कॉँग्रेसला सोबत घेऊन सरकारला घेरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 10:50 PM2017-12-04T22:50:50+5:302017-12-04T22:51:16+5:30

Together with Congress, the government will surround | कॉँग्रेसला सोबत घेऊन सरकारला घेरणार

कॉँग्रेसला सोबत घेऊन सरकारला घेरणार

googlenewsNext
ठळक मुद्देअजित पवार : हल्लाबोल पदयात्रेत केंद्र व राज्य सरकारवर टिका

आॅनलाईन लोकमत
देवळी : राज्यातील भाजप-शिवसेनेचे सरकार खोटारडे व निष्क्रीय आहे. या सरकारच्या विरोधात कॉँग्रेससह समविचारी पक्षांना एकत्र करून राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष आगामी विधानसभेत घेरणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी दिली.
हल्लाबोल पदयात्रेचे वर्धा जिल्ह्यात आगमण झाल्यानंतर सोमवारी दापोरी शिवारात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अजीत पवार पूढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या इतिहासात एवढे खोटारडे सरकार आतापर्यंत झाले नाही. निवडणुकीच्या वेळी लोकांना दिलेले एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही. निवडणुका नाही म्हणून आता शेतकºयांना कोणतीही मदत दिली जात नाही. शेतकºयांच्या प्रश्नांकडे सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत ८९ लाख शेतकºयांचे ३५ हजार कोटींचे कर्ज माफ करू, असे जाहीर केले होते; पण एकाही शेतकºयाच्या खात्यावर कर्जमाफीचे पैसे आलेले नाहीत. मागील तीन वर्षांत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पूर्णपणे ढासळली आहे. देशातील पाच शहरांच्या क्राईम रेशोमध्ये महाराष्ट्रातील तीन शहर आहेत. तीन वर्षांत महाराष्ट्रात एकही नवा उद्योग आला नाही. आम्ही १९६० पासून राज्य चालविले. त्यावेळी राज्यावर २ लाख ९६ हजार कोटी रुपयांचे कर्ज होते. या सरकारने आता हे कर्ज ४ लाख ५० हजार कोटींवर गेले.
बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. समाजातील कोणताच घटक या सरकारच्या कामकाजावर समाधानी नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसा उभा करण्याकरिता प्रत्येक जिल्ह्याच्या नियोजन विकास आराखड्यात ३० टक्के कपात होत आहे. किटकनाशकाच्या फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यात ३० शेतकºयांचा मृत्यू झाला. बी.टी कापसाच्या बियाण्यांवर संशोधनाचे काम आघाडी सरकारच्या काळात सुरू झाले होते; पण या सरकारच्या काळात हे काम ठप्प झाले आहे. एकाही शेतमालाला हमीभाव या सरकारने दिलेला नाही. यामुळे या सरकारवर हल्लाबोल करण्यासाठी कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष एकत्रित येत आहे. १२ डिसेंबरला राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या नेतृत्वात सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकले जाणार आहे, असेही अजीत पवार यांनी सांगितले.
शेतकºयांच्या कापसाला बोनस जाहीर केला पाहिजे व कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यावर कर्जमाफीची किती रक्कम जमा झाली, याची माहिती विधीमंडळात सरकारला मागणार आहोत, असे पवार म्हणाले. या पत्रपरिषदेला विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा. सुप्रिया सुळे, आ. राजेश टोपे, आ. शशिकांत शिंदे, आ. विद्या चव्हाण, चित्रा वाघ, सुरेश देशमुख, राजू तिमांडे, अ‍ॅड. सुधीर कोठारी, सुरेखा ठाकरे आदी उपस्थित होते.
राज्य सरकारने केले गोरगरीब, बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे पातक
महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्रात शिक्षणाची बीजे रोवली. दुर्गम भागात शिक्षणाचा विस्तार करण्याचे काम तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शरद पवार आदींनी केले. त्यांनी शालेय शिक्षणापासून अभियांत्रिकी, मेडिकल, इंजिनिअरींग शिक्षणाचा पाया रोवला. हे सरकार आता कमी पटसंख्येच्या १ हजार ४०० शाळा बंद करून डोंगराळ, आदिवासीबहुल भागातील गोरगरीब व बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे पातक करीत आहे, असा आरोप पवार यांनी केला.
ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करण्याचे काम सुरू आहे. ज्या शिक्षण संस्थांनी शिष्यवृत्ती घोटाळा केला, त्या एकाही संस्था चालकावर सरकारने कारवाई केली नाही. उलट ओबीसींची शिष्यवृत्ती बंद करून त्यांना अडचणीत आणण्याचे काम हे सरकार करीत आहे. गावातील शाळा बंद झाली तर मुलींच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. मुलींना बाहेरगावी शिक्षणाला वडील पाठवित नाही. आज महाराष्ट्रात प्रत्येक क्षेत्रात ७८ टक्के मुली आघाडीवर असल्याचे दिसते. देवेंद्र फडणवीस सरकार केवळ अभ्यास समिती गठित करणे, अभ्यास करणे व चौकशी करणे याच कामात व्यस्त आहे, असा आरोपही त्यांनी केला.
नोटबंदीचा निर्णय करताना दहशतवाद संपेल, असे सांगण्यात आले होते; पण अवघ्या दोन महिन्यांत दहशतवाद्यांकडे २ हजाराची नोट असल्याचे दिसून आले. अद्याप केंद्र सरकारने नोटबंदीतून किती पांढरा पैसा, किती काळा पैसा जमा झाला, या नोटांचा हिशोब दिलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक भूमिपूजन कार्यक्रमासाठी ५० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला; पण छत्रपतींच्या स्मारकाची एक विटही रचली गेली नाही. बाबासाहेबांच्या स्मारकाचीही हीच अवस्था आहे. गुजरातमध्ये निवडणुका असल्याने तेथील शेतकºयांना कापसावर बोनस दिला जात आहे. मागेल त्याला शेततळे व विहीर योजना जाहीर केली; पण लाभार्थ्यांना तुमचा नंबर आल्यावर विहीर देऊ, असे म्हणत असल्याचेही पवार यांनी सांगितले.
विदर्भावर अधिक लक्ष देणार
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात विदर्भातून सर्वात कमी जागा मिळतात. आमच्याविषयी भाजपवाल्यांनी हे पश्चीम महाराष्ट्राकडे निधी पळवितात, अशी प्रतिमा तयार करून ठेवली आहे व तसा आरोप केला जातो. ही प्रतिमा पुसून काढण्यासाठी आगामी काळात विदर्भावर अधिक लक्ष आम्ही केंद्रीत करणार असल्याचे अजीत पवार यांनी स्पष्ट केले. यापूर्वी २००४, २००९, २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँगे्रसला विदर्भात अत्यल्प जागा मिळाल्या. त्यामुळे आता विदर्भावरच लक्ष देणार आहोत.

Web Title: Together with Congress, the government will surround

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.