'या' कारणांमुळे भारतीय पर्यटकांना वाटतं थायलंडचं आकर्षण!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 02:04 PM2019-01-31T14:04:02+5:302019-01-31T14:08:01+5:30

थायलंडला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये चीन, जपान, अमेरिका पाठोपाठ भारतीयांचा नंबर लागतो. बौद्ध धर्मामुळे थायलंडची चीनशी अधिक जवळीक असल्याने तिथल्या पर्यटकांच्या लोंढ्यामध्ये चीनच्या पर्यटकांची संख्या उल्लेखनीय आहे.

This is the reason indian tourists to favour for thailand | 'या' कारणांमुळे भारतीय पर्यटकांना वाटतं थायलंडचं आकर्षण!

'या' कारणांमुळे भारतीय पर्यटकांना वाटतं थायलंडचं आकर्षण!

googlenewsNext

निसर्गपर्यटनाच्या बाबतीत जगभर प्रसिद्ध असलेल्या थायलंडचे भारतीयांमध्येही विशेष आकर्षण दिसून येते. थायलंडला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये चीन, जपान, अमेरिका पाठोपाठ भारतीयांचा नंबर लागतो. बौद्ध धर्मामुळे थायलंडची चीनशी अधिक जवळीक असल्याने तिथल्या पर्यटकांच्या लोंढ्यामध्ये चीनच्या पर्यटकांची संख्या उल्लेखनीय आहे.

एकेकाळी अखंड भारताचाच भाग असलेला थायलंड अनेक घडामोडींमुळे विसाव्या शतकात दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतंत्र देश म्हणून नावारूपाला आला. तर मागील दोन दशकात तिथल्या नैसर्गिक वैविध्यांमुळे हा देश जगभरातील पर्यटकांचे आकर्षण ठरलेला आहे. पर्वतरांगा, नद्या, प्राचीन गुफा आणि निळ्या समुद्रातून वर डोकावणारी बेटे ही तिथली प्रमुख आकर्षण केंद्रे. थायलंडची राजधानी असलेल्या बँकॉकसह पट्टया, चियांग माई व हात याई ही तिथली प्रमुख मोठी शहरे. त्यापैकी बँकॉक व पट्टया हे भारतीयांचे विशेष आकर्षण असून या दोन्ही शहराचे स्वतंत्र वैशिष्ट्य आहे. आंबट शौकिनांकडून जेवढी पट्टयाला पसंती मिळते, त्यापेक्षा अधिक पसंती निव्वळ निसर्ग पर्यटन करणाऱ्यांकडून बँकॉक, फुकेट व क्राबीला मिळत आहे. 

बँकॉकमधील सफारी वर्ल्डमध्ये पर्यटकांना दिवसभर खिळवून ठेवण्याची क्षमता आहे. तिथले वेगवेगळे मानवी थरारक स्टंट शो तसेच पशुपक्ष्यांमार्फत होणारे मनोरंजनाचे कार्यक्रम पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत आहेत. तर अनेक हॉलिवूड व बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये झळकलेल्या जेम्स बॉण्ड आयलॅण्ड, माया बे, फी फी आयलॅण्ड व इतर छोटी मोठी बेटे पाहण्यासाठी रोज लाखोंच्या संख्येने पर्यटक आवर्जून क्राबी अथवा फुकेटला भेट देतात. थायलंडवर गौतम बुद्धांचा सर्वाधिक प्रभाव असल्याचे लोकांमधील नम्रतेवरून स्पष्टपणे दिसून येते. तर तिथली वाहतुकीची शिस्त व स्वच्छता भारतीयांना देखील लुभावते. शिवाय इतर देशांच्या चलनाच्या तुलनेत थाय बात व भारतीय रुपये यात फारसा फरक नसल्याने खिशाला फारशी झळही बसत नाही. यामुळे थायलंड भ्रमंतीमध्ये भारतीयांची विशेष करून महाराष्ट्रातील हौशी पर्यटकांची संख्या वाढताना दिसत आहे.

सहज व्हिजा उपलब्ध

वाढत्या स्पर्धेमुळे अनेक विमान कंपन्यांनी तिकिटांचे दर कमी केल्याने थायलंडची सफर करणे सर्वसामान्यांच्याही आवाक्यात आले आहे. अशातच थायलंडने भारतीयांसाठी व्हिजाची प्रक्रिया सोपी करून त्यांचा विदेशवारीचा मार्ग मोकळा केला आहे. स्टिकर व्हिजा अथवा व्हिजा ऑन अरायव्हल घेऊन थायलंडमध्ये प्रवेश मिळवता येतो.

मनसोक्त खरेदी

शॉपिंगचे शौकीन असणाऱ्यांमध्ये बँकॉकचे इंद्रा मार्केट पसंतीचे ठिकाण. परिसरात अनेक मोठमोठे मॉल, शॉपिंग सेंटर आहेत. मात्र इंद्रा मार्केटमध्ये चॉकलेटपासून ते इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंतची खरेदी करता येते. ती देखील त्याच वस्तूच्या भारतातल्या किमतीपेक्षा निम्म्या किमतीत. यामुळे बँकॉकला गेलेले पर्यटक सहसा रिकाम्या हाताने परत आल्याचे पहायला मिळत नाही.

वाहतुकीची शिस्त कौतुकास्पद

थायलंडच्या रस्त्यावर बारकाईने शोधल्यास एखाद दुसरा बेशिस्त चालक सापडेल देखील. परंतु सामान्य नागरिक व पर्यटकांकडून वाहतुकीच्या नियमांचे पुरेपूर पालन केले जाते. लेनची शिस्त, हॉर्न न वाजवणे, पादचाऱ्याला प्राधान्य देणे अशा गोष्टी चालक परवाना देतानाच वाहन चालकांमध्ये बिंबवल्या जातात. तर नियम तोडल्यास तडजोड न करता मोठ्या रकमेचा दंड आकारला जात असल्याने भीतीपोटी देखील चालकांना शिस्त लागल्याचे पहायला मिळते.

Web Title: This is the reason indian tourists to favour for thailand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.