In the case of murder of a wife, the husband got life imprisonment | चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीची हत्या केल्या प्रकरणी पतीस जन्मठेप

उमरगा (उस्मानाबाद) : चारित्र्यावर संशय घेवून आपल्या पत्नीची हत्या करून  पुरावा नष्ट करणा-या आरोपीस अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस़बी़ साळुंखे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हत्येची घटना उमरगा येथे २०१४ रोजी घडली होती. 

बसवकल्याण तालुक्यातील गदलेगाव येथील ठकुबाई भाऊराव शिंदे यांचे उमरगा येथील महादेव प्रल्हाद मुरमेसोबत १३ वर्षांपूर्वी लग्न झाले होते़ लग्नानंतर ठकुबाईच्या चारित्र्यावर संशय घेत पती महादेव व त्याचे वडील प्रल्हाद मुरमे हे शारीरिक व मानसिक त्रास देत होते़ त्यातच १७ आॅगस्ट २०१४ रोजी ठकुबाई या घरकाम करीत असताना पती महादेवने कुरापत काढून तिला लाकडाने व स्टीलच्या भांड्याने  मारहाण केली़. या मारहाणीत जबर जखमी झालेल्या ठकुबाई यांचा  उपचारादरम्यान मृत्यू झाला़ याप्रकरणी बालाजी शिंदे यांनी उमरगा पोलीस ठाण्यात मयताचा पती महादेव व सासरा प्रल्हाद मुरमे यांच्याविरुद्ध तक्रार दिली़ त्यानुसार दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास विलास गोबाडे यांनी करुन अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. दरम्यान, दुसरा आरोपी प्रल्हाद मुरमेचा मृत्यू झाला़ याप्रकरणाची अंतिम सुनावणी पूर्ण झाली़ यात उपलब्ध पुरावे, साक्षी व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता एस़एम़ देशपांडे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस़बी़ साळुंखे यांनी आरोपी महादेव मुरमे यास कलम ३०२ अन्वये दोषी धरुन जन्मठेप व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ तसेच पुरावे नष्ट केल्याप्रकरणी ७ वर्षे सक्तमजुरी व ३ हजार रुपये दंड ठोठावला़