बिबट्या ठाण्यात का आला?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 12:18 AM2019-03-05T00:18:57+5:302019-03-05T00:19:10+5:30

गेल्या आठवड्यामध्ये ठाण्यातील कोरम मॉल आणि सत्कार रेसिडेन्सी हॉटेल या अगदी भरवस्तीतल्या दोन ठिकाणी बिबट्या शिरला.

Why did the leopard come from Thane? | बिबट्या ठाण्यात का आला?

बिबट्या ठाण्यात का आला?

Next

-जितेंद्र कालेकर
गेल्या आठवड्यामध्ये ठाण्यातील कोरम मॉल आणि सत्कार रेसिडेन्सी हॉटेल या अगदी भरवस्तीतल्या दोन ठिकाणी बिबट्या शिरला. ठाणेकरांसह वनविभाग, वन्यजीव विभाग तसेच संजय गांधी राष्टÑीय उद्यानाच्या बचाव पथकांची एकच तारांबळ उडाली. एकीकडे त्याची सुटका करण्याचे काम वनविभागासह ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पोलिसांकडून सुरू असतानाच त्याला बघण्यासाठी उसळलेल्या गर्दीने बचावकार्यात बरेच अडथळे निर्माण केले. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचीही त्याला कॅमेऱ्यात पकडण्यासाठी बरीच धावपळ उडाली. या सर्व धुमश्चक्रित वनविभागाच्या कर्मचाऱ्यांबरोबर वादावादीचे प्रसंग उद्भवले. ठाण्याच्या येऊर, संजय गांधी राष्टÑीय उद्यानाचे राखीव विस्तीर्ण वनक्षेत्र या सर्व परिसरात बिबट्याचे वास्तव्य आहे. तो नेमका ठाणे शहराच्या दिशेने कसा चुकला? नागरिकांनी बिबट्या शहरात शिरल्यावर काय केले पाहिजे? या सर्व प्रश्नांचा घेतलेला धांडोळा...
बिबट्या मानवीवस्तीमध्ये नेमका कसा आला, या प्रश्नाचे उत्तर वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो आपल्या वस्तीमध्ये आला की, आपण त्याच्याच वस्तीमध्ये आहोत. असा प्रतिसवाल अनेकांनी केला. अगदी १०० वर्षे मागे गेलो तरी असे आढळते की, ठाणे शहरातील येऊरलगतचा संपूर्ण पाच किलोमीटरचा भाग हा जंगलव्याप्त होता. यात लोकमान्यनगर, इंदिरानगर, सीपी तलाव, श्रीनगर तर ग्रामीण भागातील भिवंडी, शहापूर, तुंगारेश्वर, वसई हा संपूर्ण परिसर होता. आता तेथे नागरीवस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नागरिकीकरणामुळे वनांऐवजी सिमेंटचे जंगल वाढले. त्यामुळे चुकलामाकला बिबट्या कधीकधी नागरीवस्तीत येणे स्वाभाविक आहे. अनेक ठिकाणी सीसीटीव्ही असल्यामुळे बिबट्या आला, हे समजते. परंतु, तो नेहमीच या भागात येत असावा. त्याची ही प्रचलित वाट असल्यामुळे याआधीही येत असणार. तसा तो आताही आला. यापुढे कदाचित तो अधिक प्रमाणात येण्याची शक्यता आहे. वाघ आणि बिबटे यांची संख्या कमी होत असल्यामुळे ते वाढवण्याचे केंद्र आणि राज्य शासनाचे जे प्रयत्न सुरू आहेत, त्याचा परिणाम म्हणून बिबट्यांची संख्या काही प्रमाणात वाढल्याचे ठाणे वनविभागाचे उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांनी सांगितले.
