आदित्य ठाकरे म्हणाले, मक्याचं लोणचं आणलंय, पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 10:42 PM2019-02-11T22:42:15+5:302019-02-11T22:42:25+5:30

दुष्काळ पाहणी व शेतक-यांशी संवाद साधण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा सोमवारी उमरगा-लोहारा मतदारसंघात दौरा झाला.

Aditya Thackeray said, "The farmers' crowds to see the CORN pickle | आदित्य ठाकरे म्हणाले, मक्याचं लोणचं आणलंय, पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी

आदित्य ठाकरे म्हणाले, मक्याचं लोणचं आणलंय, पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी

googlenewsNext

उस्मानाबाद : दुष्काळ पाहणी व शेतक-यांशी संवाद साधण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा सोमवारी उमरगा-लोहारा मतदारसंघात दौरा झाला. या दौ-यात त्यांनी आपण शहरी भागातले असल्याने शेतीतील फारसे कळत नाही, मात्र तुम्हाला होणा-या त्रासाची जाणीव आहे, असे सांगत पशुधनासाठी मक्याचं लोणचं आणल्याचे सांगितले. हा शब्द नव्यानेच ऐकलेल्या शेतक-यांची उत्सुकता ताणली गेली अन् त्यांनी हे लोणचं पाहण्यासाठी एकच गर्दी केली. या लोणच्याला उस्मानाबाद भागात मुरघास नावाने ओळखतात.
आदित्य ठाकरे यांनी सेनेच्या पदाधिका-यांसह उमरगा तालुक्यातील नारंगवाडी, समुद्राळ तर लोहारा तालुक्यातील जेवळी गावांना भेट देऊन शेतक-यांशी संवाद साधला. 

दुपारी तीनच्या सुमारास नारंगवाडी येथे आगमन झाल्यानंतर शिवसेनेच्या तवीने गावात बसविलेल्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण त्यांनी केले. यावेळी नागरिकांनी त्यांच्या कानावर पाणीटंचाईची दाहकता टाकली. हा प्रश्न शिवसेना सोडवेल असे आश्वासन त्यांनी दिले. समुद्राळ येथील दुष्काळी दाहकता त्यांनी शेतक-यांकडून जाणून घेतली. यावेळी त्यांनी आता निवडणुका तोंडावर आल्या म्हणून आलो नसल्याचे सांगत निवडणुकीत येऊ व निवडणुकीनंतरही, असे म्हणाले. संकटसमयी सेना आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहील, अशी ग्वाही दिली. जेवळी येथे नागरिकांशी संवाद साधून संकटसमयी बरे वाईट विचार येतात, तेव्हा आत्महत्येसारखे पाऊल उचलू नका, शिवसेना मदतीसाठी तत्पर असल्याचे सांगितले. संवाद साधल्यानंतर पशुधनासाठी आणलेले पशुखाद्य वितरीत करण्यात आले.

महिलांनी सांगितली दाहकता
नागरिकांशाी संवाद साधताना महिला तळमळीने दाहकता मांडत होत्या. रोजगार बुडवून पाण्यासाठी थांबावे लागत आहे. हे आम्हाला परवडणारे नाही. आमच्यासाठी पाण्याची व्यवस्था करा, पशुधनासाठी खाद्य द्या, अशी विनवणी करण्यात महिला आघाडीवर दिसल्या.

असे बनते मक्याचे लोणचे
आदित्य यांनी आणलेल्या मक्याच्या लोणच्याला आपल्याकडे मुरघास संबोधले जाते. मका फुलो-यात असताना तोडून त्याचे एक इंचाचे तुकडे केले जातात. एक दिवस वाळवून ते मोठ्या हौदात किंवा प्लास्टिक बॅगमध्ये दबई करीत त्यातील हवा काढली जाते. आर्द्रता संपविली जाते. यानंतर त्यामध्ये मिनरल, क्षार व काही कल्चर मिसळून या मिक्स्चरमध्ये हवा जाणार नाही, अशा पद्धतीने ठेवले जाते. २१ किंवा ४२ दिवस हे मिक्स्चर तसेच ठेवून नंतर त्याचा वापर पशुखाद्य म्हणून केला जातो. या प्रक्रियेला आंबवणे असेही म्हटले जाते. या मुरघासाची चव चांगली होऊन पशुधनास आवश्यक असणारे घटक उन्हाळ्यातही मिळतात. त्यामुळे दुग्धक्षमताही वाढते.

Web Title: Aditya Thackeray said, "The farmers' crowds to see the CORN pickle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.