिकांमधील जुन्या भिंती, स्लॅब आदी काढून त्या एकत्र करण्याचे काम डॉक्टर त्रिपाठी याने चालवले होते. याबाबत गृहनिर्माण संस्थेने डॉक्टरला सांगूनदेखील त्याने जुमानले नाही. त्यामुळे महापालिकेच्या प्रभाग समिती ३ मध्ये सोसायटीने तक्रार केली होती. दरम्यान, रविवारीदेखील सदनिकांमध्ये तोडकाम सुरू होते. सकाळी साडेदहाच्या सुमारास शौचालय व बाथरूमवरील पाण्याची टाकी आदी ठेवण्यासाठी असलेला स्लॅब व लगतची भिंत ही कामे करणाऱ्या मजूर आणि कंत्राटदारावर कोसळली. 

गुन्हा दाखल 
माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी येऊन कटरच्या साहाय्याने भिंत व स्लॅब बाजूला करत खाली अडकलेल्यांना बाहेर काढले. आयुक्त संजय काटकर यांनी घटनास्थळाची पाहणी करून आढावा घेत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. कांबळे यांच्या फिर्यादीवरून डॉ. त्रिपाठी याच्यावर नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

स्ट्रक्चरल ऑडिटची दिली होती नोटीस
तक्रारीनंतर पालिकेने डॉ. त्रिपाठीला काम बंद करण्याची, स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची नोटीस दिली होती; परंतु डॉ. त्रिपाठी याने सुटीची संधी साधून काम सुरू केल्याने दुर्घटना घडून दोघांचा मृत्यू झाल्याचे कांबळे यांनी सांगितले. पोलिसांनी सोसायटी पदाधिकाऱ्यांकडे चौकशी करत जबाब नोंदवला. फिर्याद देताच डॉ. त्रिपाठीला ताब्यात घेतले. 

Web Title: doctor was responsible for the death of both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.