मुंबई आणि ठाणे महानगरांच्या मध्यवर्ती भागात संजय गांधी राष्टÑीय उद्यान आहे. याच उद्यानाच्या परिसरातील निसर्गरम्य येऊरचे जंगल पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. वानरांपासून बिबट्यांपर्यंतचे वन्यप्राणी याठिकाणी आहेत. परंतु, वाढती अतिक्रमणे, वाहने व फायरिंग रेंजवरील गोळीबाराच्या कर्कश आवाजामुळे ‘पर्यावरण संवेदनशील’ म्हणून घोषित असलेल्या या जंगलातील वन्यजीवांना याचा त्रास सहन करावा लागतो.
ठाणे शहरापासून अवघ्या तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेला येऊरचा हा रम्य विस्तीर्ण जंगल परिसर शिवाईनगर आणि उपवन या शहरी भागांना लागूनच आहे. जैवविविधतेने नटलेल्या या जंगल भागात वन्यप्राणी, पक्षी आणि दुर्मीळ वनस्पती आढळतात.
बिबट्या हा अत्यंत गूढ वर्तन असलेला प्राणी आहे. संजय गांधी राष्टÑीय उद्यानात अन्नसाखळीमध्ये तो उच्चस्थानी आहे. हे उद्यान मानवीवस्तीलगत असूनही मानव आणि प्राणी संघर्ष अल्प प्रमाणात असल्याचा दावा वनविभागाने केला आहे. स्वयंसेवी संस्था आणि वनविभागामार्फत बिबट्यापासून संरक्षण कसे करावे, याबाबत वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती मोहीम राबवली जात असल्याचे वनअधिकारी सांगतात. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी (सायंकाळी ६ ते पहाटे ५ पर्यंत) त्याच्या हालचाली मोठ्या प्रमाणात आढळतात. भटके कुत्रे हे त्यांचे सर्वात आवडते खाद्य आहे. अलीकडच्या काळामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे याच भक्ष्याच्या शोधात बिबटे जंगल सोडून बाहेर पडतात. एका वरिष्ठ वनअधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार, बिबटे जंगल सोडून शहरी भागात येण्याची जी अनेक कारणे आहेत, त्यापैकी महत्त्वाचे म्हणजे पहाटे किंवा सायंकाळच्या वेळी जेव्हा तो भक्ष्याच्या शोधात बाहेर पडतो, तेव्हा जंगल भागातून रस्त्यावर आल्यामुळे एखादे वाहन किंवा आवाज आल्यावर तो आपली दिशा बदलतो. यातूनच वाट चुकल्यानंतर थेट शहरात आल्याची अनेक उदाहरणे आहेत. जंगलात वयोवृद्ध (१५ ते १७ वर्षे) बिबट्याची जागा तरणाबांड (३ ते ५ वर्षांचा) बिबट्या घेतो. त्यावेळी हा वयोवृद्ध बिबट्या तरुण बिबट्याशी संघर्ष न करता नरमाईने घेत अन्यत्र आपली जागा शोधतो. अशी नवीन जागा शोधण्याच्या प्रयत्नात तो भरकटतो. बºयाचदा विणीच्या (प्रजनन) हंगामात जून, जुलै या महिन्यांमध्ये नर बिबट्या मादीच्या शोधात बाहेर पडण्याची शक्यता असते.
