जागतिक रेडक्रॉस दिन : रूग्णांना ‘रेडक्रॉस’ची संजीवनी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 01:59 AM2019-05-08T01:59:21+5:302019-05-08T01:59:38+5:30

इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या येथील शाखेमार्फत प्रत्येक महिन्याला सुमारे दोन ते अडीच हजार रुग्णांना अत्यल्प दरात आरोग्य सेवा दिली जाते. दरवर्षी हजारो रुग्णांना या सेवेचा लाभ होतो.

World Red Cross Day: Sanjivani of 'Red Cross' for patients | जागतिक रेडक्रॉस दिन : रूग्णांना ‘रेडक्रॉस’ची संजीवनी

जागतिक रेडक्रॉस दिन : रूग्णांना ‘रेडक्रॉस’ची संजीवनी

googlenewsNext

ठाणे : इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या येथील शाखेमार्फत प्रत्येक महिन्याला सुमारे दोन ते अडीच हजार रुग्णांना अत्यल्प दरात आरोग्य सेवा दिली जाते. दरवर्षी हजारो रुग्णांना या सेवेचा लाभ होतो. संस्थेमार्फत विविध आजारांशी संबंधित आरोग्य शिबिरेही घेतली जातात. अशा प्रत्येक शिबीरामध्ये २०० ते २५० रुग्ण सहभागी होतात. गोरगरिब रूग्णांसाठी ही संस्था एक प्रकारची संजीवनी ठरत आहे.

ठाणे शहरातील तीन पेट्रोल पंप येथे इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या संस्थेची वास्तू असून, त्याचे उद्घाटन १९९३ साली तत्कालीन राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर यांच्या हस्ते झाले होते. जिल्हा पातळीवर इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जिल्हा शाखा या नावाने ही संस्था कार्यरत आहे. या जिल्हा शाखेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत. सद्य:स्थितीत या संस्थेमध्ये जनरल ओपीडी (रोजचा दवाखाना), पॅथॉलॉजी विभाग, दंत विभाग, कन्सलटिंग विभाग, फिजीओथेरपी विभाग आणि इ.सी.जी. विभागासह फेब्रुवारी २०१७ पासून एक्स-रे विभागही सुरू झाला आहे. या संस्थेमध्ये सुमारे ३५-४० मानद् डॉक्टर कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून हजारो गरजू आणि गोरगरिब रुग्णांना अहोरात्र अत्यल्प दरात सेवा दिली जात आहे.

रेडक्रॉस सोसायटीतर्फे प्रथमोपचाराचे प्रशिक्षणही अल्प दरात दिले जाते. मोफत जनरल कॅम्पमध्ये ब्लड प्रेशर, त्वचा रोग, कान, नाक, घसा तसेच अस्थिरोग तपासणीचे आयोजन केले जाते. याशिवाय बी.एम.डी, ब्लड शुगर आणि रक्तगट तपासणी शिबीरही भरवली जातात. प्रत्येक शिबिरात जवळजवळ २०० ते २५० रुग्ण सहभाग घेतात. रेडक्रॉसमध्ये एक वैद्यकीय अधिकारी व इतर १५ कर्मचारी आहे.

‘व्हाट डू यु लव्ह अबाउट रेडक्रॉस’

सात प्रमुख तत्त्वांवर रेडक्रॉसचे कामकाज चालते. यंदाच्या जागतिक रेडक्रॉस दिनी ‘व्हाट डू यु लव्ह अबाउट रेडक्रॉस’ अशी संकल्पना होती. त्या संकल्पनेनुसारच जागतिक जागतिक रेडक्रॉस दिन साजरा करण्यात येत असल्याची माहिती संस्थेच्या उपाध्यक्षा मीना शहा यांनी दिली.

Web Title: World Red Cross Day: Sanjivani of 'Red Cross' for patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे