Three months' ransom for nutrition; Lohara court sentenced to education | पोषण आहार चोरणार्‍यास तीन महिन्यांची सक्तमजुरी; लोहारा न्यायालयाने सुनावली शिक्षा 

लोहारा (उस्मानाबाद) : लोहारा शहरातील जिल्हा परीषद केंद्रीय प्राथमिक शाळा व मराठी कन्या शाळेतील पोषण आहार चोरणार्‍या आरोपीस लोहारा न्यायालयाने तीन महिने सक्तमजुरी व एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

लोहारा येथील जिल्हा परीषद शाळांचा पोषण आहार ठेवलेल्या गोदामाच्या खिडकीचा पत्रा कापून आतील मसुर दाळ, हरभरा, मटकी, खाद्यतेल, जिरे असा ७,५१७ रुपयांचा तर शेजारच्याच मराठी कन्या शाळेतील ९ हजार रुपये किंमतीचा तीन क्विंटल तांदुळ चोरीस गेला होता़ याबाबत मुख्याध्यापक भगवान बासेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अभिजीत रमेश जामखडे (गवळी) रा.लोहारा या आरोपीविरुद्ध कलम ४५७, ४६१, ३८० भादंविप्रमाणे ३ आॅक्टोबर २०१७ रोजी पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला़ तपास अधिकारी के.ए.सांगवे यांनी वेगाने तपास करुन आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. 

या प्रकरणाची सुनावणी लोहारा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.ए.शिंदे यांच्यासमोर झाली. प्रकरणात सरकारी पक्षातर्फे  सात साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षातर्फे विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता बालाजी जगताप यांनी केलेला युक्तीवाद, पुरावे व साक्षी ग्राह्य धरुन १८ डिसेंबर रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.ए.शिंदे यांनी आरोपी अभिजीत जामखडे (गवळी) यास कलम ३८० भादंविप्रमाणे दोषी धरुन तीन महिने सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ दंड न भरल्यास पुन्हा सात दिवसांच्या कैदेची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.