कोरम मॉल व सत्कार हॉटेल परिसरात भरकटलेला बिबट्या हा नर बिबट्या होता. तो परतीच्या मार्गावर असताना एखाद्या वाहनाच्या अडथळ्याने रस्ता बदलल्याने चुकला. त्यामुळेच तो येऊर व उपवनपासून जवळच असलेल्या कोरम मॉलमध्ये शिरला. बिबट्या हा मुळातच लाजाळू आणि एकान्तप्रिय प्राणी आहे. त्यामुळे सहसा तो मनुष्यावर हल्ला करत नाही. त्याची उंची तीन ते चार फुटांची असल्यामुळे त्याच्या उंचीइतक्या किंवा त्यापेक्षा कमी उंचीच्या सावजांना तो हेरतो. जंगलात लघुशंका किंवा प्रातर्विधीसाठी बसलेली व्यक्ती, कमी उंचीच्या पाठमोºया व्यक्ती, लहान मुले यांच्यावर बिबट्याकडून हल्ला करण्याची भीती अधिक असते. याशिवाय, कुत्रा, गायीचे वासरू, बकरी हे त्याचे आवडीचे खाद्य. कोणत्याही वातावरणात त्याला राहण्याची सवय असल्यामुळे अगदी लहानात लहान कोंबड्या, उंदीर घुशीसारख्या प्राण्यांवरही तो जगतो. बिबट्या हा अतिशय चपळ आणि लाजरा प्राणी आहे. तसेच, तो अपमार्जक (स्काव्हेंजर) ही आहे. तो झाडावर सहजपणे चढू शकतो. अगदी उभा असला तरी १० ते १२ फूट उंचीची झेप तो सहज घेऊ शकतो. आपण जंगल, बिबट्याच्या जागा या इमारती उभारण्यास बळकावल्या, त्यामुळे वन्यजीवन विस्कळीत झाले. मनुष्य निसर्गाचे नियम मोडतो आणि त्रास झाला की, त्याच्या नावाने बोंबाबोंब करतो. आजूबाजूचा परिसर स्वच्छ न ठेवल्यास सगळ्या त्रासाची सुरुवात तिथूनच उद्भवते. कचरा आला की उंदीर, कुत्रे, मांजर, पक्षी आणि डुकरांची चंगळ होते. त्याचबरोबर बिबट्यालाही त्याचे खाद्य मिळण्यास सोपे जाते. मग, तो कशाला जंगलात शिकार करेल? त्यात माणसाने केलेल्या जेवणाची चटक माणसानेच त्याला लावली. मग, कोणाला दोषी ठरवायचे आपल्याला की त्याला? बिबट्या मनुष्यवस्तीत येऊ नये, म्हणून एक गोष्ट प्रामुख्याने करावी, ती म्हणजे आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा, कचरा करू नये. कॉलनीत राहणाºया रहिवाशांनी कम्पाउंड वॉल १५ ते २० फुटांपर्यंत उंच बांधावी. कम्पाउंडला लागून झाडे असतील, तर कम्पाउंडमध्ये येणाºया फांद्या कापाव्यात. कम्पाउंड वॉलवर जाळी बसवावी. परिसरात पुरेसा उजेड कायम असावा. उघड्यावर शौचास बसू नये. बिबट्याला माणूस कळत नसतो, त्याला आकार कळतो. त्यामुळे शौचास बसलेल्या व्यक्ती त्याला आपले सहज मिळणारे भक्ष्य वाटते, तेव्हाच तो झेप घेतो. बिबट्या मनुष्यवस्तीत आला तर घोळका करू नका, शांत राहा. वन्यजीव अधिकाºयांशी ताबडतोब संपर्क करा. त्यांच्या कारवाईदरम्यान फोटो, व्हिडीओ काढू नका. बिबट्याला गर्दीची सवय नसते, तो गांगरून जातो आणि स्वत:च्या बचावासाठी कुठेही पळू शकतो. बिबट्या सैरभैर होणार नाही, याची खबरदारी घेतली, तर सगळेच प्रश्न सुटतील.
