जरा हटके! क्षणार्धात जुळल्या ऋृणानुबंधाच्या गाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 09:14 PM2019-03-08T21:14:54+5:302019-03-08T21:19:16+5:30

मुलाकडील मंडळी वर्ध्यातील मुलीच्या पाहणीकरिता आले अन् विवाह करून घेऊन गेले. एकाच दिवसात दोन परिवारातील ऋणानुबंध दृढ झाल्याने हा विवाह आदर्शच ठरला आहे.

Just different! came to see girl, but get married | जरा हटके! क्षणार्धात जुळल्या ऋृणानुबंधाच्या गाठी

जरा हटके! क्षणार्धात जुळल्या ऋृणानुबंधाच्या गाठी

googlenewsNext
ठळक मुद्देउच्चशिक्षितांचा आदर्श विवाह पहायला आले आणि विवाह करूनच गेले

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आई-वडिलांचे छत्र हरविल्यानंतर बहिणींचा सांभाळ करण्याची जबाबदारी भावावर येऊन पडली. मोठ्या बहिणीचा विवाह झाल्यानंतर धाकट्या बहिणीच्या विवाहाची चिंता होती. पण, अशातच मुलाचा निरोप आला आणि पाहणीची तारीखही ठरली. मुलीच्या भावाने परिवारातील वडीलधाऱ्या माणसांसह नातेवाईकांना कळविले. ठरल्या दिवशी मुलाकडील मंडळी मुलीच्या पाहणीकरिता आले अन् विवाह करून घेऊन गेले. एकाच दिवसात दोन परिवारातील ऋणानुबंध दृढ झाल्याने हा विवाह आदर्शच ठरला आहे.
सर्वांच्या सहमतीने विवाह करायचा म्हटला तर वेळ आणि पैशाची मोठ्या प्रमाणात उधळपट्टी होते. इच्छित वर-वधूचा शोध घेण्यातच मोठा कालावधी लोटतो. त्यानंतरही विवाह जुळल्यानंतर इतर सोपस्कार पार पाडण्यासाठी परिवाराची मोठी कसोटी लागते. विवाह करण्यासाठीही खिसा चांगलाच रिता करावा लागतो. या साऱ्या गोष्टींचा विचार करून वर्ध्यातील शिंपी समाजातील नानोटे व अकोला येथील बानाईत परिवाराने या साऱ्या गोष्टीला फाटा देत पाहणी, साक्षगंध, हळद आणि विवाह एकाच दिवशी उरकविला. वर्ध्यातील शिंपी समाजाचे माजी अध्यक्ष अविनाश नानोटे यांची पुतणी व स्व. संतोषराव नानोटे यांची कन्या रोशनी हिचा विवाह अकोला येथील नंदकिशोर बानाईत यांचा मुलगा आशिषसोबत झाला. रोशनी आणि आशिष हे दोघेही उच्चशिक्षित असून लग्नावर होणारा अवास्तव खर्च, त्यात जाणारा वेळ या सर्व गोष्टींचा विचार करुन दोघांनीही पहिल्याच भेटीत हा निर्णय घेत समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.

तास-दोन तासात झाल्या घडामोडी
सध्याच्या युगात मुलाला योग्य मुलगी मिळत नाही तर मुलीला योग्य मुलगा मिळत नाही, अशी ओरड आहे. त्यातही मुलांना मुली मिळणे कठीण झाल्याने ‘तुम्ही फक्त मुलगी द्या, आम्ही दोन्ही बाजूचा खर्च करतो’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. काही ठिकाणी मुलांकडून मुलीला हुंडा दिल्याचेही ऐकिवात आहे. अशा स्थितीत जास्त वेळ व पैसा खर्च न करता आशिषने घेतलेल्या निर्णयाला रोशनीनेही होकार दिला. दोघांचीही सहमती मिळताच लगेच लग्नाचा पुरावा म्हणून तासाभरात पत्रिका छापल्या. उपस्थित नातेवाईकांच्या साक्षीने शुभमंगलही उरकवून टाकले. तास-दोन तासातच साऱ्या घडामोडी होऊन पाहणीकरिता आलेली मंडळी सायंकाळी सहा वाजता वरात घेऊनच अकोल्याकडे निघाली.

Web Title: Just different! came to see girl, but get married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.