वन डे रिटर्न पिकनिकसाठी मुंबई-ठाणेजवळील खास डेस्टिनेशन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 04:03 PM2018-05-29T16:03:58+5:302018-05-29T16:18:12+5:30

पावसाळ्यात बऱ्याच दिवसांची सुट्टी घेऊन पिकनिकला जाणं प्रत्येकालाच जमेल असं नाही. अशावेळी वन डेसाठी अगदी जवळचे कोणते स्पॉट आहेत?

Special Destination Near Mumbai-Thane For One Day Return PICNIC | वन डे रिटर्न पिकनिकसाठी मुंबई-ठाणेजवळील खास डेस्टिनेशन्स

वन डे रिटर्न पिकनिकसाठी मुंबई-ठाणेजवळील खास डेस्टिनेशन्स

googlenewsNext

पावसाळ्यात बऱ्याच दिवसांची सुट्टी घेऊन पिकनिकला जाणं प्रत्येकालाच जमेल असं नाही. अशावेळी वन डेसाठी अगदी जवळचे कोणते स्पॉट आहेत? यासाठी अनेकदा सर्च केलं जातं. अशावेळी अगदी मुंबईजवळ अगदी ठाण्यात अनेक धबधबे आहेत. त्यातील काही निवडक धबधबे खालीलप्रमाणे आहेत. जेथे तुम्ही अगदी एका दिवसात जाऊन येऊ शकता. 

१) बारवी डॅम – ठाणे जिल्ह्यातील बदलापूर जवऴील बारवी डॅम पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. डॅमचा हा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला असतो. धरणात जायला बंदी असली तरी आजूबाजूचा परिसर पावसाळ्यात बहरून जातो. तसेच बदलापूरजवळील भोज गावाजवळ असलेला कुंडेश्वरचा धबधबा नेहमीच्या पर्यटकांना ओळखीचा आहे.

२) सरळगाव – ठाणे जिल्ह्यातलं मुरबाड तालुक्यातलं सरळगाव हे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. सरळगावापासून २ किमी अंतरावर असलेलं विसावा रिसॉर्ट लोकप्रिय आहे. पावसाळी पिकनीक म्हणून रिसॉर्ट सेफ आहेच. इथून जवळच एक छोटी नदी आणि त्यावरच्या बंधाऱ्याजवळचा परिसर अतिशय सुंदर आहे. या बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागते तेव्हा लांबलचक असा समांतर धबधबा तयार होतो. 

(Image Credit: TripAdvisor)

३) जयसागर डॅम – धरणाच्या भिंतीवरील पाण्यात डुंबायचे असेल तर जव्हारला जायला हवे. जव्हार म्हणजे ठाणे जिल्ह्याचे महाबळेश्वरच. ठाणे ते जव्हार हे अंतर सुमारे १०० किमी आहे. पावसाळ्यात दाट धुक्यात जव्हार हरवून जाते. जव्हारला पाणी पुरवठा करणारा जयसागर डॅम पावसाळ्यात भरून वाहू लागतो. 

(Image Credit: TripAdvisor)

४) पेल्हार – पाण्याखाली भिजायची मजा लुटायची असेल तर पेल्हारच्या तळ्याकडे जायला हवे. अहमदाबाद हायवेवर वसई विरार दरम्यान पेल्हार गाव आहे. पेल्हार गावापाशी असलेल्या छोट्या धरणातून पाणी भरभरून वाहू लागते. तेव्हा स्थानिक पर्यटकांची तेथे गर्दी उसळते. वसई-विरारहून एसटी किंवा रिक्षाने पेल्हारला जाता येते. 

५) दाभोसा धबधबा – जव्हार तालुक्यातला हा धबधबा म्हणजे पावसाळ्यात पर्यंटकांचे मोठे आकर्षण ठरले आहे. शेतमाळ, सनसेट पॉईंट, हनुमान पॉईंट, जयविलास पॅलेस अशी अनेक सौंदर्यस्थळ इथे असून रस्त्यालगत अनेक छोटे  धबधबे आहेत. दाभोसा धबधबा हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असून या धबधब्यातून बाराही महिने पाणी वाहतं. 