- अरुण पटवर्धन, निसर्गप्रेमी
>सीसीटीव्ही आणि भिंतीचे संरक्षण
जंगलात बाहेरून येणाºया पर्यटकांचा वन्यप्राण्यांना त्रास होऊ नये, त्यांची कोणी शिकार करू नये तसेच येऊर गावातील रहिवासी आणि पर्यटकांना या वन्यप्राण्यांचा त्रास होऊ नये, यासाठी जंगलाच्या सीमेवर वनविभागाने भिंत बांधली आहे. या भिंतीमुळे जंगलात पार्ट्या करण्यासाठी जाणाºयांचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. याशिवाय, जंगलातील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे करणाºयांवरही नियंत्रण आणल्याचा दावा वनविभागाने केला आहे. ओसाड जागी होणारी गैरकृत्ये तसेच वन्यप्राण्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने वनविभागाने येऊर जंगलाच्या सीमेलगत अनेक ठिकाणी सीसीटीव्ही लावले आहेत. वनकर्मचाºयांमार्फत गस्त घातली जाते.केवळ तीन वर्षांपूर्वी मुरबाड भागातील नरभक्षक बिबट्याला अगदी नाइलाजाने ठार करावे लागले. त्याच्या हल्ल्यात एक महिला मृत पावली होती. काही मुलांवरही त्याने हल्ला केला होता. त्यामुळे प्रधान मुख्य वनसंरक्षक (नागपूर) यांच्या परवानगीने त्याला ठार करावे लागल्याची खंत वनअधिकारी व्यक्त करतात. बिबट्याच्या हल्ल्यात कोणी जखमी किंवा मृत पावल्यास नुकसानभरपाई देण्याची तजवीज आहे. पण, नैसर्गिक शृंखलेचाच एक भाग असलेला बिबट्या जगला पाहिजे. त्याची संख्या वाढली पाहिजे. यासाठी नागरिकांनी वनविभागाला सहकार्य केले पाहिजे.
>बचाव दलाला सहकार्य करा...
ठाण्यात बिबट्या किंवा असाच एखादा प्राणी शहरी भागात आला, तर घाबरून न जाता, प्राणी बचाव दलाला पाचारण करावे. ठाण्यात उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, सहायक वनसंरक्षक गिरिजा देसाई, ठाण्याचे परिक्षेत्र वनअधिकारी दिलीप देशमुख आणि बोरिवली उद्यानाचे संजय वाघमोडे, वनक्षेत्रपाल एस.एस. कंक, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पेठे, वनपाल रवींद्र तवर, मनोज परदेशी, वनरक्षक सचिन सुर्वे, आमिष रसाळ आणि वनमजूर संतोष भांगने आदींचे बचाव दल कार्यरत आहे. बिबट्या आलाच, तर हे पथक काही मिनिटांमध्ये ठाणे आणि मुंबई परिसरांत दाखल होते. त्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी व्यूहरचना केली जाते. ट्रॅन्क्विलायझेशन हे लिक्विड बिबट्याच्या वजनाच्या प्रमाणात त्याला गनमधून दिले जाते. १५ ते २० मिनिटांमध्ये तो बेशुद्ध झाल्याची खात्री केली जाते. त्यानंतर, अर्धा तास तो बेशुद्धावस्थेत असतो. त्या काळात सर्वात आधी त्याच्या तोंडावर फडके टाकून त्याचे नाकापासून शेपटीपर्यंत मोजमाप केले जाते. यात पाय, बोटे आणि नखे यांचाही समावेश असतो. त्यानंतर, लोखंडी पिंजऱ्यात टाकून पुन्हा त्याच्या परिसरात सोडण्यात येते. ठाण्यातील हॉटेलच्या बेसमेंटमध्ये असलेल्या पाण्याच्या टाकीच्या खोलीत तो होता. पण, रस्त्यावर किंवा मोकळ्या जागेतील बिबट्याला पकडताना बचाव पथकाची मोठी दमछाक होते. नाशिकच्या घटनेत तर बिबट्याने वनकर्मचाऱ्याच्या डोक्याला पंजा मारून त्याला जखमी केले. असा प्रसंग घडलाच, तर किमान बचाव दलाला सहकार्य करा. तिथे गर्दी करण्याची किंवा फोटो घेण्याची स्पर्धा टाळा. त्यामध्ये एखाद्याच्या जीवाला धोका होऊ शकते. ठाण्यात यापूर्वी २००७ मध्ये खोपटच्या बाटा कम्पाउंडमध्ये बिबट्या शिरला होता. त्यानंतर, अलीकडे उल्हासनगर, मुलुंड आणि आता ठाण्यातही अगदी सुरक्षितपणे बिबट्याची सुटका करण्यात आली.


