गस्ताद: सैफिनाचं फेव्हरिट डेस्टिनेशन. असं काय आहे या स्वित्झरलँडमधल्या गावात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 02:58 PM2017-07-27T14:58:48+5:302017-07-27T15:41:25+5:30

सैफ अली खान आणि करीना कपूर-खान यांनी आपल्या बाळाच्या म्हणजे तैमूरच्या पहिल्यावहिल्या परदेशी ट्रीपसाठी गस्तादची निवड केली. या गस्तादमध्ये निसर्गसौंदर्यासोबतच खूप काही आहे जे सेलिब्रिटिंना आणि सामान्य प्रेक्षकांना त्याच्यापर्यंत खेचून आणतं.

Gustad. Village in Switzerland . why safina choose this destination for enjoying holiday with taimur | गस्ताद: सैफिनाचं फेव्हरिट डेस्टिनेशन. असं काय आहे या स्वित्झरलँडमधल्या गावात?

गस्ताद: सैफिनाचं फेव्हरिट डेस्टिनेशन. असं काय आहे या स्वित्झरलँडमधल्या गावात?

Next
ठळक मुद्दे* गस्तादला प्रत्यक्ष जाऊन ते गाव अनुभवल्यावरच या गावाची निर्मिती दैवी चमत्कारातून झाली असावी यावर विश्वास बसतो.* गस्तादला क्लासिक हॉलिडे डेस्टिनेशन बनवण्यामध्ये मोठा वाटा आहे तो इथल्या इंटरनॅशनल स्कूल्सचा.* फॅमिली ट्रीपसाठी गस्ताद हे एकदम परफेक्ट डेस्टिनेशन आहे.* गस्तादमध्ये स्कीइंगसाठी खास ठिकाणं आहेत. विशेष म्हणजे लहान मुलांना स्कीर्इंगसाठी इथे खास स्लोप आहेत, ज्यामुळे मुलं सुरक्षितपणे या खेळाचा आनंद घेऊ शकतात.* गस्तादमध्ये एकूण सात स्पा आणि वेलनेस हॉटेल आहेत. त्याचबरोबर गस्ताद स्पोर्टस सेंटरही आहे. इथे तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी आणि शारीरिक निवांतपणासाठी आवश्यक अशा सगळ्या सोयी-सुविधा मिळतील.* इथे येणार्या पर्यटकांमध्ये 30 टक्के पर्यटक हे कुटुंबासमवेत येणारे आहेत.* गस्ताद त्याच्या खास खाद्य परंपरांसाठीही प्रसिद्ध आहे. त्यामुळेच इथल्या क्युलिनरी आॅलिंपिक्समध्ये जगभरातले नामांकित शेफ सहभागी होतात.


- अमृता कदम

बॉलिवूड आणि स्वित्झर्लण्डचं नातं तसं खूप जुनं आहे. रोमॅण्टिक गाणी शूट करायची असोत की स्वत:साठी वेळ काढून मस्त एक्सॉटिक व्हॅकेशनची मजा लुटायची असो, बी-टाऊनला सर्वांत आधी आठवण होते ती स्वित्झर्लण्डची. कारण या देशाच्या निसर्गसौंदर्यात एक वेगळीच जादू आहे. म्हणूनच कदाचित सैफ अली खान आणि करीना कपूर-खान यांनी आपल्या बाळाच्या म्हणजे तैमूरच्या पहिल्यावहिल्या परदेशी ट्रीपसाठीही स्वित्झर्लण्डचीच निवड केली आहे. स्वित्झर्लण्डमधल्या गस्ताद या ठिकाणी सैफ आणि करीना आपल्या बाळासोबत पंधरा दिवसांची सुटी घालवणार आहेत.
असं काय आहे गस्तादमध्ये की सैफिनानं याच ठिकाणाची निवड केली असावी?

कारण नुसतं तिथलं सौंदर्य असं म्हटलं तर ते आख्ख्या स्वित्झर्लण्डभर विखुरलेलं आहे. पण गस्तादमध्ये त्याहीपेक्षा वेगळं काही आहे जे इथे पर्यटकांना खेचून आणतंच.

