वर्ध्यात भाजपपुढे गटबाजीचे तर काँग्रेसपुढे विजयाचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 10:32 PM2019-07-22T22:32:24+5:302019-07-22T22:32:44+5:30

वर्धा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षापुढे यावेळी गटबाजीचे, तर काँग्रेस पक्षापुढे आपला बालेकिल्ला परत मिळविण्याचे आव्हान आहे. गेल्यावेळी २०१४ मध्ये भाजपने पहिल्यांदा या मतदारसंघात विजय मिळविला होता. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचा असलेला हा बालेकिल्ला उद्ध्वस्त झाला.

In Wardha, there is a grouping ahead of the BJP and the challenge of winning the Congress | वर्ध्यात भाजपपुढे गटबाजीचे तर काँग्रेसपुढे विजयाचे आव्हान

वर्ध्यात भाजपपुढे गटबाजीचे तर काँग्रेसपुढे विजयाचे आव्हान

Next
ठळक मुद्देभाजपात इच्छुकांची संख्या वाढली : काँग्रेस शेंडे कुटुंबावर पुन्हा प्रसन्न होणार काय ?

अभिनय खोपडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षापुढे यावेळी गटबाजीचे, तर काँग्रेस पक्षापुढे आपला बालेकिल्ला परत मिळविण्याचे आव्हान आहे. गेल्यावेळी २०१४ मध्ये भाजपने पहिल्यांदा या मतदारसंघात विजय मिळविला होता. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचा असलेला हा बालेकिल्ला उद्ध्वस्त झाला. २००९ च्या निवडणुकीत प्रमोद शेंडे यांच्या हयातीतच त्यांचे सुपुत्र शेखर शेंडे काँग्रेसच्या तिकिटावर लढले व अपक्ष उमेदवार सुरेश देशमुख यांनी त्यांचा पराभव केला.
त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे डॉ.पंकज भोयर विजयी झाले. त्यांनी सुरेश देशमुख यांच्यासह शेखर शेंडे यांचा दुसऱ्यांदा पराभव केला. २०१४ मध्ये आश्चर्यकारकरीत्या पंकज भोयर यांना दत्ताजी मेघे यांच्या पुढाकारातून ऐनवेळी वर्धा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे ते बाहेरचे व आपण पक्षाचे, अशी एक भावना भाजपमधील जुन्या लोकांची झाली. ती आजही कायम आहे. मागील ५ वर्षांत हीच बाब सातत्याने दिसत आली. २०१४ च्या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे सदस्य राणा रणनवरे यांनीही भाजपच्या विरोधात निवडणूक लढविली होती.
यावेळी डॉ. पंकज भोयर पुन्हा निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे. मात्र, भाजपमधून काही नेते व गटांचा त्यांच्या उमेदवारीला विरोध आहे. भाजपकडून डॉ.भोयर यांच्या व्यतिरिक्त माजी खासदार सुरेश वाघमारे, वर्ध्याचे नगराध्यक्ष अतुल तराळे, जिल्हा परिषदेचे सदस्य राणा रणनवरे आदी विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार आहेत. तर काँग्रेसकडून प्रमोद शेंडे यांचे सुपुत्र शेखर शेंडे पुन्हा लढण्यासाठी तयार आहेत.
तर आमदार रणजित कांबळे गटाकडून अमित गावंडे तर अ‍ॅड.चारूलता टोकस यांच्या गटाकडून शहर अध्यक्ष सुधीर पांगूळ यांचे नाव आघाडीवर आहे. याशिवाय माजी आमदार माणिकराव सबाने यांचे सुपुत्र पराग सबाने यांनीही थेट दिल्ली व प्रदेश दरबारी आपल्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय वैद्यकीय जनजागृती मंचच्या माध्यमातून सातत्याने काम करणारे डॉ. सचिन पावडे हे ही वर्धा विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरण्यासाठी तयारीत असल्याचे त्यांच्या निकटवर्तींयाकडून सांगण्यात येत आहे. याशिवाय वर्धा विधानसभा मतदार संघात बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी आदींचेही उमेदवार मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
पुनर्ररचनेनंतर वर्धा विधानसभा मतदारसंघ मोठ्या प्रमाणावर बदलला असून या मतदार संघात वर्धा शहरासह लगतची मोठी ५ ते ७ गावे व सेलू तालुक्याचा ७५ टक्के भाग समाविष्ट आहे. सेलू तालुक्याचा हा भाग तेलीबहुल असल्याने या मतदार संघात लोकसभा निवडणूकीत भाजपला ३७ हजारावर आघाडी मिळाली.
त्यामुळे भाजप येथे भोयर यांनाच उमेदवारी देते काय किंवा उमेदवार बदलविते, हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे.
वर्धा शहर राहणार निर्णायक
ंगेल्या विधानसभा निवडणुकीत पिपरी (मेघे) व सिंदी (मेघे) या दोन गावांच्या भरवशावर भाजपचे डॉ.पंकज भोयर यांनी या मतदारसंघात विजय मिळविला. गेल्या ५ वर्षांत सेलू तालुक्यासह वर्धा शहरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झालीत. या भागातील बहुतांश ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता आली आहे. मात्र, वर्धा शहराचे मतदान या निवडणुकीत निर्णायक राहणार आहे. या मतदार संघात तेली, कुणबी या दोन प्रमुख समाजाव्यतिरिक्त इतर समाजाचेही मोठ्या संख्येने मतदार आहे. शहरातील विकासकामांच्या अनागोंदीची झळ सर्व सामान्यांना बसली. रस्ते, भूमिगत गटार योजना यामुळे जनजीवन प्रभावित झाले. त्यामुळे मतदार भाजपवर नाराज आहेत. याचा फटका विधानसभा निवडणुकीत भाजपला बसण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढली होती. यावेळी मात्र सुरेश देशमुख काँग्रेसच्या उमेदवाराला मदत करण्याच्या भूमिकेत आहेत. मात्र, शेंडे कुटुंबातील उमेदवार असला तरच हे शक्य होईल, असे त्यांचे निकटवर्तीय सांगतात.

Web Title: In Wardha, there is a grouping ahead of the BJP and the challenge of winning the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.