The house of Rakharangoli of the fire | आगीत घराची राखरांगोळी
आगीत घराची राखरांगोळी

ठळक मुद्देशेकापूर येथील घटना : दोन लाखाच्या नुकसानीचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्क
मोझरी (शेकापूर) : नजीकच्या शेकापूर येथील बेघर वस्तीतील घराला मध्यरात्री आग लागल्याने साहित्याची राखरांगोळी झाली. या आगीत जवळपास दोन लाखाच्या नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
अशोक कोल्हे यांचे बेघर वस्तीत घर असून ते पत्नीसह मागील पंधरा ते वीस वर्षांपासून राहत आहे. मोलमजुरी करुन हे दांपत्य आपला उदरनिर्वाह चालवितात. नेहमीप्रमाणे दैनंदिन कामे आटोपून बुधवारच्या रात्री कोल्हे कुटुंबीय गाढ झोपेत असताना रात्री १२ वाजतादरम्यान अशोक कोल्हे यांना आगीचा चटका लागला. ते खडबडून जागे झाले आणि घरात बघितले असता चहूबाजुने आगीने घेरल्याचे दिसून आले. त्यांनी लगेच पत्नीला जागे करुन कशीबशी आगीतून सुटका करुन घेतली. पण, अल्पावधीत डोळ्यादेखत त्यांच्या संसाराची राखरांगोळी झाली. या आगीत घरातील सर्वच साहित्य जळून राख झाले. यात त्यांचे दोन लाखाचे नुकसान झाले. तसेच या आगीमुळे कोल्हे यांच्या घरालगत असलेल्या विनोद चांदोरे यांच्या गोठ्यातील शेतीचे साहित्य व स्पिंकलर पाईप आगीत सापडले. चांदोरे यांचेही ५० हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. याबाबत दुसऱ्या दिवशी सकाळी सरपंच येरमे, उपसरपंच शुभ्रबुद्ध कांबळे, पोलीस पाटील प्रशांत कारंजकर यांनी पाहणी केली. अल्लीपूर पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. कोल्हे यांच्या घरातील सर्वच साहित्य जळाल्याने त्यांचा संसार उघडल्यावर आला आहे. त्यामुळे गावातील बंडूजी केशेट्टीवार, चिमणे, त्र्यंबक ससाणे, शेळके यांनी लोकवर्गणी करुन कोल्हे यांना तातडीची आर्थिक मदत केली. तसेच राहण्याची तात्पुरती व्यवस्था करुन दिली. त्यांना तात्काळ शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणीही गावकºयांनी केली आहे.


Web Title: The house of Rakharangoli of the fire
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.