>काय काळजी घ्यावी...
बिबट्या मनुष्यप्राण्यावर सहसा हल्ला करत नाही. त्यातही गटाने जाणाऱ्यांवर तर तो समोरून हल्ला करत नाही. उलट, मनुष्याला पाहून किंवा त्यांच्या आवाजाची चाहूल लागली तरी तो आपली वाट बदलतो, असे अभ्यासू वनअधिकारी सांगतात. क्वचितप्रसंगी एकट्यादुकट्या मनुष्यावर तो हल्ला करण्याची भीती असते. त्यामुळेच वनपरिसरात, येऊरसारख्या संजय गांधी राष्टÑीय उद्यानामध्ये येणाऱ्या राखीव वनामधून भल्या पहाटे किंवा रात्रीच्या वेळी फिरताना सावधानता बाळगली पाहिजे. तो दिसला तरी त्याला डिवचता कामा नये. तो आपल्या मार्गाने जाईल.वनविभागाच्या सीमेलगतच्या संकुलांनी सभोवताली स्वच्छता ठेवावी. सभोवताली गवताची, झुडुपांची लागवड होऊ देऊ नये. लहान मुलांना शाळेत सोडताना पालकांनी सोबत असावे. रात्री घराबाहेर आणि सोसायटीच्या परिसरात प्रखर दिवे असावेत. अशा परिसरातून एकट्याने न जाता गटागटांनी काठ्या आणि बॅटरी घेऊनच वावर करावा.
>संरक्षण कसे कराल... : सर्वच बिबटे हे धोकादायक किंवा नरभक्षक नसतात. त्यामुळे बिबट्या दिसला तर डबे वाजवून, फटाके फोडून अथवा मोठ्या आवाजात ओरडण्याने तो परत फिरू शकतो. त्याला मारण्यासाठी दगडांचा वापर करू नये. त्याला डिवचणे, पाठलाग करणे हे प्रकार जीवावर बेतू शकतात, असे वनअधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अशा वनविभागाच्या परिसरांत कुत्र्यांचे जोरजोरात भुंकणे, हा बिबट्या जवळपास असल्याचा संकेत असतो. अशावेळी सावधानता बाळगा. वनविभागाला माहिती द्या.
>वाढती अतिक्रमणे
येऊर परिमंडळातील पाचपाखाडी क्षेत्रात कैलासनगर, वारलीपाडा, जुनागाव, रामनगर, हनुमाननगर, कोकणीपाडा आणि मानपाडा अशी सुमारे तीन हजार वस्तीची अतिक्रमणे झाली आहेत. कावेसर भागातही शेती आणि वस्तीची अतिक्रमणे आहेत. यामध्ये आदिवासी आणि बिगर आदिवासींचाही समावेश आहे. शहरालगतच वनविभागाची सीमा असल्याने अतिक्रमणे सुरूच असतात. त्यांचे सर्वेक्षण करून आधीच्या अतिक्रमणधारकांचे योग्य पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव असून नवीन अतिक्रमणांना अटकाव करण्यात येत असल्याचे वनविभागागाकडून सांगण्यात आले. आदिवासी वनहक्क कायद्याचा आधार घेत काहींनी या परिसरात अतिक्रमणे केली आहेत.
>विविध शासकीय प्रकल्प
विविध शासकीय प्रकल्पांमुळेही वन्यजीवांवर परिणाम होतो. येऊरच्या जंगलातून भुयारीमार्ग, रस्ते रुंदीकरण, पाणीपुरवठा, उड्डाणपूल, मेट्रो प्रकल्प आदींसाठी विविध ठिकाणी खोदकाम करण्यात येते. काही ठिकाणी या कामांसाठी खोदकाम प्रस्तावित आहे. यंत्रामुळे आणि मानवी हस्तक्षेपामुळे वन्यजीव तसेच जैवसंपदेवर, वन्यप्राण्यांच्या अधिवासावर विपरित परिणाम होण्याची भीती असून त्यासाठी शाश्वत उपाययोजनांची गरज आहे. त्यामुळे जंगलातून प्रकल्प राबवताना पर्यावरणाला धक्का न लागता, तो राबवणे अपेक्षित असल्याचे पर्यावरणवाद्यांचे मत आहे.
