मोदी चौकीदार नाही तर भागीदार : वर्धेच्या सभेत राहुल गांधी यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 08:27 PM2018-10-02T20:27:01+5:302018-10-02T20:45:50+5:30

द्वेषाचे राजकारण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी देश तोडण्याचे काम करीत आहेत. त्यांनी देशाला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. मोदी देशाचे चौकीदार नाहीत तर ‘राफेल’मध्ये भागीदार आहेत. जनतेचा पैसा लुटून निवडक उद्योगपतींच्या खिशात टाकत आहेत, असा थेट आरोप करीत अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. देशाने मोदींना ‘ट्राय’ केले, ते ‘फेल’ ठरले. त्यांची गाडी ‘पंक्चर’ झाली. आता पुढे चालणार नाही, असे टीकास्त्र सोडत आता एकदा काँग्रेसवर विश्वास करून पहा, असे आवाहनही त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केले.

Modi is not a Chawkidar, but Partners: Rahul Gandhi hammered in Wardha meeting | मोदी चौकीदार नाही तर भागीदार : वर्धेच्या सभेत राहुल गांधी यांचा घणाघात

मोदी चौकीदार नाही तर भागीदार : वर्धेच्या सभेत राहुल गांधी यांचा घणाघात

googlenewsNext
ठळक मुद्देसोनिया गांधी, मनमोहनसिंग यांच्यासह दिग्गज नेत्यांची उपस्थिती : सेवाग्राममध्ये बापू कुटीला भेट

 

कमलेश वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : द्वेषाचे राजकारण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी देश तोडण्याचे काम करीत आहेत. त्यांनी देशाला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. मोदी देशाचे चौकीदार नाहीत तर ‘राफेल’मध्ये भागीदार आहेत. जनतेचा पैसा लुटून निवडक उद्योगपतींच्या खिशात टाकत आहेत, असा थेट आरोप करीत अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. देशाने मोदींना ‘ट्राय’ केले, ते ‘फेल’ ठरले. त्यांची गाडी ‘पंक्चर’ झाली. आता पुढे चालणार नाही, असे टीकास्त्र सोडत आता एकदा काँग्रेसवर विश्वास करून पहा, असे आवाहनही त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केले.
राहुल गांधी यांच्यासह ‘युपीए’च्या अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग व काँग्रेस नेत्यांनी मंगळवारी सकाळी सेवाग्राम येथील बापू कुटीला भेट देऊन दर्शन घेतले. यानंतर येथील महादेव भवनात काँग्रेस कार्यसमितीची बैठक झाली. बैठकीनंतर राहुल गांधी यांची वर्धा येथे पदयात्रा होऊन सर्कल ग्राऊंड मैदानावर संकल्प रॅली झाली. या जाहीर सभेत राफेल विमान खरेदीच्या मुद्यावरून राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी विमान निर्मितीचा कुठलाही अनुभव नसताना अनिल अंबानी यांच्या कंपनीला थेट ३० हजार कोटींचे कंत्राट दिले. ४५ हजार कोटींचे कर्ज असलेल्या अंबानींवर मोदींनी कृपा केली. मोदी अंबानीला सोबत फ्रान्सला घेऊन गेले. ५२६ कोटींना मिळणारे एक राफेल विमान तब्बल १६०० कोटींमध्ये करण्याचा प्रताप त्यांनी केला. स्वत:ला देशाचा चौकीदार सांगणारे मोदी हे चौकीदार नसून भागीदार आहेत, असा आरोप त्यांनी केला.

गांधी जोडतात, मोदी तोडतात
 आज मोदी गांधींच्या पुतळ्यासमोर उभे राहून हात जोडतात. मात्र, गांधींनी दिलेली शिकवण त्यांना मान्य नाही. गांधी जोडतात तर मोदी तोडण्याचे काम करतात. मोदी धर्म, जातीत भांडणे लावतात. क्रोध निर्माण करतात, अशी टीकाही त्यांनी केली.

दिग्गज नेत्यांची उपस्थिती
सभेला लोकसभेतील नेते महाराष्ट्र प्रभारी खा. मल्लिकार्जून खरगे, राज्यसभेतील नेते खा. गुलामनबी आझाद, खा. अहमद पटेल, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, संघटन महासचिव अशोक गहलोत, पुड्डुचेरीचे मुख्यमंत्री नारायण सामी, वीरप्पा मोईली, मोतीलाल व्होरा, ए.के. अ‍ॅन्टोनी, आनंद शर्मा, सुशीलकुमार शिंदे, जनार्दन द्विवेदी, अंबिका सोनी, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, हरीश रावत, पी.एल. पुनिया, ज्योतिरादित्य शिंदे, मोहसिना किदवाई, प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विलास मुत्तेमवार, खा. राजीव सातव,बाला बच्चन, संजय निरुपम, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, नाना पटोले, नितीन राऊत, अनिस अहमद, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, नसिम खान, महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष चारुलता टोकस, हर्षवर्धन सपकाळ, भाई जगताप, आ. अमर काळे, आ. वीरेंद्र जगताप, रावसाहेब शेखावत, आ. प्रणिती शिंदे उपस्थित होते.

मोदी केवळ श्रीमंतांसाठी काम करतात
मोदींनी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. पंतप्रधान होताच दोन कोटी लोकांना नोकऱ्या देणार होते. देशभरातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार होते, असे सांगत मोदी देशाशी खरे बोलले की खोटे, असा सवाल त्यांनी केला. जनतेनेही त्यांना ‘खोटे बोलले’ असे सांगत जोरदार प्रतिसाद दिला. मोदींनी गेल्या चार वर्षात देशातील निवडक दहा ते पंधरा उद्योगपतींचे तबब्ल ३ लाख २० हजार कोटी माफ केले. शेतकऱ्यांच्या कर्ममाफीसाठी मात्र नकार दिला. मोदींनी नोटबंदी लादून आपल्या घरातील पैसा हिसकावून बँकेत भरण्यास भाग पाडले. बँकेच्या रांगेत अनिल अंबानी, नीरव मोदी, मेहूल चौकसी हे कधीच दिसले नाहीत. त्यांनी बँकेच्या मागच्या दारातून आपला काळा पैसा पांढरा केला. जगात कच्च्या तेलाचे भाव कमी होत असताना भारतात मात्र पेट्रोल, डिझेलचे भाव दररोज वाढत आहेत. मोदी सामान्यांच्या खिशातील पैसा काढून तो निवडक श्रीमंतांच्या खिशात टाकण्याचे काम करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

मंचावरून उतरले अन् उपस्थितांना जिंकले...
 सभेनंतर राहुल गांधी मंचावरून खाली उतरले व समोर उपस्थित जनसमुदायाला भेटण्यासाठी पुढे सरसावले. सर्वांना हात उंचावून अभिवादन करीत ते पायी फिरले. यामुळे उपस्थितांमध्ये उत्साह संचारला होता. तत्पूर्वी उपस्थितांमधील एका चिमुकलीला राहुल गांधी यांनी मंचावर बोलावून घेतले. तिला भेटवस्तू दिली व ‘आॅटोग्राफ’ही दिला. 

Web Title: Modi is not a Chawkidar, but Partners: Rahul Gandhi hammered in Wardha meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.