सेवाग्राम विकास आराखडा आॅक्टोबर २०१९ पर्यंत पूर्ण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 01:07 AM2017-10-25T01:07:50+5:302017-10-25T01:08:03+5:30

सेवाग्राम परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी २६६ कोटी रुपयांच्या सेवाग्राम विकास आराखड्यास शिखर समितीने मान्यता दिली आहे.

Sevagram Development Plan to be completed by October 2019 | सेवाग्राम विकास आराखडा आॅक्टोबर २०१९ पर्यंत पूर्ण करणार

सेवाग्राम विकास आराखडा आॅक्टोबर २०१९ पर्यंत पूर्ण करणार

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : आढावा बैठकीत घेतली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सेवाग्राम परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी २६६ कोटी रुपयांच्या सेवाग्राम विकास आराखड्यास शिखर समितीने मान्यता दिली आहे. या आराखड्याची अंमलबजावणी आॅक्टोबर २०१९ पर्यंत पूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन वित्त व नियोजन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे केले.
सेवाग्राम विकास आराखड्याचा सोमवारी वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. बैठकीला नियोजन विभागाचे प्रधान सचिव देबाशिष चक्रवर्ती, वर्धेचे जिल्हाधिकारी शैलेश नवल, सेवाग्राम आश्रमचे पदाधिकारी आणि इतर वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते. सेवाग्राम विकास आराखड्यामध्ये मंजूर केलेली सर्व कामे ही निश्चित केलेल्या वेळेतच पूर्ण व्हावीत, त्या कामांचा दर्जा उत्तम राहावा यासाठी प्रत्येक कामाची कालबद्धता आणि दायित्व निश्चित करण्यात यावे, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले. शिवाय लघु आणि कुटीर उद्योगांना चालना देण्याकरिता ‘गांधी फॉर टुमारो’, महात्मा गांधी प्रशिक्षण आणि संसाधन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. त्याचे कामही २०१९ च्या आधी पूर्ण करण्याचा शासनाचा मानस असल्याचे सांगण्यात आले. यासाठी उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्यावतीने उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचा अंगीकार करीत सेवाग्राम, वर्धा येथे ग्रामोद्योग, कुटीरोद्योग, हस्तकला उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी अहवाल तयार करून तो शासनाला सादर करावयाचा असल्याचेही याप्रसंगी सांगण्यात आले. यावेळी त्यांनी कामांची प्रगती जाणून घेतली.

Web Title: Sevagram Development Plan to be completed by October 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.