राष्ट्रवादीच्या मोर्चामुळे समुुद्रपूरवासीयांचा ‘फ्लॅशबॅक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 10:35 PM2018-12-03T22:35:24+5:302018-12-03T22:37:24+5:30

तालुक्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी १९८१ मध्ये शेतकरी संघटनेच्यावतीने भव्य मोर्चा काढून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवरील जाम चौरस्त्यावर चक्काजाम केला होता. त्यानंतर शेतकरी प्रश्नांसाठी आंदोलने झाली पण, इतका उदंड प्रतिसाद मिळाला नाही.

NCP's 'flashback' for the people of Samudrapur | राष्ट्रवादीच्या मोर्चामुळे समुुद्रपूरवासीयांचा ‘फ्लॅशबॅक’

राष्ट्रवादीच्या मोर्चामुळे समुुद्रपूरवासीयांचा ‘फ्लॅशबॅक’

googlenewsNext
ठळक मुद्देजागविल्या जुन्या आठवणी : २९ वर्षानंतर शेतकरी प्रश्नासाठी एकवटले महिला-पुरुष

सुधीर खडसे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : तालुक्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी १९८१ मध्ये शेतकरी संघटनेच्यावतीने भव्य मोर्चा काढून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवरील जाम चौरस्त्यावर चक्काजाम केला होता. त्यानंतर शेतकरी प्रश्नांसाठी आंदोलने झाली पण, इतका उदंड प्रतिसाद मिळाला नाही. परंतू राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांच्या नेतृत्वात २६ नोव्हेबर २०१८ रोजी तहसील कार्यालयावर धडकलेल्या विराट मोर्चा पाहून समुद्रपुरवासियांना तब्बल २९ वर्षानंतर १९८१ च्या शेतकरी संघटनेच्या भरभराटीच्या काळातील मोर्चाची आठवण झाली.
सन १९७५ ते १९८५ या काळात शरद जोशी यांच्या प्रेरणेने तालुक्यातील तत्कालीन समर्थक डॉ.सुधीर खेडूलकर व बसंतराज निखाडे, गिरडचे भावराव गाठे, समुद्रपूरचे ओमप्रकाश चौधरी व वायगाव (गोंड) येथील सुरेंद्र कुकेकर या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी १९८१ ला शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी भव्य मोर्चा काढला होता. हा मोर्चा आजही सर्वांना डोळ्यात साठवून आहे. त्यामुळे नुकताच राष्ट्रवादीच्या निघालेल्या मोर्चाने त्याला उजाळा मिळाला. १९७५ ते १९८५ च्या कालखंडात तालुक्यात शरद जोशी यांनी शेतकऱ्याला जागृत करीत त्यांचे अधिवेशन घेऊन आपल्या हक्काची जाणीव करून दिली. शासनाच्या विरोधात उग्र मोर्चे, निदर्शने व चक्काजाम करुन शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली काढले.
त्यानंतर या संघटनेने राजकारणात प्रवेश केल्यानंतर दहा वर्षाच्या कालखंडात शेतकरी संघटनेचे दहा वर्ष आमदार, पाच वर्ष समुद्रपूर पंचायत समितीचे सभापतीपद, भूविकास बँकचे संचालक व बापुराव देशमुख सुतगिरणीचे संचालक तसेच जिल्हा परिषद सदस्य आदी राजकीय पदे उपभोगता आली. शेतकरी संघटनेच्या राजकीय आखाड्यातील प्रवेशामुळे कालांतरणाने शेतकरी प्रश्न लांब पडू लागले. परिणामी शेतकरीही या संघटनेपासून दोन हात दुर राहायला लागल्याने संघटनेचे नेते शरद जोशी यांनी हिंगणघाट मतदार संघातून १९९५ ला विधानसभेची निवडणूक लढविली. तेव्हा राजकारणातील नवखा तरुण शेतकरी पुत्र अशोक शिंदे यांनी त्यांचा ४ हजार ४०० मतांनी पराभव केला. तेव्हापासूनच शेतकरी संघटनेला ओहोटी लागली. आज शेतकरी संघटना सत्तेच्या लालसेपोटी समुद्रपूर नगरपंचायतमध्ये भाजपाच्या टेकुने सभापतीपद उपभोगत आहे. तर समुद्रपूर बाजार समितीमध्ये राष्ट्र्वादी काँग्रेससोबत घरोबा आहे. त्यामुळे संघटनेने विश्वास गमविल्याने त्यांची आंदोलने, निदर्शने नावापुरतीच राहिली असून आता भरभराटीच्या काळातील त्यांच्या मोर्चाच्या आठवणी दुसऱ्या पक्षाच्या मोर्चातून जागविल्या जात आहे.
शेतकरी साल्वंट प्लांटचा फज्जा
समद्रपूर तालुक्यात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगला दर मिळावा या करिता गोविंदपूर येथे १९९४-९५ मध्ये शेतकरी साल्वंट प्लांट तयार करण्यात आला. त्याकरिता शेतकºयांकडून शेअर रुपात भाग भांडवल गोळा केले. कारखाना सुरु झाला परंतु लगेच कारखाना डबघाईस आल्याने शेतकऱ्यांचे भाग भांडवल तर बुडालेच पण शेतकऱ्यांना चुकारेही मिळाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची संघटनेबाबत तिव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Web Title: NCP's 'flashback' for the people of Samudrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.