>‘फायरिंग रेंज’चाही धोका
येऊरचा परिसर हा केंद्र शासनाने ‘पर्यावरण संवेदनशील क्षेत्र’ म्हणून अलीकडेच घोषित केला आहे. त्यामुळे वाहनांचे हॉर्न किंवा डीजे असे कोणत्याही प्रकारच्या ध्वनिप्रदूषणाला याठिकाणी बंदी आहे. ध्वनिप्रदूषण करणाºयांवर पोलीस आणि वनविभागाकडून कारवाई केली जाते. याच भागात येऊरच्या पायथ्याला रामबाग परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून लष्कर आणि पोलिसांचे फायरिंंग रेंज आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल, एनसीसी, हवाई दल तसेच निमलष्करी दलाचे जवान आणि पोलीस याठिकाणी नेमबाजीचा सराव करत असतात. त्याचा आवाज सतत येऊरच्या जंगलात घुमत असतो. एकाच वेळी १० ते १५ जवान फायरिंंग रेंजच्या ठिकाणी गोळीबार करत असल्यामुळे जंगलात मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होत असते. गेल्या अनेक वर्षांपासून असलेले ‘फायरिंंग रेंज’ आता अन्यत्र हलवण्यात यावे, अशी येथील निसर्गप्रेमींची मागणी आहे.
>असे आहे येऊरचे वनक्षेत्र
येऊरचे वनक्षेत्र हे मुंबई आणि ठाणे या दोन शहरांलगतचे निसर्गरम्य ठिकाण आहे. मुलुंड ते दहिसरपर्यंत पाच हजार ९३३. ८१० हेक्टर इतके त्याचे क्षेत्र आहे. वन्यजीव अभ्यासक, स्थानिक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी अभ्यासक याठिकाणी भेटी देत असतात. येऊर, घोडबंदर, नागला आणि चेना या चार परिमंडळांमध्ये येऊर (पश्चिम), येऊर (पूर्व), पाचपाखाडी, कावेसर, घोडबंदर, काशी, नागला, ससुनवघर, सारजामोरी, चेना पश्चिम, चेना पूर्व आणि ओवळा अशा १२ नियतक्षेत्रांसह चेना नदी आणि तुलसी तलावाचाही समावेश होतो. एक परिक्षेत्र वनअधिकारी, चार परिमंडळ वनअधिकारी, १२ वनरक्षक, वनमजूर आणि हंगामी कर्मचारी असा फौजफाटा या वनाच्या संरक्षणासाठी तैनात आहे.
>नैसर्गिक पाणवठे
येऊरच्या वनक्षेत्रात २५ नैसर्गिक पाणवठे असले, तरी त्यातील १० पाणवठ्यांमध्ये वर्षभर पाण्याचा स्रोत असतो. हे पाणवठे बुजू नये तसेच वन्यप्राण्यांना स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळण्यासाठी त्यांची वनकर्मचाºयांकडून निगा राखली जाते. याच पाणवठ्यांवर बिबट्यांसह अनेक वन्यप्राणी आपली तहान भागवतात.
>वनकर्मचाºयांना मदतीचा हातभार
मानव-बिबट्या संघर्ष कमी व्हावा, यासाठी आदिवासी आणि पर्यटकांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम फॉरेस्ट अ‍ॅण्ड वाइल्ड लाइफ कन्झर्व्हेशन सोसायटी संस्थेद्वारे २००४ पासून राबवले जातात. बिबट्या प्रवणक्षेत्रात संशोधन तसेच त्याच्यापासून बचाव कसा करायचा, याची जनजागृती या संस्थेकडून केली जाते.

 

Web Title: Why did the leopard come from Thane?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.