केजाजींच्या जयघोषाने घोराड दुमदुमले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 11:46 PM2019-02-05T23:46:30+5:302019-02-05T23:55:48+5:30

टाळ, मृदंगाचा गजर आणि डोक्यावरती तुळशी वृंदावन घेऊन संत केजाजी महाराजांचा पालखी सोहळा रंगला. भाविक भक्तांसह २०० दिंड्यांनी सहभागी होऊन ‘राम कृष्ण हरी’चा जयघोष केला.

Kejaji's chanting of ghorad dumadumale | केजाजींच्या जयघोषाने घोराड दुमदुमले

केजाजींच्या जयघोषाने घोराड दुमदुमले

googlenewsNext
ठळक मुद्देदोनशे दिंड्यांचा सहभाग : डोळ्याचे पारणे फेडणारा रिंगण सोहळा, बोरतिरावर फुलला भाविकांचा मेळा

विजय माहुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : टाळ, मृदंगाचा गजर आणि डोक्यावरती तुळशी वृंदावन घेऊन संत केजाजी महाराजांचा पालखी सोहळा रंगला. भाविक भक्तांसह २०० दिंड्यांनी सहभागी होऊन ‘राम कृष्ण हरी’चा जयघोष केला. दिवसभर चाललेल्या या पालखी सोहळ्याने बोरतीर्थ दुमदुमले होते. भक्तिरसात दंग झालेल्या भाविकांचा उत्साह डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला.
येथील बोरतिरावर तीर्थक्षेत्र घोराड येथे संत केजाजी महाराज यांच्या ११२ व्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पालखी दिंडी सोहळा मंगळवारी पार पडला. या सोहळ्यात गावातील युवा मंडळांनी बैल बंडीवर रथ तयार करुन ते दिंडीत सहभागी झाले. बँडबाजासह अश्वाची सवारी आणि युवकांनी केलेली वेगवेगळी वेशभूषा हे दिंडेचे आकर्षण ठरली. सकाळी १० वाजता विठ्ठल रुख्माई मंदिरातून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. दिंडी गरुड, हनुमान मंदिराकडून बोर तिरावरील पुंडलीकांच्या भेटीला गेली. पुंडीलीकांच्या मंदिराला प्रदक्षिणा करीत असताना भाविकांकडून होत असलेला हरिनामाचा गजर पंढपुरातील चंद्रभागेच्या तिरावरची अनुभूती देत होता. सर्व दिंड्या संत नामदेव महाराज समाधी मैदानावर पोहचताच या ठिकाणी दिंड्यांचा रिंगण सोहळा पार पडला. डोळ्याचे पारणे फेडणारा रिंगण सोहळा पाहण्यासाठी विदर्भातील असंख्य भाविकांची उपस्थिती होती. रिंगण सोहळ्यानंतर दिंड्या गावातील प्रमुख मार्गाने परिक्रमा केली. यावेळी ग्रामस्थांनी ठिकठिकाणी स्वागत करीत चहा, नाश्ता दिला. घोराडनगरीला मिळालेला भक्तीचा वसा येथे दिंडी परिक्रमेत अनुभवास मिळाला. विणेकऱ्यांचे ठिकठिकाणी पाय धुवून त्यांना कुंकू टिळा लावला जात होता. गावातील प्रत्येक रस्ता रांगोळ्यानी सजला होता. चौकाचौकात केलेले देखावे संत महिमांची प्रचिती देत होते. तब्बल ९ तास चाललेल्या दिंडी सोहळ्यात २ किलो मीटर अंतराची परिक्रमा पूर्ण केली. या सोहळ्याला वर्धा जिल्ह्यासह भंडारा, गोंदिया, नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यातील भजन मंडळांनी सहभागी होऊन केजाजी महाराजांच्या नामघोषाने आसमंत निनादून सोडला.

एकोप्याने साजरा होतोय उत्सव
गावात अनेक जाती धर्माचे लोक राहतात. पण, केजाजी महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्या निमित्त आयोजित या कार्यक्रमात सारेच आपसी मतभेद विसरुन एक होतात. त्यांच्या एकीच्या बळातून मदतीचा हात पुढे करीत हा पालखी व दिंडी सोहळा साजरा करण्यात आला. गावातील ऐेकी आणि सर्वधर्म समभाव यामुळेच सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा ठरत आहे.

गावात दिवाळीची प्रचिती
‘साधू, संत येती घरा; तोची दिवाळी, दसरा’ अशी म्हण प्रचलीत आहे. हीच या सोहळ्याच्या दिवसात घोराडवासियांना अनुभवायला येतात. प्रत्येकांच्या घरी पाहुणे मंडळी येतात. यानिमित्ताने मुलीही माहेरी येतात तसेच बाहेर जिल्ह्यातूनही भक्तगण व संत मंडळी गावात असल्याने गावाभर रोषणाई केली जाते. प्रत्येक रस्ताच नव्हे तर सेलू व हिंगणी मार्गही भाविकांनी फुलून जात आहे.

आज काला, दहीहंडी व महाप्रसाद
या सोहळ्यानिमित्त बुधवारी दुपारी ११ वाजता डॉ. आकरी महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. सायंकाळी ४ वाजता विठ्ठल महाराज भांदक्कर यांच्या हस्ते दहिहांडी फुटणार आहे. त्यानंतर सायंकाळी नगर भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या महाप्रसादाला जवळपास ३० हजार भाविकांची उपस्थिती राहणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
 

Web Title: Kejaji's chanting of ghorad dumadumale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.