ठळक मुद्देनळदुर्ग येथील श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याची कार्यवाही करण्यासाठी १७ नोव्हेंबर रोजी प्रादेशिक सहसंचालकांनी (साखर) मंजुरी दिली आहे़ तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे भवितव्य मात्र अधांतरी टांगले गेले आहे़ या कारखान्याच्या अवसायनाचे अंतिम आदेश प्रादेशिक सहसंचालकांनी (साखर) २० नोव्हेंबर रोजी काढले आहेत़

उस्मानाबाद : अवसायनात निघालेल्या तेरणा व प्रशासक नेमलेल्या तुळजाभवानी साखर कारखान्यांच्या भवितव्याबाबत चालू आठवड्यात हालचाली गतिमान झाल्या आहेत़ एकिकडे तुळजाभवानी भाडेतत्वावर सुरु करण्याची प्रक्रिया सुरु झाली तर दुसरीकडे तेरणाच्या अवसायनाचे अंतिम आदेश जारी झाले़ त्यामुळे तूर्त तेरणाचे भवितव्य अधांतरी असल्याचे दिसते आहे़ 

नळदुर्ग येथील श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याची कार्यवाही करण्यासाठी १७ नोव्हेंबर रोजी प्रादेशिक सहसंचालकांनी (साखर) मंजुरी दिली आहे़ त्यामुळे परिसरातील शेतकरी, कामगारांच्या आशा पल्लवीत झाल्या असून, पुढील गळीत हंगामात तुळजाभवानी कारखान्याचे बॉयलर पेटण्याची आशा व्यक्त केली जात आहे़ एकीकडे तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे़ तर दुसरीकडे तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे भवितव्य मात्र अधांतरी टांगले गेले आहे़ या कारखान्याच्या अवसायनाचे अंतिम आदेश प्रादेशिक सहसंचालकांनी (साखर) २० नोव्हेंबर रोजी काढले आहेत़ तेरणा अवसायनात निघाल्यानंतर तो भाडेतत्त्वावर सुरू करण्यासाठी प्रयत्न होतील, अशी आशा अनेकांना होती़ मात्र, अद्यापपर्यंत या प्रक्रियेला कसलीही गती मिळाल्याचे दिसत नाही़ त्यातच अवसायनाचा अंतिम आदेश निघाल्याने ‘तेरणा’ सुरू होणार की भंगारात विकला जाणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे़

साडेतीनशे कोटींचे कर्ज
तेरणा व तुळजाभवानी साखर कारखान्यांकडे जिल्हा बँकेचे व्याजासह जवळपास साडेतीनशे कोटी रूपये कर्ज आहे़ दोन्ही कारखाने भाडेतत्त्वावर देऊन कर्जवसुलीला परवानगी मिळावी, यासाठी बँकेने प्रयत्न केले आहेत़ मात्र, ‘तेरणा’ भाडेतत्त्वावर देण्याच्या बाबतीत अद्याप परवानगी मिळाली नाही़ तुळजाभवानी कारखाना भाडेतत्त्ववर देण्याची प्रक्रिया प्रशासक करीत आहेत़ त्यामुळे येथून जिल्हा बँकेची कर्जवसुली होणार कशी ? हाच प्रश्न आहे़

आमचे प्रयत्न सुरू
याबाबत ‘डीसीसी’चे चेअरमन सुरेश बिराजदार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, डीसीसी, तेरणा व तुळजाभवानी या सहकारी संस्था आहेत़ तिन्ही संस्था टिकाव्यात यासाठी दोन कारखाने भाडेतत्त्वावर देऊन बँकेची कर्जवसुलीसाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत़ ‘तेरणा’ भाडेतत्त्वावर देण्याला परवानगी मिळावी, यासाठीही पाठपुरावा सुरू असल्याचे बिराजदार म्हणाले़


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.