40 झोपड्यांवर सार्वजनिक बांधकाम विभागानं चालवला हातोडा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 03:36 PM2018-02-21T15:36:22+5:302018-02-21T15:36:30+5:30

बजाज चौकातील आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलाच्या रुंदीकरणाचे काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे. या रुंदीकरणाच्या कामात अतिक्रमण करून राहत असलेल्या सुमारे ४० कुटुंबीयांच्या झोपड्या अडथळा निर्माण करीत असल्याचे कारण पुढे करीत बुधवारी सा. बां. विभागाने विशेष अतिक्रमण हटाव मोहीम राबवून काही झोपड्या पाडल्या.

The Public Works Department has run 40 huts | 40 झोपड्यांवर सार्वजनिक बांधकाम विभागानं चालवला हातोडा

40 झोपड्यांवर सार्वजनिक बांधकाम विभागानं चालवला हातोडा

Next

वर्धा : येथील बजाज चौकातील आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलाच्या रुंदीकरणाचे काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे. या रुंदीकरणाच्या कामात अतिक्रमण करून राहत असलेल्या सुमारे ४० कुटुंबीयांच्या झोपड्या अडथळा निर्माण करीत असल्याचे कारण पुढे करीत बुधवारी सा. बां. विभागाने विशेष अतिक्रमण हटाव मोहीम राबवून काही झोपड्या पाडल्या. अतिक्रमण धारकांनी स्वत:च आपले अतिक्रमण काढावे, अशी नोटीस यापूर्वी सा. बां. विभागाच्या वतीने सदर झोपडी मालकांना बजावला होता. पण त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही मोहीम राबविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता महेश मोकलकर यांच्या नेतृत्वात सा. बां. विभागाची चमू जेसीबीसह बजाज चौक भागातील आचार्य विनोबा भावे उड्डाण पूल परिसरात बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास पोहोचले. सुरुवातीला अतिक्रमण धारक नागरिकांकडून पहिले राहण्यासाठी जागा द्या नंतरच अतिक्रमण काढा, अशी विनंती करण्यात आली. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी तुम्हाला न. प. ने स्मशानभूमी परिसरात जागा उपलब्ध करून दिली आहे. तेथे तुम्ही राहण्यासाठी जावे, असे सांगितले. त्यानंतर तणावपूर्ण शांततेत पोलीस बंदोबस्तात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू केली. दुपारी २ वाजेपर्यंत अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या सुमारे २५ झोपड्या सा. बां. विभागाच्या अधिका-यांनी जेसीबीच्या सहाय्याने पाडल्या. दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यामुळे ही कारवाई दुपारी २ वाजताच्या सुमारास थांबविण्यात आली.

संसार आला उघड्यावर
अतिक्रमण हटाव मोहीम राबवित असताना सदर परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. पोलीस बंदोबस्तात सा.बां.वि.च्या अधिका-यांसह कर्मचा-यांनी जेसीबीच्या सहाय्याने दुपारी २ वाजेपर्यंत सुमारे २५ झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. या प्रकारामुळे सदर २५ जणांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. आचार्य विनोबा भावे उड्डणपूल परिसरात अतिक्रमण करून राहणा-यांना तात्काळ पक्के घरे बांधून देण्यात यावी, अशी मागणी अतिक्रमण धारकांची आहे.

पाच दिवसात अतिक्रमण न काढल्यास पुन्हा राबविणार मोहीम
जिल्हाधिका-यांच्या सूचनेवरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी अतिक्रमण हटाव मोहीम थांबविली आहे. येत्या पाच दिवसांत अतिक्रमण धारकांनी स्वत:च अतिक्रमण न काढल्यास पाच दिवसानंतर सा.बां.विभागाच्या वतीने पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. अतिक्रमण मोहिमेदरम्यान आचार्य विनोबा भावे उड्डाणपूल परिसरात बघ्यांची एकच गर्दी झाली होती.

जिल्हाधिका-यांच्या सूचनेवरून थांबली अतिक्रमण हटाव मोहीम
अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना अतिक्रमण धारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी जिल्हाधिकारी व अतिक्रमण धारक यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. चर्चेअंती येत्या पाच दिवसांत अतिक्रमण धारकांनी स्वत:च अतिक्रमण काढावे यावर अतिक्रमण धारकांनी होकार दर्शविल्याने जिल्हाधिका-यांच्या सूचनेवरून बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास अतिक्रमण हटाव मोहीम थांबविण्यात आली.

स्मशानभूमी भागातील जागा पंतप्रधान आवास योजनेसाठी
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विनंतीला मान देत स्मशानभूमी परिसरातील जागा अतिक्रमण धारकांना देण्यासाठी न.प.ने मौखिक होकार दर्शविला आहे. सदर जागेवर पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना पक्क घर बांधून देण्यासाठी न.प.ने ठराव घेतला असल्याचे न.प.तील एका अधिका-याने सांगितले.

Web Title: The Public Works Department has run 40 huts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.