 

गस्तादच्या सौंदर्याबद्दल इथं एक लोककथा प्रचलित आहे. सगळ्या जगाची निर्मिती करता करता देव थकून गेला. आळसावून निवांत झालेल्या देवाच्या हाताचा पंजा जिथे पडला तिथेच गस्ताद निर्माण झालं. देवाची पाच बोटं म्हणजे या टुमदार शहराला वेढून असलेल्या दर्या आणि मधला भाग म्हणजे गस्ताद. इथं आल्यावर गस्तादला वेढूनच 9 छोटी-छोटी गावं आहेत. पर्वतरांगामध्यला गावांची खासियत असलेली लाकडी घरं इथं दिसतात. ती अगदी चित्रात कोरून काढल्याप्रमाणं आखीव रेखीव दिसतात.
गस्तादला क्लासिक हॉलिडे डेस्टिनेशन बनवण्यामध्ये मोठा वाटा आहे तो इथल्या इंटरनॅशनल स्कूल्सचा. इन्स्टिट्यूट ल रोसे, जॉन एफ केनेडी आणि गस्ताद इंटरनॅशनल स्कूलसारख्या संस्थांमध्ये शिकणारे विद्यार्थी, त्यांचे पालक, नातेवाईक, मित्रमंडळींनी गस्तादची ख्याती जगभरात पसरवली आहे. आणि शैक्षणिक केंद्रासोबतच गस्ताद पर्यटन केंद्र म्हणूनही प्रसिध्द झालं आहे.
फॅमिली ट्रीपसाठी गस्ताद हे एकदम परफेक्ट डेस्टिनेशन आहे. त्यातून जर सोबत मुलं असतील तर त्यांना इथं नक्कीच बोअर होणार नाही. कारण त्यांच्यासाठी इथे वेगवेगळ्या आईस-स्पोर्टसची पर्वणी आहे.

इथे रोप वेमधून मस्त फेरफटका मारता येतो आणि स्वित्झर्लण्डमध्ये आल्यावर स्कीर्इंग तर मस्टच आहे. गस्तादमध्ये स्कीइंगसाठी खास ठिकाणं आहेत. विशेष म्हणजे लहान मुलांना स्कीर्इंगसाठी इथे खास स्लोप आहेत, ज्यामुळे मुलं सुरक्षितपणे या खेळाचा आनंद घेऊ शकतात. इथल्या आल्बिस पास, आइमसाईडेन आणि साटेल हॉच पासमध्ये तुम्ही कधीही न अनुभवलेल्या माऊंटन स्पोर्ट्सचीही मजा लुटू शकता.
शिवाय स्वित्झर्लण्डच्या निसर्गाचं सौंदर्य कणाकणानं  चाखायला तुम्हाला इथली रेल्वे मदत करते. आल्पसच्या पर्वतरांगांतून कोरु न काढल्याप्रमाणे दिसणारे हे रेल्वेमार्ग तुम्हालाही मुलांप्रमाणे लहान बनवतात आणि हो इथलं अम्युझमेन्ट सेंटरही!.

 

स्पोर्टस आणि इतर अ‍ॅडव्हेंचरस गोष्टींबरोबरच गस्तादची अजूनही काही वैशिष्ट्यं आहेत. ती म्हणजे इथलं अल्पाईन वेलनेस सेंटर आणि क्युलिनरी आॅलिम्पिक्स. गस्तादमध्ये एकूण सात स्पा आणि वेलनेस हॉटेल आहेत. त्याचबरोबर गस्ताद स्पोर्टस सेंटरही आहे. इथे तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी आणि शारीरिक निवांतपणासाठी आवश्यक अशा सगळ्या सोयी-सुविधा मिळतील. शिवाय काही टीप्सही!


गस्ताद त्याच्या खास खाद्य परंपरांसाठीही प्रसिद्ध आहे. त्यामुळेच इथल्या क्युलिनरी आॅलिंपिक्समध्ये जगभरातले नामांकित शेफ सहभागी होतात. इथलं प्रसिद्ध ‘गॉल मिलाऊ रेस्टॉरन्ट’ गस्तादमधल्या अनेक शेफना नियमितपणे पॉइंट्सही देतात. त्यामुळे इथल्या शेफमध्ये नेहमीच वेगवेगळे पदार्थ खिलवण्याची चढाओढ असते. आणि इथे येणार्या लोकांची पर्वणीही!
या सगळ्या गोष्टीच गस्तादला कुटुंबासह पर्यटनाला जाण्यासाठी एकदम योग्य ठिकाण बनवतात. इथे येणार्या पर्यटकांमध्ये 30 टक्के पर्यटक हे कुटुंबासमवेत येणारे आहेत. त्यातही पिढ्या न पिढ्या आपली सुटी घालवायला येणार्या पर्यटकांची संख्या जास्त आहे.


बॉलिवूड कलाकारांच्या फॅशन्स, त्यांच्या स्टाइलचं अनुकरण चटकन केलं जातं. मग एखाद वेळेस त्यांच्या ट्रॅव्हल प्लॅनचं अनुकरण करायलाही हरकत नाही. शिवाय आजकाल परदेशी प्रवासही खिशाला परवडणारा झाला आहे आणि प्रत्येकाला आपापल्या बजेटनुसार ट्रीप प्लॅन करता येते. त्यामुळे सैफीनाचा ट्रॅव्हल प्लॅन फॉलो करु न बघायला काय हरकत आहे?

 

Web Title: Gustad. Village in Switzerland . why safina choose this destination for enjoying holiday with taimur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.