६) येऊरचा धबधबा – खराखुरा जंगल ट्रॅक अनुभवायचाय, जंगलात जाऊन जेवण बनवायचंय किंवा मस्त पार्टी एन्जॉय करायची असेल तर उत्तम ठिकाण म्हणजे ठाण्याचे येऊर. ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरून येऊरला जाणारी ठाणे महापालिकेची परिवहन सेवेची बस पकडायची. शेवटचा स्टॉप पाटोणपाडा. उथे उतरायचे आणि तिथून डावीकडच्या जंगलातून जाणाऱ्या भेंडीलगतच्या रस्त्याच्या माग काढायचा. पर्यंटकांच्या अपघातांमुळे अनेकदा पोलीस हा रस्ता बंद करतात. तसेच येऊरमध्ये बंगले देखील भाड्याने मिळतात. त्याचप्रमाणे तेथे अनेक धाबे देखील आहेत.

७) कुंडेश्वर धबधबा – प्राचीन वारसा लाभलेला कुंडेश्वरचा धबधबा मानकिवली, भोज या गावांच्या दिशेने गेल्यावर भोज या गावी पोहोचल्यानंतर येथून पायवाटेने वीस पंचवीस मिनिटांच्या पायी प्रवासा केल्यावर दिसतो. बदलापूर जवळचे कुंडेश्वर धबधबा मोहात पाडणारा आहे. मध्य रेल्वेच्या बदलापूर स्टेशनपासून सुमारे ८ किमी अंतरावर असलेले कुंडकेश्वराचे धबधबे सहज पोहता येण्याजोगे आहेत.

(Image Credit: Wonderful Mumbai)

८) चिंचोटी – वसईजवळच्या चिंचोटीच्या धबधब्याकडे नेणारी एक उत्तम वाट आहे. चिंचोटी उत्तर कोकणातल्या ठाणे जिल्ह्याच्या वसई तालुक्यातलं डोंगरकुशीतलं एक छोटंस गाव आहे. गावाजवळच तुफान कोसळणारा चिंचोटी धबधबा अनेक वर्षे पावसाळी पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे. अहमदाबाद द्रूतगती महामार्गावर वसईपासून अगदी १४ किमी अंतरावर हा धबधबा आहे. वसईतून कामणला जाणारी एसटी बस पकडायची. आणि तेथून कामण फाट्यावर उतरायचं, पुढे दीड किमीवर हा धबधबा आहे.

९) पळूचा धबधबा – जव्हारच्या अलिकडे घाट लागतो. या घाटात एका वळणावर जांभारफरशीचं जंगल लागतं. या जंगलात जाणारी पायवाट वळणावरच दिसते. त्या पायवाटेने आत थोडं वर चढतं गेलं की आपण एका उंचवट्यावर येतो. तेथून खोल नदी तिसते. या नदीच्या प्रवाहाच्या दिशेने थोडे चालले की, ही नदी साधारण १५ फूट खाली उडी घेते. तोच पळूचा धबधबा.

१०) गणपती गडद- गणपती गडद या डोंगरात कोरलेल्या लेण्या पळूजवळच्या सोनावळे गावातून साधारण दीड तासाच्या चढाईने गाठता येतात. हे ठिकाण जास्त प्रसिद्ध नसल्याने तसं क्वचितच कोणी या जागेला भेट देतं. त्यामुळे इथे ग्रुपने जाणं अधिक सोईचं आणि सुरक्षेचं आहे. सोनावळ्यातून गावकरी वाटाड्याच्या मदतीने आपण तेथे पोहचू शकतो. रस्ता गर्द झाडीतून जातो पण ठिकठिकाणी वाहत्या पाण्यामुळे निसरडं असल्यामुळे काळजी घेणं आवश्यक आहे.

Web Title: Special Destination Near Mumbai-Thane For One Day Return PICNIC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.